रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने कल्याण डोंबिवलीकरांनी वळविला बस-रिक्षाकडे मोर्चा

    08-Jul-2024
Total Views |

railway
 
कल्याण : अतिवृष्टीमुळे ठाणे ते मुंबई दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचले असून या ठिकाणची रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे सकाळच्या सुमारास चाकरमान्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. सकाळी ११.३० च्या सुमारास पुन्हा रेल्वे सेवा सुरळीत करण्यात आली होती. मात्र रेल्वे रुळावर उशीराने धावत होती. सायंकाळी देखील दोन्ही मार्गावरील वरील रेल्वे उशीराने धावत होती.‌ त्याचा परिणाम कर्जत ते ठाणे, कसारा ते ठाणे या दरम्यानच्या रेल्वे वाहतूकीवर झाला. ठप्प झालेली रेल्वे वाहतूक पाहता प्रवाशांनी बस आणि रिक्षाकडे आपला मोर्चा वळवला. मात्र त्यांना रस्ते वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
 
रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाल्याने काही प्रवाशांनी कर्जत कसाऱ्या हून कल्याण गाठले. कल्याणला येईपर्यंत ठाण्याच्या पूढे रेल्वे वाहतूक ठप्प असल्याने काही चाकरमान्यांनी पुन्हा कल्याणहून घरी परत जाणे पसंत केले. तर काही प्रवाशांनी भिवंडी बायपास मार्गे ठाणे, मुंबई गाठण्याचा प्रयत्न केला. तसेच पनवेल, नवी मुंबई या दिशेला जाणाऱ्या प्रवाशांनी बस रिक्षा आणि खाजगी ओला उबेरचा आसरा घेतला. प्रवाशंच्या नशीबी सोमवारी ही पुन्हा हालआपेष्टाच आल्या. रविवारी कसारा आसनगाव दरम्यान रेल्वेच्या पेंटाग्राफचा पोल तुटल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले हाेते. त्यामुळे कल्याण ते कसारा दरम्यान रविवारीचा दिवसही प्रवाशांकरीता त्रासाचा ठरला होता. सोमवारी पुन्हा रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने त्याचा त्रास दुसऱ्या दिवशीही सहन करावा लागला.
 
कल्याण बस डेपोतून प्रवाशींनी नाशिक, पनवेल, नवी मुंबई, भिवंडी बायपासकडे जाणाऱ्या बस पकडण्याकरीता गर्दी केली होती. तसेच टिटवाळ्याकडे जाणाऱ्या बसेसलाही प्रवाशांची गर्दी होती. केडीएमटी आणि एनएमटीच्या बसेसलाही प्रवाशांची गर्दी होती. बसला होत असलेली गर्दी पाहून काहींनी रिक्षा आणि टॅक्सीचा आधार घेतला. रिक्षा चालकांनी प्रवाशांकडून जास्तीचे भाडे वसूल केले. प्रवाशांनी रिक्षा टॅक्सी, बसचा पर्याय निवडला पण रस्ते कल्याण भिवंडी बायपास, कल्याण शीळ फाटा रस्त्यावर वाहतूक काेंडी असल्याने प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
 
विठ्ठलवाडी बस डेपोचे व्यवस्थापक महेश भोये यांनी सांगितले की, रविवारी काही विशेष गाड्या सोडल्या होत्या. सोमवारी सोडलेल्या नाहीत. कल्याण बस डेपोचे व्यवस्थापक सुनिल चौरे यांनीही तेच सांगितले. कल्याण बस डेपोतून रविवारी नाशिकच्या दिशेने विशेष गाड्या सोडल्या होत्या. सोमवारी तसे काही नियोजन नव्हते. केडीएमटीचे व्यवस्थापक दीपक सावंत यांनी सोमवारी विशेष गाड्या चालविल्या नाहीत. मात्र बसेसला प्रवाशांची गर्दी होती असे सांगितले.