भारतीय शिक्षण परंपरेला हवी कौशल्य विकासाची जोड...

    07-Jul-2024
Total Views |
 Indian Education System
 
स्वत:च्या राज्यकारभारासाठी ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या शिक्षणव्यवस्थेत बदल न करता, दीर्घकाळ तीच रेटल्याने, त्याचे दुष्परिणाम पुढे दिसून आलेच. भारतात समृद्ध अशी शिक्षणप्रणाली होती, ज्यामध्ये तर्कप्रज्ञेबरोबरच अंतःप्रज्ञेचा वापर होत असे, या शिक्षणपद्धतीला आपण नाकारले. सध्याच्या शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदीचा व त्यावरील उपायांचा घेतलेला हा आढावा..
 
आपण नेहमीच आपल्या प्राचीन विश्वकल्याणकारी धर्मसंस्कृतीचे कितीही गुणगान करत असतो. आजही आपली धर्मसंस्कृती व धर्मशास्त्रे (लाईफ सायन्सेस) जगात मान्यता पावून, आचरणात आणली जात असली, तरीही आपण भारतात अजूनही त्यांना बुरसटलेले ज्ञान मानून आपल्या धर्मसंस्कृतीपासून दूर जात आहोत. हे करताना पाश्चिमात्य विशेषतः अमेरिकन चंगळवादी व आरोग्याचा, पर्यावरणाचा विनाश करणारी संस्कृती व जीवनशैली आपण किती पुरोगामी आहोत, हे दर्शवण्यासाठी आचरण्यात धन्यता मानत आहोत.
  
आज आपल्यात काम-क्रोध-लोभ-मोह-मद-मत्सर या षड्रिपूंचे प्राबल्य वाढत असून, अनेक संत महात्मे, महापुरुष, समाजसुधारक, आचार्य (शिक्षक) यांनी केलेल्या, धर्माने मान्य केलेल्या सन्मार्गाने आपण आपली उन्नती साधावी, या उपदेशांची पायमल्ली करून आपण आपली अधोगती करत आहोत. आजच्या तंत्रज्ञानाधारित प्रसारमाध्यमांतून, आपल्या भ्रष्टाचारी, ़फंदफ़ितुरी, असभ्य वागणूक, अर्वाच्य भाषा, लाचखोरी, क्रूरता, जातीभेद, विश्वासघात, व्यसने, फसवणूक या दुर्गुणांची व आचरणांची लक्तरे जगभरात प्रसारित होऊन टांगली जात आहेत.
 
१९व्या शतकात आक्रमक इंग्रजांनी त्यांचा स्वार्थ जपण्यासाठी, राजकारण व राज्यकारभार चालवण्यासाठी, भारताचा आत्मा असलेल्या आपल्या धर्मसंस्कृतीला बुरसटलेले, मागासलेले ज्ञान, असा उल्लेख करून त्याची व आपल्या देवदेवतांची टिंगलटवाळी करणार्या अनेक पिढ्या निर्माण केल्या. हे काम त्यांनी त्यांच्या ख्रिश्चन मिशनरी व नन्स यांच्याद्वारे निर्माण केलेल्या, शिक्षण संस्थांच्या शाळा, महाविद्यालयातून इंग्रजीत ख्रिश्चन विचारधारा जोपासणारे शिक्षण देऊन केले. या पार्श्वभूमीवर स्वामी विवेकानंदांनी एक मोलाचा संदेश दिला होता. ते म्हणाले होते, जोपर्यंत आपण वेदान्त, आधुनिक तंत्रज्ञान व आधुनिक विज्ञान यांचा समन्वय साधून, आज जगात सर्वत्र चालत असलेल्या इंग्रजी भाषेत शिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण करत नाही, तोपर्यंत भारतातील अज्ञान, दारिद्य्र नष्ट न होता भारताला स्वातंत्र्य मिळून प्रगती व विकास होणे अशक्य आहे.
 
आज २१व्या शतकात भारताला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे झाली तरी, आपल्या शिक्षणपद्धतीत सुधारणा न होता अधोगतीच होताना दिसत आहे. प्राथमिक शाळांपासून, ते विश्वविद्यालयांपर्यंतची शिक्षण व्यवस्था भ्रष्टाचार, अज्ञान, फसवणूक, जातीभेद, लूटमार, गलिच्छ राजकारण, विकृत मानसिकता व बुद्धिभेद या दुर्गुणांनी कशी बरबटलेली आहे, हे पाहिल्यावर हे चित्र कधी बदलेल का, याबाबत मनात निराशा दाटून येते.
 
