फसवणुकीचे बळी

    06-Jul-2024   
Total Views |
hathras stampede


“मी निरपराध आहे. ती घटना घडली, त्यावेळी मी तिथे नव्हतो. मी गेल्यानंतर काही समाजविघातक शक्तींनी हे हत्याकांड घडवले,” असे नारायण साकार हरी उर्फ सुरज पाल जाटव याने म्हटले, तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्याआधीच म्हणाले की, “ही घटना आहे की षड्यंत्र याची पूर्ण चौकशी होईल. गुन्हेगाराला शिक्षा मिळणारच.” त्यानिमित्ताने हाथरसच्या त्या दुर्दैवी घटनेनंतरचे वास्तव मांडणारा हा लेख...

नारायण साकार हर उर्फ सुरज पाल याच्या प्रवचनानंतर त्याची पायधूळ घेता यावी म्हणून गर्दीचा कडेलोट झाला आणि त्यात १२१ लोक मृत्युमुखी पडले. काय म्हणावे? लोक कसे काय फसले असतील? सुरज पाल हा त्याच्या प्रवचनात लोकांना सांगायचा, लोकांनी देव मानू नयेत. मूर्तिपूजा करू नये. कारण, देवानेच सुरज पालला तसे लोकांना सांगायला सांगितले आहे. ब्रह्मा-विष्णू-महेश अगदी ब्रह्मांडनायक म्हणून तो स्वतःच आहे, असे त्याला ईश्वराने सांगितले, असे तो सांगायचा. सूट-बूट-टाय आणि गॉगल घालून तो मानवतेवर प्रवचन द्यायचा. त्याचे दर्शन घेतले, त्याची पायधूळ कपाळी लावली, त्याच्या आश्रमातल्या हँडपंपाचे पाणी प्यायले की, सगळे दुःख, रोग दूर होतात. इडापीडा टळते, भूतपिशाचबाधा दूर होते, असे तो सांगे. काही लोक समोर जमलेल्या गर्दीला सांगायचे की, त्यांनी नारायण साकार हरीला विष्णू, शंकर, ब्रह्मा आणि हनुमानाच्या रूपातही पाहिले आहे. नारायण साकार हरी याला आपण मूळ नावानेच संबोधू, तर, हा सुरज जाटव कधी भरउन्हात विजेचा कडकडाट करू शकतो, असे म्हणायचा, कधी सांगायचा की, तो प्रलयही करू शकतो..

खेड्यापाड्यांतल्या सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मागास समाजातल्या लोकांना या सुरज पालने पुरते भ्रमित केले. तो म्हणजे देव. त्याचे ऐकले तरच जीवन सुधारणार, असे लोकांच्या मनात त्याने भरवले. लोकांवर प्रभाव पडावा म्हणून त्याने स्वतःची ‘नारायणसेना’ तयार केली होती. ती त्याच्या प्रवचनामध्ये सुरक्षारक्षकाचे काम करी. त्याच्या सुरक्षिततेसाठी त्याने पुरुष आणि महिला कमांडोही ठेवले होते. तो पातेल्यात बसून दुधाने अंघोळ करी आणि महिला त्याला पदराने वारा घालत. पदराने वारा घालण्यासाठी ‘गोपिका युनिट’ म्हणून मुलीही तैनात होत्या. अनेक शहरांत शेकडो एकरांत उभे राहिलेले अद्ययावत आश्रम, ५० लक्झरी गाड्यांचा ताफा असे सगळे चोचले या सुरज पालचे होते. त्याचा जिथे कार्यक्रम असेल, तिथे भली मोठी रांगोळी काढली जायची. प्रवचन संपले की सुरज पाल त्या रांगोळीवरून चालत बाहेर निघायचा. सुरज पाल प्रवचनाच्या शेवटी जाहीर करे की, त्याचे चरणस्पर्श झालेली रांगोळी लोकांनी कपाळावर लावली की, घरची इडापीडा टळते. सगळी दुःखं दूर होतात. त्याने हाथरसच्या कार्यक्रमातही हेच सांगितले. त्यामुळे सुरज पाल निघून गेल्यावर त्याच्या पावलांचा स्पर्श झालेली रांगोळी घेण्यासाठी लोकांची एकच गर्दी झाली. रांगोळी संपली तर? आपल्याला मिळणार नाही, मग आपली इडापीडा जाणार नाही, या असल्या विचारांनी आयाबाया, लोक, लहान पोराबाळांना घेऊन रांगोळी घेण्यासाठी गर्दीत घुसले. प्रमाणाबाहेर गर्दी झाली, हे पाहून या सुरज पालच्या सुरक्षारक्षकांनी गर्दीवर पाण्याचा मारा केला. मातीचा आणि रांगोळीचा एकच चिखल झाला. त्यात आयाबाया, लोक घसरून पडली, एकच गदारोळ झाला. लोक एकमेकांना तुडवू लागली. पुरुष मंडळी त्यातल्या त्यात बाहेर पडली. मात्र, महिला आणि लहान मुले त्या गर्दीत चेंगरली गेली. २५ जणांचा तर तिथल्या तिथे मृत्यू झाला. त्यात बालकेही होती. मात्र, स्वतःला देव भासवणारा सुरज पाल या घटनेनंतर पळून गेला.

