उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर चारधाम यात्रा बंद!

भाविकांना ऋषिकेशच्या पलीकडे न जाण्याचा सल्ला

    07-Jul-2024
Total Views |
CharDham Yatra put on hold


नवी दिल्ली :             उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर भाविकांना चारधाम यात्रेवर जाता येणार नाही. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर भाविकांना ऋषिकेशच्या पलीकडे न जाण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, उत्तराखंडमधील हवामान स्थिती पाहता, चारधाम यात्रा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हवामान खात्याने उत्तराखंडच्या गढवाल भागात मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारने चारधाम यात्रा तात्काळ पुढे ढकलली आहे. भाविकांना ऋषिकेशच्या पलीकडे न जाण्यास सांगण्यात आले असून पलीकडे गेलेल्या भाविकांना जिथे आहेत तिथेच थांबण्यास सांगितले आहे. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे.


हे वाचलंत का? -      हाथरस प्रकरण : आरोपीचे राजकीय पक्षांशी लागेबांधे, देणग्या मिळत असल्याचे चौकशीत उघड!


हवामान खात्याच्या अंदाजानुसार ०७-०८ जुलै रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गढवालचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी सांगितले की, यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी यात्रा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वृत्तसंस्थेनुसार, ते म्हणाले, हवामान खात्याने गढवाल विभागात पुढील २ दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हे लक्षात घेऊन सर्व भाविकांना विनंती आहे की, पुढील काही दिवस ऋषिकेशच्या पलीकडे चारधाम यात्रेकरिता जाऊ नये, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडच्या विविध भागात मुसळधार पावसामुळे डोंगरांवर भूस्खलन झाले असून बद्रीनाथकडे जाणारा महामार्ग अनेक ठिकाणी टेकड्यांवरून पडल्यामुळे बंद झाला आहे. तसेच, चमोली जिल्ह्यातील कर्णप्रयागमधील चटवापीपल भागात भूस्खलनानंतर टेकडीवरून पडलेल्या दगडांच्या धडकेत हैदराबादमधील दोन यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.