क्रीडाजगत - निर्वासितांचे अन् स्थलांतरितांचे...

    07-Jul-2024
Total Views |
 Olympic
 
निर्वासितांचे प्रश्न मोठे गंभीर असतात. एखादा माणूस मातृभूमीला पारका झाला की अनेक अडचणींचा सामाना त्याला करावाच लागतो. त्यात तो निर्वासित असेल तर हा त्रास अधिकच वाढतो. अशा निर्वासित आणि स्थलांतरितांच्या दु:खावर फुंकर घालण्यासाठी क्रीडाजगताकडून अनेक प्रयत्न केले जातात. त्या प्रयत्नांचा घेतलेला हा आढावा..
 
मनुष्य मग तो सामान्य जीवन जगणारा नोकरदार असो, उद्योगपती असो, समाजकारणी असो, कलाक्षेत्रातला असो अथवा क्रीडाक्षेत्रातला असो, प्रत्येक देशातील क्रीडाप्रेमींचे जीवन हे काही एकसारखे आनंददायी नसते. आपापल्या शैक्षणिक, अर्थिक, शारीरिक पार्श्वभूमीवर त्याची स्थिती जशी अवलंबून असते, तशीच ती मातृभूमीच्या परिस्थितीवरही अवलंबून असते. किंबहूना, ती देशावर आधिकच अवलंबून असते.
 
जोपर्यंत आपण आपल्या घरी, आपल्या कुटुंबात, आपल्या परिसरात, आपल्या देशात, निवास करत असतो, तेव्हा आपले जीवन आपण एक साचेबद्ध आणि स्वच्छंदी, मनमोकळेपणाने व्यतीत करत असतो. आपले संसारी जीवन सुरळीत चालणारे असेल, तर आपले क्रीडाजीवनही सुरळीत चालेल. आपण क्रिकेटमधे रस घेऊ, विम्बल्डन सामन्यांचा आनंद घेऊ, रॅकेट-फुलाचा खेळ पाहू, ऑलिम्पिक क्रीडाप्रकारांचा अनुभव घेऊ. कारण, आपण भारतीय, परकीयांच्या तुलनेत खरेच भाग्यवान आहोत. रशिया, युक्रेन, बेलारूस, सीरिया, इराण इत्यादी देशातील खेळाडूंचे क्रीडाजीवन बघितले, तर ती माणसे ते किती दुःखदायकरित्या व्यतीत करत असतील, हे समजेल.
 
‘सर्वे भवन्तु सुखिन’ : भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अधिपत्याखाली मांडलेला, ‘द सीटिझनशीप अॅमेंडमेंट अॅक्ट’ - ’सीएए’ अर्थात ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ भारताच्या संसदेने डिसेंबर २०१९ मध्ये मंजूर केला.१९५५ सालच्या मूळ कायद्यात सुधारणा करण्यात आलेला हा ’सीएए’ कायदा, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमध्ये हिंदू, ख्रिश्चन, शीख, पारसी, जैन यांच्यापैकी ज्यांचा पंथाच्या, धर्माच्या आधारावर छळ झाला, अशा अल्पसंख्याक समुदायाला जीवनाची नवी दिशा देणारा ठरला आहे. हा कायदा करून भारताने ’सर्वे भवन्तु सुखिनः।’ची भावना पुन्हा कार्यान्वित केली आहे.
 
धरतीवरील नंदनवन समजले जाणारे काश्मीर आज जरी बदललेले दिसत असले, तरी काही वर्षांपूर्वी तेथील जनतेने अनुभवलेले जीवन फारच क्लेशकारक होते. हे फक्त काश्मीरी पंडितांच्याच डोळ्यांतील अश्रू नव्हे, तर ते तेथील सामान्य क्रीडाप्रेमींच्याही डोळ्यांतील होते. अनेक क्रीडाप्रेमी पूर्वी स्थलांतरित, निर्वासित झाले, आणि आपल्या क्रीडाप्रेमावर त्यांना पाणी सोडावे लागले होते. कोरोनाच्या काळात लॉक डाउनमुळे असंख्य स्थलांतरित कामगारांचे झालेले स्थलांतर.
 
