दमदार पावसाने मुंबईकर सुखावले, मात्र चाकरमान्यांचे हाल!

    08-Jul-2024
Total Views |
mumbai city heavy rain

 
मुंबई :      मुंबईत रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे उकाड्याने हैराण झालेले मुंबईकर सुखावले. पण सकाळी पावसाचा रुद्रावतार, अनेक भागात साचलेले पाणी आणि वाहतूककोंडी, लोकलसेवा ठप्प झालेली पाहून चाकरमान्यांना मात्र पावसामुळे आवड्याच्या पहिल्याच दिवशी हाल सोसावे लागले.

दरम्यान दि. ७ जुलै रोजी मध्यरात्री ते दि. ८ जुलैला सकाळी ७ वाजेपर्यंत ३०० मिमी पावसाची नोंद झाली होती. तसेच त्यादिवशी संध्याकाळी प्रादेशिक मौसम केंद्र, कुलाबाने जारी केलेल्या पत्रकानुसार, मुंबईत अत्यंत जोरदार पाऊस झाला असून २०४.५ मिमीपेक्षा अधिक पावसांची नोंद करण्यात आली. दरम्यान विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग,रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट ही जारी केला.

या जोरदार पावसामुळे मध्य आणि हार्बर लोकलसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे रेल्वे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी जमली. तसेच विविध परिसरातील सकल भागात पाणी साचल्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली. काही खाजगी कंपन्यांनी वर्क फॉर्म होमचा मार्ग स्विकारला.


मुंबईची तुंबई!
 
मुंबई शहरात हिंदमाता,गांधी मार्केट आणि पुर्व उपनगरात अस्लफा लास्टा बस स्टॉप,साबळे नगर, नेहरू नगर,शितल तलाव,कुर्ला रेल्वे स्टेशन, सुधा जंक्शन-कुर्ला,गौरी शंकर नगर,एम जी रोड जंक्शन-घाटकोपर,त्रिमुर्ती सोसायटी- चुनाभट्टी,वेलकम हॉटेल- घाटकोपर या भागात तसेच पश्चिम उपनगरातील अंधेरी सबवे,खास सबवे,मिलन सबवे,एअर इंडिया कॉलनी,आकृती मॉल-अंधेरी, गुलमोहर इर्ला जंक्शन,नेताजी पालकर रोड,मालवणी बस डेपो इत्यादी भागात जोरदार पावसामुळे पाणी साचले. दरम्यान काही वेळानंतर या ठिकाणच्या पाण्याचा निचरा संथ गतीने होत आहे.


पवई तलाव ओव्हर फ्लो!

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा पवई तलाव दि. ८ जुलै रोजी पहाटे ४:४५ वाजताच्या सुमारास ओव्हर फ्लो झाला. हा तलाव ओव्हर फ्लो झाल्यानंतर मिठी नदीला जाऊन मिळतो. ५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे नागरिकांना पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी वापरले जाते. या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८९० मध्ये पूर्ण झाले असून तेव्हा बांधकामासाठी सुमारे १२.५९ लाख रुपये एवढा खर्च आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.६१ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे २.२३ चौरस किलोमीटर एवढे असते. गेल्या तीन दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली.
 
 
मुंबईत सरासरी पावसाची नोंद

मुंबई शहर - ११५.६३ मिमी
पूर्व उपनगर- १६८.६८ मिमी
पश्चिम उपनगर- १६५.९३ मिमी


धरणांतील आतापर्यंतची पाणी पातळी \ उपयुक्त पाण्याचा साठा टक्केवारीत

१) अप्पर वैतरणा -५९४.६४ मी \ २५.४५ टक्के
२) मोडक सागर- १५१. ९१ मी \ ३५.८५ टक्के
३) तानसा- १२३.५७ मी \ ४०.६९ टक्के
४) मध्य वैतरणा- २५०.०० मी \ १९. ५१ टक्के
५)भातसा- ११३.३७ मी \ ३६.१७ टक्के
६) विहार- ७६.१९ मी \ ३१.७४ टक्के
७) तुळशी- १३५.४६ मी \ ४५.५१ टक्के