मुंबई तुंबली! सहा तासांत ३०० मिमी पाऊस, यलो अलर्ट जारी

    08-Jul-2024
Total Views |

Rain
 
मुंबई : रविवारी रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई तुंबली असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेवरील लोकल सुविधा खोळंबली आहे तर अनेक स्थानकांवर पाणी साचले आहे. वेस्टर्न आणि हार्बर लाईनवरील लोकललादेखील या पावसाचा जोरदार फटका बसला आहे. दरम्यान, मुंबईत आज दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 
 
रेल्वे स्थानकांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सेवा मंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी बसने प्रवास करण्यासाठी गर्दी केली असून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीदेखील झाली आहे. अनेक रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुंबईत झालेल्या पावसामुळे अनेक शाळांना सुटी देण्यात आली आहे. याशिवाय पावसामुळे महालक्ष्मी एक्सप्रेस चार ते पाच तासांपासून अंबरनाथमध्ये अडकली आहे. मुंबईतील अनेक घरांमध्येही पाणी शिरलं आहे. मुंबईकरांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.