मणिपूरसारख्या प्रदेशातील वांशिक चळवळीतील निर्वासितांचा स्थलांतरणाचा प्रश्न, स्वातंत्र्याच्या काळात भारताची झालेली फाळणी, पाकिस्तान - बांगलादेश यांच्यात झालेली विभागणी, याने क्रीडाक्षेत्रालाही सोडलेले नाही. मग ते हॉकी असो, क्रिकेटमध्ये असो, अथवा अगदी ऑलिम्पिक असो, सगळ्यांनाच याचे परिणाम भोगावे लागले. तर थोडक्यात, स्थलांतरण, निर्वासित ही एक जागतिक व्यथा नेहमीच भेडसावताना दिसत असते.
 
जागतिक निर्वासित दिन : दरवर्षीप्रमाणेच, यावर्षीही दि. २० जून रोजी, जागतिक निर्वासित दिन जगभरात साजरा झाला. हा दिवस शरणार्थी, निर्वासित झालेल्या लाखो लोकांना समर्पित असतो. ज्यांना त्यांच्या आयुष्यात संघर्ष, छळ, हिंसा, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर प्रकारच्या मानवी हक्क उल्लंघनामुळे त्यांना आपले घरदार सोडून जाण्यास भाग पाडले जाते. हा दिवस त्यांच्या परिस्थितीची एक महत्त्वाची आठवण असतो. त्यांचा सन्मान करण्याचा, त्यांच्या हक्कांसाठी वकिली करण्याचा, आणि प्रत्येकाला स्वगृही नेण्यासाठी प्रयत्न करण्याचा हा दिवस असतो.
 
‘अशा जगासाठी जिथे निर्वासितांचे स्वागत आहे’ ही जागतिक निर्वासित दिन २०२४ची अधिकृत संकल्पना आहे. ही संकल्पना निर्वासितांना पाठिंबा देण्यासाठी, जागतिक एकतेची गरज अधोरेखित करते. छळातून वाचण्यासाठी पळून जाणार्यांसाठी, आश्रय मिळण्याची खात्री करणे आणि यजमान राष्ट्रांमध्ये स्वागतार्ह वातावरण निर्माण करणे, हेदेखील हा दिन साजारा करताना लक्षात ठेवले जाते.
 
निर्वासितांच्या स्थितीशी संबंधित,१९५१च्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनाच्या ५०व्या वर्धापन दिनानिमित्त, दि. २० जून २००१ रोजी पहिला ’जागतिक निर्वासित दिन’ साजरा करण्यात आला. या जागतिक निर्वासित दिनाची प्रथा, दक्षिण आफ्रिकेत प्रथम सुरू झाली होती. हा दिवस आधी ‘आफ्रिका निर्वासित दिन’ म्हणून ओळखला गेला, आणि नंतर डिसेंबर २००० मध्ये, संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने अधिकृतपणे निर्वासितांसाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केला.
 
क्रीडाक्षेत्रात जागतिक निर्वासित दिन : जागतिक निर्वासित दिनाच्या, जून २०२४च्या काळातच क्रिकेटच्या २० षटकांच्या विश्वचषकाच्या स्पर्धा पार पडल्या. ’जागतिक निर्वासित दिन’ ज्या देशाने जगाला दिला, त्याच दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाला भारताकडून अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. त्याआधीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात द. अफ्रिकेने अफगाणिस्तानच्या संघाला पराभूत केले होते. क्रिकेटसह अनेक क्रीडाप्रकारांत निर्वासितांच्या वेदनेने ग्रासलेल्या देशांमधील, त्या अफगाणिस्तानचा संघ असाच ‘निर्वासितांचा संघ’ म्हणून ओळखला जात होता.
 
