बेस्टवर २५ वर्ष एकाच परिवाराचं वर्चस्व! भंगार घोटाळ्याची चौकशी करा

आशिष शेलारांची मागणी

    09-Jul-2024
Total Views |
 
Ashish Shelar
 
मुंबई : बेस्टमधील भंगार भ्रष्टाचाराची चौकशी करा, अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मंगळवारी सभागृहात केली. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून शेलारांनी बेस्ट बसमधील भंगार घोटाळ्याचा प्रश्न सभागृहात मांडला. दरम्यान, यावर मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले.
 
आशिष शेलार म्हणाले की, "बेस्टच्या भंगाराचा विषय फक्त बसपुरता नाही. आपल्या मतदारसंघात बेस्ट भवन आहे. त्यामुळे आपण यावर कडक निर्देश द्यावे," अशी मागणी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याकडे केली. "मुंबई शहरात फिरुन फिरून भंगार विक्रेते काँट्रॅक्टर केवळ दोनच लोक येतात. दोनच कंपन्यांना ही कामे कशी मिळतात? दोनच कंपन्या वेगवेगळ्या नावाने वर्षानुवर्षे हे काम मिळवत आहेत का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
 
हे वाचलंत का? -  मुलींच्या शिक्षणासाठी क्रांतिकारी पाऊल! बावनकुळेंची प्रतिक्रिया
 
ते पुढे म्हणाले की, "बेस्टवर २५ वर्ष एकाच परिवाराच वर्चस्व राहिलं आहे. भंगारविक्रीमध्ये येणाऱ्या कंपन्या किती आहेत? त्यांचे मालक कोण आहेत? एकाच मालकाच्या अनेक कंपन्या आहेत का? आणि त्यांनाच काम मिळतं का? याबद्दलची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावर मंत्री उदय सामंत यांनी उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करण्याचे आश्वासन दिले.