आज देशात बोगस, मान्यता नसलेल्या अनेक शिक्षण संस्था निर्माण झाल्या असून, शिक्षणाचा दर्जा सुमार असलेल्या या संस्थांकडून, अगदी डॉक्टरेटपर्यंतची खोटी पदवी प्रमाणपत्र दिली जात आहे. काही अपवाद सोडले तर, बहुतेक शाळांतून विद्यार्थ्यांची गर्दी झाल्याने, विद्यार्थ्यांना प्राथमिक सुविधाही मिळेनाशी झाल्या आहेत. इतर ठिकाणी नोकर्या न मिळाल्याने, नाइलाजाने शिक्षकी पेशा स्वीकारणारे शिक्षक, शिकवण्याची आवड, पात्रता, क्षमता व कोणत्याही भाषेचे ज्ञान, विषयांचे ज्ञान व संस्कार नसलेले शिक्षक, असल्याने शिक्षणाचा दर्जा खालावला आहे.
 
स्वतंत्र भारतात, वेगवेगळ्या परदेशी राजकीय विचारधारा असणार्या तथाकथित शिक्षणतज्ज्ञांनी, शिक्षण माध्यम हे मातृभाषा की इंग्रजी हा घोळ घालून अनेक भाषा, भूगोल, इतिहास, गणित या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश केल्यामुळे, मुलांवरचे दप्तराचे व अभ्यासाचे ओझे वाढले आहे. परीक्षेत कॉपी करणे, आपल्या जागी दुसर्याला बसवणे, हे प्रकार सर्रास चालू आहेत. आरक्षण धोरणामुळे हुशार मुलांचे नुकसान होत आहे. पदवी घेऊनही विषयाचे ज्ञान मिळत नसल्याने, नोकर्या मिळत नाहीत. हे शिक्षणाचे प्रश्न कधी सुटणार हे त्या विद्यादेवी सरस्वतीलाच ठाऊक.
 
आज ‘संस्कार’ हा शब्दच शब्दकोशात राहिलेला नाही. आज मतिभ्रष्ट, चंगळवाद जोपासणारे संस्कारहीन पालक, महागड्या खाजगी शाळांत मुलांना प्रवेश मिळवण्यासाठी आटापिटा करतात. एकदा प्रवेश मिळाला की, आपली मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी संपली, या विचाराने मुलांवर चांगले संस्कार करण्याची आपली जबाबदारी विसरून, आपल्या नित्याच्या नोकरी, टीव्ही, सिनेमा, पार्ट्या व मौजमजा करण्यात मग्न होतात. बरेचसे पालक मुलांना नोकरांवर सोपवून, आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. अशा मुलांना घराची ऊब, सुरक्षा व संस्कार कसे मिळणार? पालकांवरच संस्कार झालेले नसल्यावर ते मुलांवर काय संस्कार करणार?त्यामुळेच आज संस्कारहीन, अज्ञानी, बेशिस्त, पिढ्या निर्माण होत आहेत.
 
अशिक्षित, भ्रष्टाचारी, राजकारणी शिक्षणसम्राटांनी दर्जाहीन शिक्षणाचा नफेखोरीचा जो धंदा सुरू केला आहे, त्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, पदवी असूनही त्यांना ज्ञान व कौशल्याच्या अभावामुळे नोकर्या मिळत नाहीत. मग, ती मुले याच विरोधक राजकारण्यांच्या पाठिंब्याने सुशिक्षित पदवीधर मुलांच्या बेरोजगारीविरोधात आंदोलन करत आहेत. अशा या शिक्षणामुळे भारतात उत्तम संशोधक, प्रशासक व राज्यकर्ते कसे निर्माण होणार?
 
या विषयाबद्दल जगप्रसिद्ध समाजमानस शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ व परदेशांत तत्त्वज्ञान विषयाचे प्राध्यापक म्हणून शिक्षण क्षेत्रात बरीच वर्षे घालवलेले डॉ. पंढरीनाथ प्रभू आपल्या ’भारतातील शास्त्रांचा उद्गम व विकास- (मानस सामाजिक मूलाधार व आज घ्यावयाचे धडे) या ग्रंथात काय म्हणतात, ते जाणून घेणे उद्बोधक ठरेल. डॉ. प्रभू म्हणतात, प्राचीन भारतीय शिक्षणक्रमांत गुरुमुखातून श्रवण करणे व ग्रंथपठण करणे (यात वाचनही आले) या कर्तव्यांबरोबरच मनन, चिंतन व निदिध्यासन ही सुद्धा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील कर्तव्ये होती. निदिध्यासन म्हणजे ’जे गुरुमुखातून ऐकले आहे, त्याच्या अर्थावर निरंतर पुनःपुन्हा विचार-ध्यान करणे’.
 
आपल्या आजच्या शिक्षणक्रमांत केवळ श्रवणपठणावर (ऐकणे व पाठांतर करणे) भर दिला जातो. श्रवण-पठण ही माहिती मिळवण्याची साधने आहेत. (आज जसे गुगल गुरूकडून जगातली माहिती मिळते पण ज्ञान मिळतेच असे नाही). त्यांनी संपूर्ण व खरे ज्ञान मिळत नाही, आपले शिक्षण हे एकंदरीत माहिती देण्यावरच भर देणारे आहे. खरे शिक्षण केवळ माहितीच नाही, तर मन घडवणारे व प्रगल्भ करणारे असे असले पाहिजे.
 
