धक्कादायक! लोकलमधून पडून महिला गंभीर जखमी, दोन्ही पाय गमावले

    08-Jul-2024
Total Views |
 
Local
 
मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबई हादरली असतानाच एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. एक महिला लोकलमधून रुळावर पडली आणि तिच्या अंगावरून एक डबा गेला. दरम्यान, यात तिचे दोन्ही पाय गेल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे सगळीकडे एकच गोंधळ उडाला आहे.
 
रविवार, ७ जुलै रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रेल्वे स्थानकांवर पाणी साचले होते. त्यामुळे काही एक्सप्रेस गाड्या कॅन्सल झाल्या तर लोकल सेवा ठप्प पडली आहे. दरम्यान, सकाळी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. अशातच सीबीडी बेलापूर स्थानकावर एक गंभीर घटना घडली आहे.
 
हे वाचलंत का? -  मुंबईतील नालेसफाई कामांची श्वेतपत्रिका काढा!
 
सीबीडी बेलापूर स्थानकावर एक महिला लोकलमधून रुळावर पडली. या अपघातात तिच्या अंगावरून रेल्वेचा एक डबा गेला. दरम्यान, या महिलेचा जीव वाचला असला तरी तिचे दोन्ही पाय गुडघ्यापासून तुटले असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी महिलेला बाहेर काढल्यानंतर रेल्वे पोलिसांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेचा व्हिडीओही पुढे आला आहे. दरम्यान, या अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली.