विशाळगड अतिक्रमणमुक्तीसाठी ‘सकल हिंदू समाज’ आक्रमक

पायथ्याशी महाआरती; ‘वक्फ’ बोर्डाच्या जमिनीवर मंदिरे बांधण्याचा इशारा

    08-Jul-2024
Total Views |

हिंदू समाज
 
कोल्हापूर : विशाळगडाच्या पायथ्याशी ‘सकल हिंदू समाजा’च्यावतीने महाआरती करण्यात आलेली आहे. विशाळगड अतिक्रमणमुक्त व्हावे यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून या प्रकरणावर जलदगतीने सुनावणी व्हावी, अशी मागणी यावेळी ‘सकल हिंदू समाजा’च्यावतीने करण्यात आली आहे. “अतिक्रमण हटवा अन्यथा ‘वक्फ’ बोर्डाच्या जमिनीवर मंदिरे बांधू,” असा इशारा ‘सकल हिंदू समाजा’कडून देण्यात आला आहे.
 
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर असलेले अतिक्रमण काढले जावे, या मागणीकरिता आता शिवप्रेमींकडून ‘विशाळगड मुक्तिसंग्राम’ मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.‘विशाळगड मुक्तिसंग्रामा’चा भाग म्हणून रविवार, दि. 7 जुलै रोजी विशाळगडाच्या पायथ्याशी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या महाआरतीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातीलच नाही, तर राज्यातील हजारो शिवभक्त विशाळगडाच्या पायथ्याशी दाखल झाले होते. या मोहिमेत पुरुष, महिला आणि तरुणांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला.
100 पेक्षा अधिक अतिक्रमणे
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा गाजत आहे. विशाळगडावर जवळपास 100पेक्षा अधिक अतिक्रमणे असल्याचा दावा शिवप्रेमींकडून केला जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीदेखील अनेक वर्षांपासून केली जात आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, परंतु हे अतिक्रमण तत्काळ काढले जावे, अशी मागणी हिंदू समाजाकडून केली जात आहे. महाआरतीमध्ये पुरुष, महिला, तरुणांनी हातात फलक आणि भगवे झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याचे हे शेवटचे आंदोलन असल्याचे शिवप्रेमींकडून सांगण्यात आले आहे.
‘चलो विशाळगड’ या मोहिमेची घोषणा
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “विशाळगडावरील अतिक्रमण हे मोठे संकट आहे. ते अतिक्रमण सरकारने हटवावे, अशी आम्हा सर्व शिवभक्तांची आणि राज्यातील जनतेची मागणी आहे. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज दि. 12 जुलैच्या रात्री पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटले आणि दि. 13 जुलै रोजी विशाळगडावर गेले, त्याचपद्धतीने आम्ही सर्व शिवभक्त दि. 13 जुलै रोजी विशाळगडावर जाणार आहोत. आम्ही तेथे जाऊन काय करणार ते आता सांगणार नाही. तेथील अतिक्रमण हटवावे, यासाठी आम्ही ‘चलो विशाळगड’ या मोहिमेची घोषणा केली आहे.”
मी आदेश देत नाही
संभाजीराजे म्हणाले, “आता कोणी राजा-महाराजा नाही. त्यामुळे मी आदेश देत नाही. सर्व शिवभक्तांना केवळ आवाहन करत आहे की, आम्ही सर्वजण विशाळगडावर जाणार आहोत. तुम्हीदेखील आमच्याबरोबर या. विशाळगडावरील अतिक्रमण हटवले जावे, एवढीच आमची मागणी आहे. सर्व शिवभक्तांनी जास्तीत जास्त संख्येने आमच्याबरोबर एकत्र या. 1947 सालच्या आधी छत्रपती आदेश देत होते. मी केवळ एक शिवभक्त म्हणून विशाळगडावर जात असून इतर शिवभक्तांनी माझ्याबरोबर यावे, असे मी आवाहन करत आहे.”
कत्तलखाना बंद व्हावा
“छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ला असताना येथे मद्यपान केले जाते. कत्तलखाना बंद व्हावा, अशी आम्ही मागणी केली. महाशिवरात्रीच्या आधी सगळे अतिक्रमण काढू, असे आश्वासन दिले आणि काम चालू केले. पण, तातडीने त्याला न्यायालयात जाऊन स्थगिती देण्यात आली. त्यामुळे अतिक्रमण काढणे बंद झाले. आता शिवभक्त प्रश्न विचारू लागले की, राजे तुम्ही का भूमिका घेत नाही? मला आनंद आहे की, पुन्हा ही चळवळ सुरू झाली आहे,” असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. “कोणी अतिक्रमण केले, कोणत्या गोष्टीचे अतिक्रमण केले हे शासनाला माहिती आहे. दोन्ही बाजूने झालेले अतिक्रमण काढावे, अशी माझी मागणी आहे.’