पण, आज मनन-चिंतन-निदिध्यासन यांना आपल्या शिक्षणक्रमात स्थान व वाव नाही, कारण, या कृती अंतर्निरीक्षणी (इंट्रोस्पेक्शन) आहेत. म्हणून व्यक्तिसापेक्ष आहेत. त्यांचा वापर केल्यास व त्यांना उत्तेजन दिल्यास ’तर्कबुद्धीवर विपरीत परिणाम होईल’ अशा अतिरेकी कल्पनेने त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे खास शिक्षण दिले जाते. वस्तुतः अंतःप्रज्ञेसारखी अंतर्निरीक्षणशक्ती, व तर्कबुद्धीसारखी बहिर्निरीक्षण शक्ती या दोन्हींचाही सारखाच परिपोष केला पाहिजे. यापैकी कुठल्याही शक्तीचा परिपोष करताना, दुसरीचे अपोषणही होता कामा नये. ज्ञानसंपादनेतील प्रगती, या दोघांच्या सहकार्यानेच वेगाने व यथायोग्य रीतीने होऊ शकेल.
 
पाश्चात्त्य देशांत आता विचारवंतांच्या लक्षात ही गोष्ट आल्यामुळे, त्यांच्याकडे-विशेषतः, अमेरिकेत अलीकडे काही वर्षांपूर्वी ’प्राणायाम’ व ’ध्यान’ या योगक्रिया शालेय शिक्षणक्रमात, भूसेना-नौसेना-वायुसेना यांच्या शिक्षणक्रमात व कॉलेज, विद्यापीठे यांच्या शिक्षणक्रमांतही समाविष्ट केलेल्या आहेत. हार्वर्ड विद्यापीठासारख्या ठिकाणी, ध्यान या विषयावर संशोधन करून पीएच.डी. ही अत्युच्च डिग्रीसुद्धा मिळवता येते.
 
ख्रिश्चन मिशनरी व नन्स यांच्या शिक्षणक्रमातही, प्राणायाम व ध्यान यांचा समावेश झालेला आहे. त्यापासून चांगले फायदे होत आहेत, असे आढळून आल्यामुळेच पाश्चात्त्यांनी उत्साहाने त्या शाळेपासून ते उच्च शिक्षणक्रमात समाविष्ट केल्या आहेत. त्यांनी निदान काही वर्षे तरी असा उपक्रम करून त्यांची उपयुक्तता पटल्यामुळे आता आपल्याकडे ध्यान, प्राणायाम या आपल्याच ज्ञानाचा आपल्या शिक्षणक्रमात समावेश करण्यास हरकत नसावी.
 
प्राचीन काळी कोणतीही उपकरणे, साधने, सोयीसुविधा उपलब्ध नसताना, आपल्या ऋषीमुनींनी एकान्तस्थळी ध्यान करून, अंतःप्रज्ञेने अनेक शास्त्रीय शोध लावले. त्या शास्त्रांचा विश्वकल्याणासाठी वापर केला. आधुनिक काळात सर्व सोयीसुद्धा, आधुनिक तंत्रज्ञानाधारित उपकरणे, प्रयोगशाळा यांचा वापर करून, शास्त्रज्ञांनी तर्कप्रज्ञेचा वापर करून शोध लावले. याला अपवाद म्हणजे प्रख्यात नोबेल पुरस्कार विजेता भौतिक शास्त्राचा अभ्यासक व संशोधक याने तर्कप्रज्ञेबरोबरच अंतःप्रज्ञेचा वापर करून शोध लावले. म्हणून त्याला ’आर्म चेअर वैज्ञानिक’ असेही संबोधले गेले.
 
आज विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयांचे, त्यांच्या पारंपरिक कलाकौशल्याचे, यांचे आधुनिक तंत्रज्ञान वापरून, व इंग्रजी भाषेचे वाचन-लेखन व बोलणे याचे जुजबी ज्ञान व व्यवस्थापनाचे शिक्षण देऊन पारंगत होण्याची संधी दिल्यास, आज भारताला कुशल कारागीर, तंत्रज्ञ, अनेक विषयांतले संशोधक व उत्पादक प्राप्त होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकेल.
आज या कार्याला प्रारंभ झाला असून, आपल्या युवकांनी वेळ मोफत न घालवता या संधींचा फायदा घेतला पाहिजे. याबरोबर चिकाटीने व सातत्याने अभ्यास करून आपले स्वतःचे उद्योगधंदे निर्माण करून, त्यात शिक्षणाची संधी न मिळालेल्या युवकयुवतींना नोकर्या दिल्यास सर्वांचे कल्याण होईल.
 
ज्ञानचंद्र वाघ