वालधुनी नदीच्या संवर्धनासाठी अर्थसंकल्पात तरतूद करा

आमदार विश्वनाथ भोईर यांची मागणी

    08-Jul-2024
Total Views |

vishwanath bhior
 
 
 
 
कल्याण : अंबरनाथ, उल्हासनगरसह कल्याण शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या वालधुनी नदीच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्याची मागणी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी ही मागणी करत गेल्या दशकभरापासून प्रलंबित असणाऱ्या वालधुनी नदीच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.
 वालधुनी नदीतील गाळ काढून खोलीकरण करा...
कल्याण शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या या वालधुनी नदीला आज अक्षरशः नाल्याचे रुप प्राप्त झाले आहे. अंबरनाथ, उल्हासनगर मधून कल्याणमध्ये येईपर्यंत या नदीमध्ये एकीकडे ड्रेनेजचे पाणी तर दुसरीकडे रासायनिक कारखान्यांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वालधुनी नदीची अवस्था बिकट झाली असल्याचे आमदार भोईर यांनी सांगितले. तसेच परिणामी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वालधुनी नदी संवर्धन प्रक्रियेसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी करत या नदीतील गाळ काढून ती स्वच्छ करावी, तिचे खोलीकरण करावे. जेणेकरून या नदीच्या काठावर असलेल्या घोलप नगर, भवानी नगर, योगिधाम आदी मोठमोठ्या गृहसंकुलांना पावसाळ्यात पुराचा वेढा पडणार नाही आणि मोठा दिलासा मिळेल अशी माहितीही त्यांनी सभागृहाला दिली. आणि या नदीच्या संवर्धनासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची आग्रही मागणी करत दशकभरापासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले.
 गेल्या दशकभरापासून वालधुनी नदीचा प्रलंबित प्रश्न...
मुंबईतील मिठी नदीच्या २००५ सालच्या महापुरानंतर तेथे ज्याप्रकारे प्राधिकरण स्थापन करण्यात आले. त्याच धर्तीवर वालधुनी नदी प्राधिकरणाची घोषणा तत्कालीन राज्य सरकारकडून करण्यात आली होती. त्यानुसार स्थापलेल्या वालधुनी नदी विकास प्राधिकरण समिती आणि उपसमितीने २०११ साली एक अहवाल सादर केला होता. त्यानुसार या कामी ६५० कोटींचा खर्च अपेक्षित होता. परंतु हा निधी अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आवाक्याबाहेर असल्याने तो राज्य सरकारने उपलब्ध करून देण्याची मागणी वारंवार झाली आहे. आमदार विश्वनाथ भोईर यांनी पुन्हा एकदा हा महत्त्वाचा विषय राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडत सरकारचे लक्ष वेधले आहे.