चीनच्या पेंगाँग सरोवराजवळ कुरापती! पक्की बांधकामे सुरूच; भूमिगत बंकरही बांधले

    07-Jul-2024
Total Views |
 pangong lake
 
नवी दिल्ली : विस्तारवादी भूमिकेने पछाडलेल्या चीनच्या सीमेवर कुरापती सुरूच आहेत. एकीकडे चर्चेची गुर्हाळे सुरू असताना दुसरीकडे लडाखमधील पेंगाँग सरोवराजवळ चीनच्या हालचाली वाढल्या आहेत. चीनच्या सैन्याने येथे पक्के बांधकाम केले असून भूमिगत बंकरही बनवले आहेत. सॅटेलाईट फोटोंवरून हा चीनचा कावेबाजपणा उघडकीस आला आहे.
 
चीनची ‘पिपल्स लिबरेशन आर्मी’ (पीएलए) पेंगाँग सरोवर आणि आजपासच्या भागामध्ये सातत्याने खोदकाम व पक्के बांधकाम करत आहे. शस्त्रास्त्र आणि इंधनाचा साठा करण्यासाठी चीनने येथे भूमिगत बंकरही बांधले आहेत. तसेच, सैन्याची चिलखती वाहने आणि इतर प्रमुख गोष्टींसाठी पक्के बांधकाम केले असून अमेरिकेच्या ‘ब्लॅकस्काय’ने सॅटेलाईटद्वारे घेतलेले फोटो जारी करत याचा भांडाफोड केला आहे.
 
पेंगाँग सरोवराच्या उत्तरेकडील किनार्यावरील सिरजाप येथे पीएलएचा लष्करी तळ आहे. सरोवराभोवती तैनात चिनी सैन्याचे हे मुख्यालय आहे. भारताने दावा केलेल्या भागातच हा लष्करी तळ उभारण्यात आला आहे. एलएसीपासून याचे अंतर पाच किमी आहे. ब्लॅकस्कायने सॅटेलाईटद्वारे घेतलेल्या फोटोंनुसार २०२१-२२ मध्ये चीनने भूमिगत बंकर उभारण्यास सुरुवात केली. शस्त्रास्त्रे, इंधन आणि इतर लष्करी सामान ठेवण्यासाठी याचा वापर होऊ शकतो.
  
याच वर्षी दि. ३० मे रोजी घेतलेल्या फोटोंवरून बंकरला आठ प्रवेशद्वारे असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तर, त्याशेजारी असणार्या थोड्या छोट्या बंकरला पाच प्रवेशद्वारे असल्याचे दिसते. येथे चिलखती वाहने, लष्करी वाहने, इंधन आणि शस्त्रास्त्रे साठवण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच, पक्के रस्ते आणि बांधकामही करण्यात आले आहे. हा तळ गलवान खोर्याच्या दक्षिण-पूर्वेस १२० किमी अंतरावर आहे. याच गलवान खोर्यात २०२० साली भारत-चीनचे सैन्य आमनेसामने आले होते. दोन्ही सैन्यात झालेल्या झटापटीत २० हिंदुस्थानी जवान शहीद झाले होते, तर चीनचे ४० जवान ठार झाले होते.