अयोध्येची पुनरावृत्ती गुजरातमध्ये केली जाईल, अशी दर्पोक्ती विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. यापूर्वी २०१७ तसेच २०२२ च्या निवडणुकांमध्येही त्यांनी तेथे भाजपचा पराभव करू, असे म्हटले होते. मात्र, तसे घडले नाही. नेहरू यांनीही रा.स्व.संघाला चिरडण्याची भाषा केली. प्रत्यक्षात त्यांना संघाचेच पाय पकडावे लागले, हा इतिहास आहे.
विरोधकांच्या इंडी आघाडीने, अयोध्येतील श्रीराम मंदिर आंदोलनाचा पराभव केला अशी दर्पोक्ती, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. एवढ्यावरच न थांबता ते असेही म्हणाले की, अयोध्येची पुनरावृत्ती गुजरातमध्ये केली जाईल. अर्थातच, राहुल यांनी गुजरातबाबत असे दावे करण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१७ आणि २०२२च्या गुजरात विधानसभा निवडणुकांतही त्यांनी असेच विधान केले होते. २०२२ मध्ये भाजपने १५६ जागा मिळवल्या, तर काँग्रेसच्या वाट्याला केवळ १७ जागा आल्या होत्या.
गेली कित्येक वर्षे गुजरातमध्ये भाजपची सत्ता कायम असल्यानेच, काँग्रेसला भाजपचा हा गड जिंकायचा आहे. त्यासाठी त्यांनी आतापासून मोर्चेबांधणी सुरू केली आहे, असे निश्चितपणे म्हणता येते. गेल्या वर्षी कर्नाटक विधानसभेत जेव्हा, एकगठ्ठा मुस्लीम मतांनी ६५ जागांवर भाजपचा कर्नाटकात पराभव केला आणि काँग्रेसच्या ओंजळीत भाजपच्या ताब्यातील हे राज्य टाकले, तेव्हापासूनच काँग्रेस हेतुतः ध्रुवीकरणाचा घातक प्रयोग देशभरात करत आहे. लोकसभा निवडणुकीतही ध्रुवीकरणामुळेच, महाराष्ट्रापासून उत्तर प्रदेशपर्यंत काँग्रेसच्या आघाडीला अनपेक्षित जागा दिल्या. म्हणूनच, गुजरातमध्येही काँग्रेस, हीच पद्धत वापरू पाहत आहे. त्यासाठीच, अयोध्येचा मुद्दा काँग्रेसने घेतला आहे.
ज्या अयोध्येवरून काँग्रेस भाजपवर शरसंधान करत आहे, त्या अयोध्येत नेमके काय घडले हे कोणीही समजावून घेत नाही. फैजाबाद मतदारसंघात पाच विधानसभा क्षेत्र आहेत. त्यापैकी एक अयोध्या आहे. त्यातील प्रत्यक्ष अयोध्येतून भाजपच्या उमेदवाराला आघाडीच मिळाली होती. मात्र, अन्यत्र ध्रुवीकरण झाल्यामुळे इंडी आघाडीच्या वाट्याला जास्तीची मते गेली. हे देशभरात सर्वत्रच झाले. भाजपविरोधात इंडी आघाडीला अशाच पद्धतीने पद्धतशीरपणे एकगठ्ठा मतदान झाल्यामुळे, इंडी आघाडीच्या जागा वाढल्या.
यात कोणत्याही काँग्रेसच्या अथवा विरोधी पक्षाच्या नेत्याचे काडीचेही कर्तृत्व नाही. हिंदू समाज हा जातीपातीच्या राजकारणात विभागला गेला आहे, तर मुस्लीम मते एकगठ्ठा काँग्रेसच्या बाजूने मतदान करत आहेत. दुर्दैवाने, पक्ष अथवा नेता काही करेल, याची हिंदू समाज आजही वाट पाहत आहे. अल्पसंख्याक समाज जर मतदारसंघाचे भवितव्य निश्चित करू लागला, तर आणखी काही वर्षांनी जेव्हा तो बहुसंख्य होईल तेव्हा केवळ मतदारसंघाचेच नव्हे तर देशाचे भविष्य तो ठरवेल, हे वास्तव हिंदूंना कोणीतरी स्पष्ट शब्दांत सांगितले पाहिजे, अन्यथा फार उशीर झाला असेल.
