कट्टरतावादावर इराणी प्रहार

    07-Jul-2024
Total Views |
 Massoud Pezeshkian
 
कट्टरपंथीय सईद जलिली यांचा पराभव करत, मसूद पेझेश्कियान इराणचे नवे राष्ट्रपती झाले आहे. मे महिन्यात इराणचे तत्कालीन राष्ट्रपती, इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यानंतर, हे पद रिक्त होते. गेल्या कित्येक वर्षांपासूनच्या कट्टरपंथीय राजवटीला मसूद यांनी सुरुंग लावला असून, इराणमध्ये आता अनेक सामाजिक आणि वैचारिक बदल पाहायला मिळू शकतात.
 
इराणच्या आण्विक कार्यक्रमाला होणारा विरोधदेखील, या निवडीमुळे शांत होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, मसूद यांच्या येण्याने इराणमधील कट्टपंथीयांना चांगलाच दणका बसला असून, देशातील कट्टरतावाद कमी होणार असल्याचे बोलले जात आहे. सामाजिक स्वातंत्र्याच्या क्षेत्रात आता अधिक काम होऊन, इराणचे परराष्ट्र धोरणही व्यावहारिक असेल अशी आशा आता इराणवासीयांना आहे. इराणच्या अमेरिकेसोबत सुरू असलेल्या तणावपूर्ण संबंधांवर, आता शांततापूर्ण तोडगा निघण्याची आशा आहे. त्याला शहरी नागरिक, महिला आणि तरुणांचासुद्धा पाठिंबा मिळाला आहे.
 
नवनिर्वाचित राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान ६९ वर्षांचे असून, ते कार्डियाक सर्जन आहेत. निवडणुकीपूर्वी त्यांनी हिजाबबाबत इराणचे कडक कायदे मवाळ करण्याचे आश्वासनही दिले. इराणमधील समाज आता उदारमतवादी होऊन, वैविध्यपूर्ण विचारसरणीचा जन्म होण्याकडे खर्या अर्थाने वाटचाल करणार आहे. २०१५ मध्ये झालेला आण्विक कार्यक्रमांबाबतचा आंतरराष्ट्रीय करारही, पुन्हा अस्तित्वात येऊ शकेल. दरम्यान, इराणमध्ये दुहेरी प्रणाली कार्यरत असून, ज्यामध्ये मौलाना सरकारी निर्णयांवर अंतिम निर्णय घेतात. अयातुल्ला अली खामेनेई, हे अजूनही तेथील सर्वोच्च नेते मानले जातात.
 
अरब दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्याबाबतही तेच निर्णय घेतात. परंतु, खामेनेई आता ८५ वर्षांचे असल्याने, नवीन राष्ट्रपतींची खामेनेई यांचा उत्तराधिकारी निवडण्यात मोठी भूमिका असणार आहे. त्यामुळे नवनिर्वाचित राष्ट्रपती मसूद, यांचा पुढील प्रमुख निर्णयांमध्ये प्रभावीपणे सहभाग असणार आहे. विशेष म्हणजे, मसूद पेझेश्कियान यांनीही अयातुल्ला अली खामेनेई यांच्या धोरणांच्या विरोधात जाणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. तसेच, निवडणुकीदरम्यान जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करू शकलो नाही, तर राजकारणाला अलविदा करू असेही ते म्हणाले. माजी राष्ट्रपती मोहम्मद खातमी यांच्या नेतृत्वाखालील सुधारणावादी पक्षाने, या निवडणुकीत मसूद पेझेश्कियान यांना आपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे खामेनेई यांच्या विजयामागे खातमी यांचाही मोठा हात आहे.
 
हेलिकॉप्टर अपघातात मरण पावलेले माजी राष्ट्रपती इब्राहिम रईसी हे खामेनेई गटाचे मानले जात होते. त्यांनी महिलांच्या पेहरावापासून ते आंतरराष्ट्रीय संबंधांपर्यंतच्या बाबींवर इस्लामिक कट्टरतावादी भूमिका स्वीकारली होती. हिजाब न घातल्यामुळे महासा अमिनी नावाच्या मुलीची, इराण पोलिसांनी हत्या केली होती, त्यानंतर लाखो मुस्लीम महिला कट्टरपंथी सरकारविरोधात रस्त्यावर उतरल्या होत्या. इराणमध्ये वर्षानुवर्षे कट्टरतावादी राजवट आहे, ज्यामध्ये सुधारणांसाठी बोलणे हादेखील एक गुन्हा आहे.
 
मसूद पेझेश्कियान यांनीही इराण पोलिसांकडून महासा अमिनी यांच्या मृत्यूबाबत स्पष्टीकरण मागितले होते. १९८० च्या दशकात इराण-इराक युद्धादरम्यान, मसूद यांच्याकडे इराणी सैन्याला वैद्यकीय सुविधा पुरविण्याचे काम सोपवण्यात आले होते. खातमी यांच्या कार्यकाळात ते आरोग्यमंत्री म्हणून काम पाहत होते. १९९४ मध्ये त्यांची पत्नी आणि एका मुलाचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी एकट्याने दोन मुले आणि एक मुलगी यांचा सांभाळ करून त्यांना वाढवले.
 
गैरव्यवस्थापन, अमेरिकन निर्बंध आणि भ्रष्टाचाराने ग्रासलेल्या इराणच्या अर्थव्यवस्थेला वळण देण्याचे मोठे आव्हान मसूद पेझेश्कियान यांच्यासमोर आहे. हे आव्हान ते कसे स्वीकारतात, हे पाहावे लागणार आहे. इराणची इस्त्रायलबाबत काय भूमिका आहे, हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे. त्याचप्रमाणे, इस्लामिक कट्टरतावाद संपविण्यासाठी मसूद प्रयत्न करणार की नाही, की मग सत्ता मिळाल्यानंतर मौलानांना शरण जाऊन पुन्हा स्वतः कट्टरतावादी राष्ट्रपती बनून राहणार, हे येत्या काही महिन्यांत समजेलच.