तर, या अशा सुरज पालचे बसपा आणि समाजवादी पक्षामध्येही मोठे प्रस्थ होते. बसपाची सत्ता असताना हा सुरज पाल लाल दिव्याच्या गाडीतून प्रवचनस्थळी जायचा. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव हे या सुरज पाल जाटवचे भक्त. गेल्या वर्षी त्यांनी त्याच्या प्रवचनाला हजेरी लावली होती. ’नारायण साकार हरी की संंपूर्ण ब्रह्मांड मे जयजयकार हो’ असे म्हणत अखिलेश यांनी या सुरज पालचे गोडवे गायले होते. गरीब, पीडित लोकांना समस्येपासून, त्रासापासून केवळ नारायण साकार हरीच वाचवू शकतील, असे म्हटले होते. एवढा मोठा श्रीमंत नेता सुरज पालचा भक्त आहे म्हटल्यावर सामान्य लोक त्या सुरज पालचे भक्त होतील, यात नवल नव्हते.

त्यामुळेच १२१ निष्पाप मृत्युमुखी पडल्यानंतरही आश्रमातील सुरज पालच्या सेवेकर्‍यांमध्ये त्याच्याबाबतची श्रद्धा जराही कमी झाली नाही. हाथरस घटनेवर सुरज पालच्या सेवेकर्‍यांचे म्हणणे असे की, मृत्यू आला होता, त्या लोकांचा. पण, जोपर्यंत नारायण साकार हरी तिथे होते, तोपर्यंत काही झाले नाही. ते तिथून निघून गेल्यावरच ते लोक मेले. हा ब्रह्मांडाधीश नारायण साकार हरींचा चमत्कार आहे, तर एका सेवकाचे म्हणणे लोक तर वैष्णोदेवी यात्रेमध्ये अमरनाथ यात्रेमध्ये पण मरतात. मग तुम्ही काय देवावर गुन्हा नोंदवणार काय? नारायण साकार हरी देव आहेत, त्यांच्यावर गुन्हा नोंदवणे चूक आहे. इतकेच काय, सुरज पाल पळून गेल्यानंतर त्याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन त्याच्या मैनपुरीच्या आश्रमाजवळ दाखवले गेले. त्याला पकडण्यासाठी पोलीस तिथे गेले. ती बातमी मिळवण्यासाठी प्रसारमाध्यमेही तिथे पोहोचली. काही माध्यमकर्मी एका चबुतर्‍यावर बसली होती. त्यांना पाहून चारपाच जण हातात कोयते घेऊन आले आणि त्यांनी मीडियावाल्यांना फर्मावले- उठा इथून. इथे फक्त नारायण साकार हरी परमेश्वरच बसू शकतात. तुम्ही बसलातच कसे? उठा. मीडियावाले तिथून उठले. मग त्या चारपाच लोकांनी ती जागा पाण्याने धुतली. जणू काही ती जागा या लोकांच्या बसण्याने अपवित्र झाली होती. अर्थात, हे आश्रमातले सेवेकरी होते. ते तिथेच राहतात, तिथेच खातात. एकंदर त्यांचे पोटपाणी या आश्रमावर टिकलेले. पण, ते स्वतःला नारायण साकार हरीचे सेवेकरी म्हणवून घेतात.
या घटनेवरून अखिलेश यादव यांना विचारले गेले की, नारायण साकार हरींवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का? तर त्यांनी प्रश्नाला बगल देत उत्तर दिलेस, “याआधीही नारायण साकार हरींचे लाखोंचे सत्संग व्हायचे. चूक सरकारची आहे.” थोडक्यात नारायण साकार हरी हे निर्दोष आहेत, असे त्यांचे म्हणणे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना या घटनेत षड्यंत्र आहे, असे वाटत आहे. ते का वाटत आहे तर त्याचेही कारण आहेच. कारण, या घटनेनंतर सुरज पाल जाटवचे म्हणणे की, जे काही घडले ते समाजविघातक शक्तींनी हे घडवले आहे. आश्रमातल्या सेवेकर्‍यांपैकी एक जण म्हणाला, “नारायण साकार हरीच्या सत्संगमध्ये जास्तीत जास्त मागासवर्गीय समाजाचे लोक येतात. वरच्या जातीच्या लोकांना सहन झाले नाही म्हणून त्यांनीच हे सगळे केले असेल.” थोडक्यात, या घटनेवरून उत्तर प्रदेशमध्ये उच्चवर्णीय आणि अनुसूचित जातींमध्ये वादंग पेटवण्याचे उद्योग इथे सुरू करण्याच्या विचारात काही लोक आहे. मरणारे कसे अनुसूचित जातीचे होते वगैरे वगैरे बोलून जातीय दरी माजवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी, बसपा आणि काँग्रेसने जातीय समीकरण खेळत भाजपची पीछेहाट केली. येत्या विधानसभेमध्ये ‘सवर्ण विरोधी दलित’ असा मुद्दा पेटवत दलित आणि मुस्लिमांची एकगठ्ठा मत घेण्याचा प्रयत्न काही लोक करत आहे. या घटनेचा या सगळ्यांशी काही संबंध असू शकतो का? ते भविष्यात समोर येईलच. रिषीचे कूळ आणि नदीचे मूळ विचारू नये असे म्हणतात. पण, आजकाल गल्लोगल्ली असेच बाबाबुवा आणि माँ वगैरे तयार झालेत. विशेष म्हणजे, यातले काही लोक स्वतःला ‘ईश्वर’ म्हणून घोषित करतात, पण स्वतःसोबत त्यांच्या बायका-पोरांना पण ‘ईश्वर’ म्हणून घोषित करतात. (लोक त्यावरही विश्वास ठेवतात.) यात सर्वधर्मीय लोक आहेत. या लोकांची काही कामधंदा न करता वाढणारी संपत्ती, स्वतःला देव किंवा देवदूत, फरिश्ता वगैरे भासवून त्यांनी जनतेची चालवलेली फसवणूक याकडे कोण लक्ष देणार? या असल्या लोकांचे गुन्हे उघडकीस आल्यावर लोक पुढे येऊन सांगतात की, हे बाबाबुवा कसे थोतांड करायचे. आताही हाथरसच्या घटनेनंतर काही व्यक्ती पुढे आल्या आहेत. सुरज पाल कसा ढोंगी होता म्हणत, त्याची कुकृत्ये सांगत आहेत. जर या लोकांनी हे आधीच सांगितले असते तर? संशय आल्यावर गल्लीबोळांतल्या सामान्य माणसाला नाकीनऊ आणणार्‍या पोलिसांना या बाबाबुवांच्या थोतांडाबद्दल गुन्हेगारीबद्दल माहिती पडत नसेल का?