अयोध्येबाबत राहुल गांधी यांनी दिशाभूल करून झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्याची योग्य ती दखल घेतली आहे. आज राहुल यांना अचानक अयोध्येबद्दल उमाळा का आला आहे, हे सांगायला कोण्या सुज्ञाची गरज नाही. केवळ मतांसाठी आता त्यांना अयोध्येची आठवण झाली आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिर हे केवळ आणि केवळ भाजपच्या प्रयत्नांतूनच मार्गी लागले, हेही लक्षात घ्यायला हवे. श्रीराम हे करोडो हिंदुंचे आराध्य! त्यावर कोणीही मालकी हक्क सांगण्याचे धाडस करणार नाही. किंबहुना तसा विचारही करणार नाही. मात्र, अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीवर श्रीराम मंदिर उभे करण्याचा संकल्प भाजपने सोडला, आणि तो पूर्ण करण्यासाठी देशव्यापी आंदोलन केले. आंदोलन, रथयात्रा यांच्या माध्यमातून काँग्रेसविरोधात जात, भाजपने जनमत तयार केले.
लाखो कारसेवकांनी मंदिर निर्माणासाठी योगदान दिले. मुलायमसिंह यांनी केंद्र सरकारच्या आदेशाने, निःशस्त्र कारसेवकांच्या पाठीला बंदुका लावून गोळीबार केला. त्यांचे मृतदेह वाळूची पोती बांधून शरयूत लोटण्यात आले. ज्ञात-अज्ञात हजारो कारसेवकांच्या रक्ताने शरयू लाल झाली. बाबराने जो ढाँचा उभारला होता, तो उद्ध्वस्त करण्यात आला. त्यासाठी कल्याणसिंह यांनी उत्तर प्रदेशमधील भाजपचे सरकार पणाला लावले. राजीनामा देईन, पण गोळीबार करणार नाही, असे तेजस्वीपणे सांगत त्यांनी भाजपचे सरकार बरखास्त होऊ दिले, पण त्यापूर्वी बाबरी ढाँचा पाडला. ज्या काँग्रेसने मुस्लिमांची मते मिळावीत, यासाठी श्रीराम मंदिराला विरोध केला, त्याच मंदिरासाठी भाजपने संकल्प सोडत तो पूर्णही केला.
काँग्रेसची मानसिकता ही सारे काही सत्तेसाठी अशीच होती, तर संघाने कायम ‘राष्ट्र प्रथम’ याच भावनेने काम केले. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत जनसंघाने लोकसभेच्या तीन जागा जिंकल्या. श्यामाप्रसाद मुखर्जी हे तीन खासदारांपैकी एक होते. त्यांनी संसदेत पंडित नेहरूंच्या धोरणांवर हल्लाबोल केला. सभागृहात चर्चेदरम्यान, नेहरूंनी मुखर्जींकडे बोट दाखवले आणि म्हणाले, “जनसंघ हा जातीयवादी पक्ष आहे, मी जनसंघाला चिरडून टाकीन.” त्यावर श्यामाप्रसाद यांनी उत्तर दिले, “माझे मित्र पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात की ते जनसंघाला चिरडून टाकतील, मी म्हणतो की मीही चिरडणारी मानसिकता चिरडून टाकीन.” हा विचारांमधील फरक.
जे नेहरू जनसंघाला चिरडायला निघाले होते, त्याच नेहरूंनी जेव्हा १९६२च्या भारत-चीन युद्धात आवाहन केले, तेव्हा संघ स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी ठेवली. ज्या उत्साहाने देशभरातील स्वयंसेवक सैन्याच्या मदतीसाठी सीमेवर पोहोचले, ते संपूर्ण देशाने पाहिले, आणि त्यांचे कौतुक केले. स्वयंसेवकांनी आपली संपूर्ण शक्ती सरकारी कामासाठी, विशेषत: सैनिकांना मदत करण्यासाठी वापरली. प्रशासनाला मदत करणे, रसदपुरवठा करण्यात मदत तर केलीच, त्याशिवाय हुतात्म्यांच्या कुटुंबांची काळजी घेण्याचेही काम स्वयंसेवकांनी केले. म्हणूनच, १९६३ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होण्यासाठी, नेहरूंना संघाला आमंत्रित करावे लागले.
आजही यात सहभागी होण्यासाठी महिनोन्महिने तयारी केली जाते. मात्र, दोनच दिवसांपूर्वी मिळालेल्या निमंत्रणावर ३ हजार ५०० स्वयंसेवक गणवेशात हजर झाले. एकट्या लाठीच्या साहाय्याने, बॉम्ब आणि चिनी सशस्त्र दलांचा यशस्वीपणे सामना करू शकतो, हे दाखवण्यासाठी १९६३च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी संघाला विशेष आमंत्रण देण्यात आले होते, असे नेहरूंनीच नंतर नमूद केले. राहुल यांनी हा इतिहास पुन्हा एकदा नीट म्हणजे नीट वाचून घ्यावा, समजून घ्यावा, आणि नंतर त्यावर व्यक्त व्हावे. म्हणजे वारंवार तोंडघशी पडण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही.