जल साठवण टाक्या, मायक्रो टनेलमुळे पाणी निचरा होण्यास मदत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा!

    08-Jul-2024
Total Views |
Eknath Shinde on Mumbai rain

मुंबई : हवामान खात्याने मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला असून राज्य आपत्ती नियंत्रण विभाग, मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासन एकत्रितपणे काम करून मुंबईकरांना दिलासा देण्याचं काम करत आहेत. मुंबई दि. ७ जुलैच्या रात्रीपासून २६७ ते ३०० मिलिमीटर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. दरम्यान नागरिकांच्या मदतीला सर्वेाच्च प्राधान्य दिले जात असून, सर्व यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि. ८ जुलै रोजी दिली. मुंबईतील सुमारे ५ हजार ठिकाणांवर मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवण्यात येत आहे. महानगरपालिकेचे अधिकारी फिल्डवर असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने रेल्वे मार्ग आणि चुना भट्टी, सायन याभागात पाणी साचले. साचलेल्या पाण्याचा निचरा तातडीने होण्यासाठी रेल्वेने आणि मुंबई महानगरपालिकेने पंप बसविले आहेत. मुंबईत सात ठिकाणी पंपिंग स्टेशन करण्यात येत असून नागरिकांना मदतीसाठी यंत्रणा सज्ज आहे. या जल साठवण टाक्या तयार केल्यामुळे यंदा मिलन सबवे, हिंदमाता भागात पाणी साचले नसल्याचे सांगत मायक्रो टनेलिंग सारखा प्रयोग देशात पहिल्यांदा केल्यामुळे निचरा होण्यासाठी मदत होत आहे, असे ही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव (मुख्यमंत्री कार्यालय) इकबाल सिंह चहल, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. आश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलीन सावंत, सहआयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर व व रेल्वे प्रशासनाचे संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.