या घटनेमध्ये सुरज पालचा हाथरसमध्ये कार्यक्रम आयोजित करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण, याआधीही बलात्कारासह इतर चार गुन्हे असलेल्या सुरज पालचे नाव गुन्हेगार म्हणून नोंदवले गेले नाही. योगी आदित्यनाथ अनुसूचित जातीचे नाहीत, त्यामुळे या प्रकरणात अनुसूचित जातीच्या व्यक्तीवर गुन्हा नोंदवला, त्याच्यावर कारवाई केली तर त्यांच्यावर ठपका ठेवण्यात येईल. सुरज पाल अनुसूचित जातीचा आहे, म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल केला, तर राज्यात अनुसूचित जातीमध्ये असंतोष पसरेल. या अशा अनेक ‘जर-तर’च्या चक्रात उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारने फसूच नये. जर हा सुरज पाल गुन्हेेगार आहे, तर त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. निष्पाप धार्मिक लोकांचा जीव जाणार्‍या घटनेचे वास्तव अत्यंत दुःखद आणि संतापजनक आहे. सुखद जीवनाच्या आशेपोटी बळी गेलेले हे जीव. या घटनेवरून तरी समाजाने जागृत व्हावे. सकारात्मक प्रवचन, उपदेश देणार्‍या, चांगला मार्ग दाखवणार्‍यांचे समर्थन जरूर करावे. पण, कुणीही येऊन स्वतःला ‘देव’ म्हणवून घेत स्वार्थ साधत असेल, फसवणूक करत असेल तर आपली श्रद्धा आहे की अंधश्रद्धा, हे तपासण्याची वेळ समाजावर आली आहे.

९५९४९६९६३८

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.