एक्सप्रेस रद्द, लोकल ठप्प! मुंबईत पावसामुळे प्रवाशांचे हाल

    08-Jul-2024
Total Views |
 
Rain
 
मुंबई : मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या असून लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. रविवारी रात्री १ वाजतापासून सकाळीपर्यंत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर प्रचंड पाणी तुंबले आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
 
आज सकाळी कोल्हापूर-महालक्ष्मी एक्प्रेस ४ ते ५ तास अंबरनाथमध्येच रखडली होती. दरम्यान, ही गाडी सायडिंगला उभी केल्याने प्रवाशांचे हाल झाले. तर दुसरीकडे सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस आणि प्रगती एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
 
हे वाचलंत का? -  गरज असेल तरच घराबाहेर पडा; मुख्यमंत्री शिंदेंच्या नागरिकांना सूचना
 
रविवारी मध्यरात्रीपासून मुंबईत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. दादर, सायन, कुर्ला, चुनाभट्टी रेल्वे स्थानक परिसरात पाणी तुंबले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील गाड्या उशीराने धावत असल्याने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली आहे.
 
दरम्यान, प्रशासनाकडून रेल्वे ट्रॅकवरील पाणी काढण्याचं काम सुरु असून लवकरच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे अनेकांनी बसस्थानकांवर गर्दी केली आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतूककोंडी झाली आहे.