‘पंचकोष’ अभ्याक्रमावर आधारित मुंबईतील एकमेव शाळा चालविणार्या प्रधानाचार्य नंदिनी किरण भावे यांच्या कार्याचा आढावा सांगणारा लेख...
आजची तरुणाई ही देशाचे भविष्य आहे. मात्र, पाश्चत्य संस्कृतीकडे पालकांचा ओढा वाढत असल्याने, तरुणांमध्ये भारतीय संस्कृती आणि आपली मूळ तत्वे यांची समज कमी होत असल्याचे चित्र आहे. बालकांचा बौद्धिक विकास हा सहा वर्षे वयापर्यंत होत असतो. अशावेळी त्यांना भविष्यातील स्पर्धात्मक युगात तयार होण्यासाठी आपली भारतीय संस्कृती जपत सर्वप्रकारचे शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. संस्कारशील कृती समाजामध्ये रूजली की, एक संस्कारशील समाजमनाची निर्मिती होऊन, त्यातूनच सुसंस्कृत राष्ट्रनिर्मिती घडेल असे त्यांना वाटते.
संस्करांचे महत्व ओळखून नंदिनी किरण भावे यांनी, गोरेगावातील ‘सन्मित्र मंडळ गोरेगाव’ या नूतन शिशु मंदिरात चालणार्या ‘पंचकोष’आधारित शिक्षणपद्धत या अनोख्या उपक्रमाचा विद्याभारतीच्या सहकार्याने बालकांना अनुभवाधारित शिक्षण देण्याचा विडा उचलला आहे. आज अविरतपणे १९ वर्षे नंदिनी भावे आणि त्यांची संपूर्ण टीम याच उपक्रमाच्या माध्यमातून अनुभवाधारित व्यक्तिमत्व विकासासाठी मार्गदर्शन करत आहेत. मूळच्या अलिबाग येथील असलेल्या नंदिनी भावे यांना शिक्षकी पेशाचे बाळकडू, त्यांच्या कुटुंबातूनच मिळाले.
नंदिनी भावे यांचे आजोबा आणि काका दोघेही शिक्षकच होते. त्यामुळे आपसूकच घरातील वातावरण हे शिक्षणासाठी अनुकूल असेच होते. नंदिनी यांचे वाणिज्य शाखेत पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. १९९९ साली नंदिनी केळकर यांचा विवाह मुंबईतील ‘गोकूळ टूर्स ट्रॅव्हल्स’चे व्यवस्थापक किरण भावे यांच्याशी झाला .भारतीय संस्कृतीची तत्वे जपणे, अध्यात्मिक विषयावर वाचन व तसे जगण्याचा प्रयत्न करणे, रांगोळी, हस्तकला, साहित्यनिर्मिती या कला जोपासणे, लहान मुलांसंदर्भातील लेख, पुस्तक वाचणे, भावी पिढी निर्माणकार्यात मार्गदर्शन करणे, यासर्वांची आवड असल्याने त्यांनी आपल्या मुलाच्या संगोपनावर बारकाईने लक्ष दिले. खरेतर नंदिनी यांचा हा प्रवास ‘सन्मित्र मंडळ गोरेगाव’ संस्थेच्या माध्यमातून सुरू झाला.
२००३ साली नंदिनी यांनी गोरेगाव येथील सन्मित्र मंडळाच्या पूर्वप्राथमिक शाळेत आपल्या मुलाला भरती केले. यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून नंदिनी स्वतः खूप सक्रियपणे शाळेच्या कामकाजात सहभागी असत. हे पाहाता तत्कालीन मुख्याध्यापिका गीता नलावडे यांनी नंदिनी यांना शिक्षक म्हणून रूजू होण्याबाबत विचारले. याला सकारात्मक प्रतिसाद देत,योग्य प्रशिक्षणांती, नंदिनी भावे २००५ साली शाळेत रूजू झाल्या. याच काळात शाळेने विद्याभारतीचा उपक्रमदेखील सुरू केला.