अफगाणिस्तानातून निर्वासित म्हणून आलेले लोंढे पाकिस्तानात, ‘रेफ्यूजी कॅम्प’मध्ये जगले. काहीजण याच छावण्यांत जन्माला आले, काहीजण तिथेच तरुण झाले. या तरुणांकडे अन्नपाणी नव्हते, निर्वासित म्हणून ते जगले. मात्र, तरीही त्यातल्या काहींनी, जिद्दीने क्रिकेटची मदत घेत आपले जीवन बदलले. फक्त तालिबान, सततची युद्ध, रेफ्युजी ही आता अफगाणिस्तानची ओळख राहिलेली नाही. क्रिकेट ही आता त्यांची नवीन ओळख बनते आहे. पुरुषांबरोबरच अफगाणिस्तानच्या महिला क्रिकेट संघाच्या माजी१७ सदस्यांनी, ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे’कडे ऑस्ट्रेलियामध्ये निर्वासित संघ स्थापन करण्यासाठी मदतीची विनंती केली आहे.
 
अफगाणिस्तान महिला क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान क्रिकेट संघटनेसह करार होता, २०२१ साली तालिबानच्या सत्तेवर परतण्यामुळे, आणि त्यांनी महिलांच्या खेळातील सहभागावर कठोर निर्बंध लादल्यामुळे, तो करार रद्द करण्यात आला. यामुळे अनेक खेळाडूंना परदेशातही आश्रय घ्यावा लागला होता. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेली ही वार्ता होती. त्यात अफगाण निर्वासितांचा संघ तयार केल्याने, आम्हाला सीमाविरहित क्रिकेट खेळण्याची, प्रशिक्षक आणि प्रशासनाची संधी मिळू शकते. हा संघ आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करू इच्छिणार्या सर्व अफगाण महिलांना, एका बॅनरखाली एकत्र येण्याची परवानगी देईल, एका अफगाणी निर्वासित खेळाडूनी पत्रात असे म्हटले आहे.
 
युकेत आरसीपी : ग्रेट ब्रिटनमध्ये २००९ साली निर्वासित युवकांच्या क्रिकेटसाठी, एक प्रकल्प निर्माण करण्यात आला आहे. ‘आरसीपी - रेफ्युजी क्रिकेट प्रोजेक्ट’ अर्थात ’निर्वासित क्रिकेट प्रकल्प’ या नावाचा तो प्रकल्प. निर्वासित युवकांना एकत्र आणणे, त्यांना इंग्रजी भाषा शिकवणे, आणि क्रिकेट खेळण्याची क्षमता सुधारणे, निर्वासित क्रिकेटपटूंच्या समस्यांबाबत मार्गदर्शन करणे, अशा उद्देशाने हा प्रकल्प स्थापण्यात आला. सध्या इंग्लंडमध्ये टेनिसचे सुप्रसिद्ध असे विम्बल्डन चालू आहे. भारतासह सारे जग त्या खेळाचा आनंद घेत आहे.
 
भारताच्या टेनिसपटूंनीही त्यात सहभाग घेतला आहे. एका बाजूला टेनिस कोर्टवर रंगणारे, हिरवळीवर चेंडूने खेळले जाणारे युद्ध आपण अनुभवत असतो, तर दुसरीकडे बंदुका, तोफा आणि रणगाड्यांचे युद्धही रशिया, युक्रेन या देशांमध्ये चालू असते. त्याची झळ बसत असते ती, निर्वासित क्रीडाप्रेमींना. युक्रेनमधील निर्वासितांना २०२२च्या विम्बल्डन स्पर्धेसाठी ‘ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लब’ने मोफत तिकिटे देऊ केली होती. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे प्रभावित झालेल्यांना, भरघोस अशी देणगीदेखील देण्यात आली होती. या हल्ल्यानंतर विम्बल्डनने रशियन आणि बेलारशियन खेळाडूंना स्पर्धेत बंदी घातली आहे.
हे निर्वासित क्रिकेटमध्ये जसे आहेत, तसेच ते नेमबाजी आणि टेबलटेनिस, बॅडमिंटन क्रीडाप्रकारातही रस घेताना आढळतात.
 
