मुख्यमंत्री लाडक्या बहिणींना मोठा दिलासा!

मुंबई बँकेत झिरो बॅलन्स अकाऊंट ओपनिंग

    07-Jul-2024
Total Views |
mumbai district bank account


मुंबई :      मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता झिरो बॅलन्स अकाऊंट ओपनिंगची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी दिली आहे. मुंबई जिल्हा बँकेच्यावतीने मुंबई जिल्हा बँकेत अकाऊंट उघडण्यासाठी पैसे भरण्याची आवश्यकता नसून झिरो बॅलन्स अकाऊंट उघडण्याचा निर्णय मुंबई जिल्हा बँक घेत आहे. तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत अर्ज करणाऱ्या महिलांनी मुंबई जिल्हा बँकेच्या जवळच्या शाखेत आपले अकाऊंट उघडावे आणि या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी केले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार प्रविण दरेकर यांना झिरो बॅलन्स उघडण्याकरिता सूचित केले होते. त्यानुसार मुंबई जिल्हा बँक झिरो बॅलन्स अकाऊंट उघडण्याचा निर्णय घेत प्रसारमाध्यमातून अकाऊंट ओपनिंगकरिता खासगी किंवा राष्ट्रीय बँकांत हजार रुपये लागत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दरेकर यांच्याशी संपर्क साधून मुंबई शहर आणि उपनगरांत झिरो बॅलन्स अकाऊंट सुरू करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार हा निर्णय करण्यात आला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य, कष्टकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.