२००६ साली नंदिनी भावे यांना ’शिशुवाटिका प्रधानाचार्य’ म्हणून बढती मिळाली. यादरम्यान नंदिनी भावे यांना सूरत याठिकाणी विद्याभरती अखिल भारतीय कार्यकर्ता वर्ग पाहायला मिळाला. यातील ‘शिशुवाटिका’ हा उपक्रम त्यांना अत्यंत प्रभावी वाटला. आपल्या मुंबई आणि महाराष्ट्रातही बालकांना हे अनुभवायला मिळावे, असे त्यांना वाटले.
मुंबईत येताच एक आदर्श शिशुवाटिका आपली असावी, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून काम सुरू केले. त्यांनी सध्याचे विद्याभारतीचे महाराष्ट्र व गोवा राज्य शिशुवाटिकाप्रमुख मा. भाई उपाले व कोकण प्रांतमंत्री मा. संतोष भणगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आपल्या शाळेत विद्याभारती ‘पंचकोष’आधारित शिक्षणपद्धतीची सुरुवात केली. बालकांचा समग्र विकास करणे हाच शिशुशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.
या शिक्षण पद्धतीत ‘जीवनाचा घनिष्टतम अनुभव’, ’संस्कार चरित्रनिर्माण’ आणि ‘क्षमतांचा विकास’ हे तीन मुख्य उद्देश आहेत. कोणीही कधीही शाळेत आले, तरी याच गोष्टी आपल्याला अनुभवायला येतील हे त्या सांगतात. नंदिनी भावे म्हणतात, यावर्षीपासून आम्ही शून्य ते तीन वयोगटातील मुलांसाठीही काम करण्याचा विचार केला आहे. तसेच वस्त्या-वस्त्यांमध्ये जाऊन गर्भवती महिलांना प्रसुतीकाळातील आवश्यक विषयांवर मार्गदर्शन करणेही त्यांना जरुरीचे वाटते. कारण, याचा थेट परिणाम पोटात असणार्या बालकांवर त्यांच्या मेंदूवर होत असतो. समर्थ भारत घडवण्यासाठी गर्भधारणेपूर्वी धर्म-शास्त्रअभ्यासानुसार नवदम्पतीना प्रशिक्षित करण्याचे काम भविष्यात करणार असल्याचे त्या म्हणाल्या. .
नंदिनी भावे राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्याबरोबर काम करतात. नव्याने तयार झालेल्या राज्य शैक्षणिक आराखड्यासाठीही नंदिनी भावे यांनी आपले बहुमोल योगदान दिले आहे. शालेय शिक्षणासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा (एससीएफ) तयार करण्यासाठीही नंदिनी भावे या काम करत होत्या. त्यात त्यांना शिक्षणतज्ज्ञ म्हणून निमंत्रित केले होते.
नंदिनी भावे यांचे कार्य राज्यभरात नावाजले आहे. राज्यातील १५० पेक्षा अधिक शाळांनी गोरेगाव येथील शाळेला भेट देत या उपक्रमाची माहिती घेतली आहे. असाच उपक्रम आपल्या शाळांमध्येही सुरू करण्यासाठी इतर शाळाही आग्रही असल्याचे भावे सांगतात. एवढेच नाही, तर एससीएफचे काम चालू असताना तत्कालीन राज्य शैक्षणिक सचिव मा. रणजित सिंह देवल यांनीही यांच्या शिशुवाटिकेला भेट दिली होती. तेही हे कार्य पाहून प्रभावित झाले आणि एससीएफनुसार येणार्या शिशुशिक्षणासाठीचा एक नमुनाच ही शाळा आहे, असा विश्वास त्यांचा तयार झाला. नंदिनी भावे यांचे कार्य भविष्यातील सुदृढ राष्ट्रनिर्माणासाठी नक्कीच कौतुकास्पद आहे. नंदिनी भावे यांना पुढील कार्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून अनेकानेक शुभेच्छा.