पवारांचा ‘बिब्बा’

    07-Jul-2024
Total Views |
MLA Rohit Pawar
विश्वविजेत्या भारतीय संघाची भव्य मिरवणूक नुकतीच मायानगरी मुंबईत झाली. मुंबईकरांनी प्रचंड गर्दीने विश्वविजेत्यांचे स्वागत केले. त्यावेळी पूर्ण मुंबई राष्ट्रभक्तीच्या भावनेने उत्कटतेचा आनंद घेत होती. देशात अशी राष्ट्रभक्तीची भावना प्रबळ झाली, की काहींच्या पायाखालची जमीन हलू लागते. मग, ते आनंदात ‘बिब्बा’ घालण्याचे काम करतात. त्याच कंपनीची एजन्सी घेतल्यासारखे रोहित पवार गेले कित्येक दिवस वागत आहेत. तो आनंदाचा दिवसदेखील रोहित पवारांनी सोडला नाही. मुंबईत गुजरातची बस कशाला, असा सवाल उपस्थित करून विनाकारणच औचित्यभंगाचा प्रकार केला. गुजरातविषयी त्यांच्या मनातला आकस खरा आहे का ? हाच प्रश्न मुंबईकरांना त्या दिवसापासून सतावत आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत गुजरातवर टीका करणारे रोहित पवार, एका गुजराती उद्योगपतीच्या गाडीचे सारथ्य करताना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले होते. त्यांचे रोहित पवारांच्या आजोबांबरोबर संबंधही चांगले आहेत. मग, तुम्हाला सलोखा ठेवण्यासाठी गुजराती उद्योगपती चालतात, मग गुजराती बस का चालत नाही.
 
बरं, गुजरातविषयीचा आकस हा काही आजचा नाही, महानंद डेअरी प्रकरणातसुद्धा रोहित पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचा उघड प्रयत्न केला. महानंद हा प्रकल्प आता गुजरातला जाणार अशी आवई त्यांनी उठवली. मात्र, सत्य परिस्थिती वेगळीच निकाली. या मंडळाचीसंकल्पना लालबहादूर शास्त्री यांनी मांडली होती. मात्र, त्यावेळी रोहित पवार यांचा जन्म झाला नसल्याने त्याविषयी त्यांना माहिती असण्याची काहीएक गरज नाही. महानंदची फक्त जबाबदारी व्यवसाय किफायतशीर करण्यासाठी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे देण्यात आली आहे. हे मंडळ बुडणारा प्रकल्प वाचवण्याचे काम करते, तसा तिचा इतिहास सांगतो. मात्र, सहकारी तत्त्वावरच्या इतर डेअरींची उत्पादने महाराष्ट्रात तेजीत असताना, महानंदला घरघर लागण्याची वेळ का आली, यावर रोहित पवार सोयीस्कररित्या मौन बाळगून आहेत. या राज्यात माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी सतत बिब्बे कालवण्याने, काहींची पुढे राजकीय पतच घसरली. रोहित पवार तरुण आहेत. असे बिब्बे कालवण्याच्या नादात रोहित पवार यांच्यावर अशी वेळ येऊ नये, हीच सदिच्छा.
लाचारी सुटेल का?
 
शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा काल छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकताच झाला. या संकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. त्यामध्ये या महाराष्ट्राची ओळख मी लाचारांचा महाराष्ट्र होऊ देणार नाही, आणि मी कधीही लाचारी करणार नाही, असा निर्णयवजा निश्चयदेखील त्यांनी जाहीर केला. अर्थात, उद्धवजी लाचारी करणार नाही, हे ऐकून उद्धवसैनिकांना आनंदच झाला असेल. गेले काही महिने खर्या अर्थाने दिल्लीत काँग्रेसच्या नाकदुर्या काढताना, हतबल उद्धव ठाकरे सगळ्यांनी पाहिले. काँग्रेसबरोबर हातमिळवणी केल्यानंतर एकेकाळच्या हिंदुत्ववादी म्हणून मिरवणार्या उद्धवसैनिकांनाही, खर्या अर्थाने द्विधा मनःस्थितीचा सामना करावा लागला तो उद्धव ठाकरे यांच्या या लाचारीपणामुळेच!
 
मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्राच्या विधानसभेतच हिंदुत्वावरच उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका ही लाचारीपणाची हद्दच होती.
 बरं यानंतर अनेकांनी यावर उघड असंतोष व्यक्त केल्यावर तरी सुधारणा व्हावी, पण चक्क ज्यांच्या आणाभाका खाल्ल्या, ज्यांच्या नावावर राजकारण चालवले त्या वडिलांच्या मागची हिंदुहृदयसम्राट ही पदवीच काढून टाकलीत, कशासाठी काँग्रेसला खूश करण्यासाठीच ना? सावरकरांवर काँग्रेसने केलेली टीकासुद्धा उद्धव ठाकरे तुम्ही शांतपणे सहन करत राहिलात, कशासाठी सत्तेसाठीच ना? इतकेच नव्हे, तर कालपरवा देशाच्या संसदेत विरोधीपक्षनेता म्हणून राहुल गांधी यांनी हिंदुत्वावर गरळ ओकली, त्यावेळी तर चक्क ’राहुल गांधी काय चुकीचे बोलले?’असे म्हणत त्यांचीच वकिली सुरू केलीत. उद्धव ठाकरे राममंदिराच्यावेळी तुमचे वागणे सर्वांनीच पाहिले होते, ते प्रत्येक हिंदूंच्या लक्षातही आहे. मात्र, ज्यावेळी श्रीराम मंदिर आंदोलनाचा आम्ही पराभव केला, असे राहुल गांधी म्हणतात, तेव्हा त्याविषयी राहुल गांधींना ठाकरे शैलीमधील टीका सोडा, साधा निषेध करण्याचे धाडस उद्धव ठाकरे तुम्ही दाखवू शकला नाहीत, हीच ती लाचारी. याच लाचारीमुळे महाराष्ट्राने पुन्हा एकदा अडीच वर्षे काँग्रेसला सहन केले. त्यामुळे तुम्ही लाचारी करणार नाही हे म्हटल्याने, काँग्रेसला विरोध करणार का? आणि तुमची लाचारीची सवय खरच सुटेल का? याचीच जिज्ञासा लागली आहे.
कौस्तुभ वीरकर