विमा कंपन्यांच्या प्रीमियममध्ये २३ टक्क्यांनी वाढ!

    08-Jul-2024
Total Views |
insurance company premium raised

 
नवी दिल्ली :        देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी असलेल्या एलआयसीच्या धारकांमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. विमा कंपन्यांच्या प्रीमियममध्ये चालू आर्थिक वर्ष २०२५ च्या एप्रिल-जून कालावधीत सुमारे २३ टक्के वाढ झाली आहे, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील विमा कंपन्यांच्या प्रीमियममध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, लाइफ इन्शुरन्स कौन्सिलने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, नवीन व्यवसाय प्रीमियम (एनबीपी) दरवर्ष २२.९१ टक्क्यांनी वाढून चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ८९,७२६.७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षी ७३,००४.८७ कोटी रुपये इतका नोंदविला गेला होता.

सरकारी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी)ने दि. ३० जून २०२४ रोजी संपलेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत २८.११ टक्के वाढ नोंदवून ग्रुप प्रिमियससह ५७ हजार कोटी रुपयांची नोंद केली होती. एलआयसी, ग्रुप इन्शुरन्स विभागातील मार्केट लीडर, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात एप्रिल-जून तिमाहीत ग्रुप सिंगल प्रीमियममध्ये ३३.४९ टक्क्यांनी वाढ होऊन ती ४४ हजार कोटी रुपये इतके झाले आहे.

विशेष म्हणजे खाजगी क्षेत्रातील विमा कंपन्यांच्या प्रीमियममध्ये १४.६२ टक्के वाढीसह २८,१६७.६६ कोटींवरून ३२ हजार कोटींवर पोहोचला आहे. यात प्रामुख्याने खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी विमा कंपनी एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रीमियममध्ये १३ टक्के वाढ नोंदवत ७,०३२.६९ कोटी रुपये झाली आहे. तर ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने प्रीमियममध्ये २३.५ टक्के वाढ नोंदवून ३,७६८.५५ कोटी रुपयांची नोंद केली आहे.