भुकेकंगाल पाकिस्तानकडून अफगाण स्थलांतरितांची हकालपट्टी

    07-Jul-2024
Total Views |
afghan refugees
 
काबुल : इराण आणि पाकिस्तानने गेल्या चार दिवसांत जवळपास १२,००० अफगाण स्थलांतरितांना आपल्या देशातून हाकलून दिले आहे. तालिबानच्या निर्वासित मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की पाकिस्तान आणि इराणच्या सरकारने ११,९९७ अफगाण स्थलांतरितांना त्यांच्या देशातून बाहेर काढले आहे. सर्व निर्वासित अफगाणिस्तानात परतले आहेत.
 
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, इराण आणि पाकिस्तानमधून निष्कासित केलेले लोक ३ ते ६ जुलै दरम्यान तोरघुंडी, स्पिन बोल्डक, इस्लाम काला-हेरत आणि अब्रेशिम-निमरुझ सीमेवरून अफगाणिस्तानात दाखल झाले. इराण आणि पाकिस्तानमधून अफगाण निर्वासितांना जबरदस्तीने हद्दपार केल्यामुळे अफगाणिस्तानमधील मानवतावादी संकट अधिक गडद झाले आहे.
  
हद्दपार केलेल्या अनेक स्थलांतरितांना अफगाणिस्तानमध्ये परतल्यानंतर अनिश्चित भविष्याचा सामना करावा लागेल, कारण अफगाणिस्तान सध्या आर्थिक अस्थिरता आणि आवश्यक मूलभूत सेवांच्या अभावाचा सामना करत आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानात परतणाऱ्या निर्वासितांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे मानवतावादी संस्थांना एकाच वेळी सर्वांना मदत करण्यात अडचणी येत आहेत. त्याच वेळी, जगभरातील मानवाधिकार संघटनांनी पाकिस्तान आणि इराणच्या या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे. सामूहिक निर्वासनांचा निषेध केला आहे आणि अफगाण निर्वासितांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.