आता नाक्या-नाक्यांवर होणार वाहनचालकांची कसून तपासणी

"ड्रंक अँड ड्राईव्ह" रोखण्यासाठी खरबदारी; नियमांचे उल्लंघन करणारे पब्ज, बार, रेस्टॉरंट रडारवर

    08-Jul-2024
Total Views |

चौकशी
 
मुंबई : मुंबईतील 'ड्रंक अँड ड्राईव्ह'ची प्रकरणे रोखण्यासाठी रस्ते, चौक, वर्दळीची प्रमुख ठिकाणे यांसह नाक्या-नाक्यांवर वाहनचालकांची तपासणी करून कठोर कारवाया कराव्यात, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार, दि. ८ जुलै रोजी मुंबई पोलीस आयुक्तांना दिली. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब्ज आणि बारवरही कारवाया करण्यात याव्यात, असे निर्देश त्यांनी मुंबई महापालिकेसह पोलीस प्रशासनाला दिले.
 
विशेषत: रात्रीच्या वेळेस, तसेच विकेंडच्या दिवशी तापासण्यांचे प्रमाण वाढविण्यात यावे. मद्य सेवन करुन वाहने चालविणाऱ्या चालकांवर कडक कारवाई आणि दंडाची वसुली करण्यात यावी. त्याचबरोबर नियमाचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात यावी. अशा 'हॅबिच्युअल' वाहनचालकांचे लायसन्स रद्द करण्यात यावे. मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनाने शहरातील पब्ज, बार आणि रेस्टॉरंट्सची नियमीत तपासणी करावी. पब्ज, बार, रेस्टॉरंट चालू ठेवण्याच्या वेळा, ध्वनी प्रदुषण रोखण्याचे नियम, आवश्यक परवाने यासंदर्भात वेळोवेळी तपासण्या करण्यात याव्यात.
 
रात्री उशीरा चालू राहणारे बार, पब्ज आणि रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात यावी, त्यांचे लायसन्स रद्द करण्यात यावेत. महापालिका आणि पोलीस प्रशासनाने यासाठी समन्वयाने काम करावे, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. मद्य सेवन करुन वाहने चालविण्याच्या होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात यावी. लोकांची सुरक्षीतता आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन होण्याच्या अनुषंगाने अशा प्रकरणी सर्व संबंधीत प्रशासकीय यंत्रणांनी कडक कारवाई करावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.