आता मोदी सरकारच्या 'या' योजनेद्वारे मिळणार १० लाखांचे विमा कवच?
07-Jul-2024
Total Views |
नवी दिल्ली : मोदी सरकारच्या कार्यकाळातील अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी योजना म्हणजे आयुष्यमान भारत योजना. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील प्रत्येक नागरिकाला उत्तमोत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. दरम्यान, आता आयुष्यमान भारत योजनेत मोठ्या बदलांची शक्यता आहे.
दरम्यान, केंद्र सरकारकडून येत्या २३ जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामण केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात आयुष्यमान योजनेबाबत नवे बदल दिसून येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आयुष्यमान योजनेतील विमा संरक्षण मर्यादा आता १० लाख रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहेत.
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात 'आयुष्मान भारत-PMJAY' योजनेत बदल करण्याची तयारी सुरू आहे. सरकार अर्थसंकल्प २०२४ मध्ये त्या अंतर्गत उपलब्ध आरोग्य विमा संरक्षण दुप्पट करण्याचा विचार करत आहे, अशी चर्चा सध्या सुरू आहे. पीटीआयच्या अहवालानुसार, एनडीए सरकार लाभार्थ्यांची संख्या आणि आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची विमा रक्कम दोन्ही वाढविण्याचा विचार करत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आयुष्यमान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारी कव्हरेज मर्यादा प्रति वर्ष ५ लाख रुपयांवरून १० लाख रुपये करण्याची तयारी केंद्र सरकारकडून सुरू आहे. अहवालानुसार, एनडीए सरकार आपल्या प्रमुख आयुष्मान भारत आरोग्य विमा योजनेअंतर्गत पुढील तीन वर्षांत लाभार्थी संख्या दुप्पट करण्याचा विचार करत असल्याचेही बोलले जात आहे.