‘शूटिंग’ आणि ‘निर्वासित’ : ‘शूटिंग’ आणि ‘निर्वासित’ हे शब्द सहसा एकमेकांशी जोडलेले असतात, परंतु, क्वचितच सकारात्मक संदर्भात. दोन ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यांनी मात्र ते बदलण्यासाठी हातमिळवणी केली होती. तीनवेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता इटलीचा निकोलो कॅम्प्रियानी, आणि भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा यांनी तरुणांमध्ये, आणि विशेषतः निर्वासितांमधील क्रीडा प्रतिभा विकसित करण्यासाठी आणि जोपासण्यासाठी ’टोकियो ऑलिम्पिक २०२०’च्या काळात एक मोठा उपक्रम केला होता. त्यात तीन निर्वासितांना प्रशिक्षण देण्यासाठी मदत केल्याचे उदाहरण आहे.
 
’सुचित्रा बॅडमिंटन अॅकॅडमी’ नामक हैदराबाद येथील संस्थेने, ईशान्येकडील वांशिक चळवळीचा फटका बसलेली स्थलांतरित, आणि विलक्षण गुणसंपन्न अशी१२-१३ वर्षांची युवती किमकीम खोंगसाई हिला प्रशिक्षण घेण्यास आदराने बोलावणे पाठवले होते. या अॅकॅडमीत उच्चस्तराचे प्रशिक्षण दिले जात असते, आणि त्यातूनच एखादी सायना नेहवाल देशाला मिळून जात असते.
 
ऑलिम्पिकमध्ये निर्वासितांचा संघ : निर्वासित झालेल्या देशोदशीच्या क्रीडापटूंचा एक ऑलिम्पिक संघ स्थापन होत असल्याची घोषणा, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी मार्च २०१६ मध्ये केली होती. जगभरात निर्वासित जीवन व्यतीत करणार्या अनेक क्रीडापटूंबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे, आणि ते सहन करत असलेल्या संकटांत त्यांच्या एकीला समाजाकडून पाठबळ मिळवण्यासाठी ती मोहीम सुरू केली. सदर मोहीम चिरंतन टिकून राहावी म्हणून, पाठोपाठ सप्टेंबर २०१७ मध्ये ’ऑलिम्पिक निर्वासित प्रतिष्ठाना’ची स्थापना करण्यात आली.
 
संयुक्त राष्ट्रसंघ मान्यताप्राप्त (एनओसी) राष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीकडून उतरलेले मूळ देशाचे निर्वासित खेळाडू, की ज्यांना ‘आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स फेडरेशन’ची मान्यता देण्यात आली आहे, अशी यादी २०१६ व २०२०च्या ऑलिम्पिकसाठी तयार करण्यात आली होती. यामध्ये विविध क्रीडाप्रकारांत बर्याच खेळाडूंची यादी होती. ती पुढील प्रकारची होती - केनिया - दक्षिण सुदान, लग्झेंबर्ग - इथिओपिया, ब्राझील - काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, बेल्जियम - सीरिया, जर्मनी - सीरिया, इस्त्रायल - सुदान, इस्त्रायल - झरिट्रिया, नेदरलॅण्ड - सीरिया, त्रिनिदाद आणि टोबॅगो - व्हेनेझुएला, जर्मनी - इराण, फ्रान्स - अफगाणिस्तान, स्वित्झर्लंड - सीरिया, कॅनडा - इराण, युनायटेड किंगडम - कॅमेरून, ऑस्ट्रिया - इराक इत्यादी. २०२४ची यादी अजून उपलब्ध झालेली नाही.
 
असे हे निर्वासितांचे आणि स्थलांतरितांचे क्रीडाजगत, त्या समुदायाला एक वेगळाच आनंद आणि त्यांना होत असलेल्या व्यथांपासून थोडा विरंगुळा देत असते. आपण सारे त्या समुदायाच्या व्यथा कमी करण्यात मदत करूया, आणि अशी वेळ परत कोणावर येऊ नये यासाठी संबंधितांवर दबाव आणून गुण्यागोविंदात वावरत सगळे एकसमान क्रीडाजीवन अनुभवत म्हणू -
सर्वे भवन्तु सुखिनः। सर्वे सन्तु निरामयाः॥
इति!
 
श्रीपाद पेंडसे 
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत)
९४२२०३१७०४