अनधिकृत फेरीवाल्यांचे हजारोंची साधनसामग्री जप्त

    07-Jul-2024
Total Views |
 hawkers equipment
 
मुंबई : महापालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरुच ठेवला आहे. ‘फेरीवालामुक्त परिसर’ मोहीम अंतर्गत दि. १८ जून ते दि. ४ जुलैपर्यंत १७ दिवसात विविध विभागात अतिक्रमण निर्मूलन कारवाई पार पडली. या कारवाईत फेरीवाल्यांकडून सुमारे ५ हजार ४३५ साधनसामुग्री जप्त करण्यात आली आहे. त्यात १ हजार १८६ चारचाकी हातगाड्या, १ हजार ८३९ घरगुती गॅस सिलिंडर आणि २ हजार ४१० इतर विविध प्रकारच्या साहित्याचा समावेश आहे.
 
मुंबईकरांना पदपथ आणि रस्त्यांचा वापर करताना अडथळा ठरणार्या तसेच आरोग्यासाठी अपायकारक अशा पद्धतीने उघड्यावर अन्न पदार्थांची विक्री करणार्या फेरीवाल्यांविरोधात महापालिकेमार्फत सातत्याने कारवाई केली जाते. त्यासंदर्भातील निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका प्रशासन आणि मुंबई पोलीसांची संयुक्त कार्यवाही सुरू आहे. या कारवाईत चारचाकी हातगाड्या, सिलिंडर आणि स्टोव्ह, शेगडी, बाकडे, शॉरमा मशीन्स आदी जप्त करण्यात आले आहेत.