चीनमधील ‘रनो-लॉजी’

    06-Jul-2024
Total Views |
china Runology


चीनमधून जगभरात पळून जाणार्‍या अतिश्रीमंत चिनी नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकाराला ‘रनो-लॉजी’ म्हणून ओळखले जाते. तेव्हा, यामागील नेमक्या कारणांचा आढावा घेणारा हा लेख...

चीन ही जगामधली दुसरी आर्थिक महाशक्ती. मात्र, चीनचे सर्वात मोठे शत्रू आहेत चीनमधीलच हुशार, श्रीमंत आणि कर्तबगार नागरिक. चीन सरकारला असे वाटते की, कुठल्याही नागरिकांनी इतकेही मोठे बनू नये की, ते ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’चे चक्क प्रतिस्पर्धी म्हणून पुढे येतील. आपल्याला आठवत असेल की, अनेक वेळा प्रसिद्ध चिनी नागरिक जे सरकारच्या विरोधात काहीही बोलतात, ते अचानक गायब होतात. जे परत येतात, ते काही वर्षांनंतर परत आल्यानंतर सरकारची केवळ स्तुती करत राहतात. आजकाल चीनमध्ये अतिशय श्रीमंत लोकांचे चीनबाहेर कायमचे पलायन ज्यांना (High Net Individuals) किंवा अतिशय श्रीमंत नागरिक असे म्हटले जाते ते वेगाने चीनमध्ये होत आहे.
 
अतिश्रीमंत नागरिकांच्या चीनबाहेरच्या पलायनाला ‘रनो-लॉजी’ (runxue or run-ology) या शब्दाने ओळखले जाते.
चीनबाहेर पळून जाणे हे कठीणच काम आहे आणि पळून गेल्यानंतर स्वतःची चीनमधली संपत्ती किंवा पैसे चीनच्या बाहेर नेणे, हे त्याहूनही एक मोठे आव्हान.

१५ हजार २०० अतिश्रीमंत चिनी नागरिक देशाबाहेर पळाले

‘रनो-लॉजी’ या शब्दाचा उगम २०२२ मध्ये झाला, ज्या वेळेला कोरोना /कोविड किंवा चिनी व्हायरसच्या काळामध्ये चीनमध्ये एवढी दडपशाही माजली होती की, बहुतेकांना वाटायला लागले की, चीनमध्ये राहण्यापेक्षा देशाच्या बाहेर जाऊन इतरत्र स्थायिक होणे, हेच जास्त सोपे आहे.

चीनच्या बाहेर पळून जाणार्‍या अतिश्रीमंत नागरिकांची संख्या ही प्रत्येक वर्षी वाढतच आहे. जगामध्ये विविध देशांतून जे श्रीमंत पळून इतर देशात स्थायिक होतात, त्यामध्ये चिनी नागरिक आघाडीवर आहे.

चिनी सरकारी आकड्यांप्रमाणे २०२३ मध्ये १५ हजार २०० चिनी नागरिक देशाबाहेर पळून गेले. हाच आकडा २०२२ मध्ये १३ हजार ८०० इतका होता.

चिनी नागरिकांच्या देशाबाहेर पळून जाण्यामुळे फायदा होतो तो युएई, अमेरिका, सिंगापूर आणि कॅनडा या देशांचा. कारण, त्यांना त्या नागरिकांची संपत्ती मिळते. जपानला पळून जाणार्‍या अतिश्रीमंत चिनी नागरिकांची संख्या पण लक्षणीय आहे.
श्रीमंतांनी आपली संपत्ती शेअर करावी

चिनी हुकूमशहा शी जिनपिंग यांचे २०२१ पासून म्हणणे आहे की, अतिश्रीमंत नागरिकांनी त्यांच्याकडे असलेले पैसे इतर जनतेच्या बरोबर शेअर करावे.

ज्या वेळेला अनियमितपणे व्यापारी किंवा कॉर्पोरेट वर्ल्ड किंवा अतिश्रीमंत नागरिकांवर सक्ती करून त्यांना ज्या क्षेत्रात त्यांना यश मिळाले आहे, तिथे थांबवले जाते, त्यावेळेला ते क्षेत्र कोसळते.

याचे एक उदाहरण म्हणजे, चिनी रिअल इस्टेट सेक्टर अचानक कोसळले. कारण, चिनी सरकारने तिथे असलेल्या कंपन्यांवर त्यांचा वाढण्याचा वेग कमी करण्याकरिता सक्ती करायला सुरुवात केली.

श्रीमंत आणि यशस्वी नागरिक जर त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये यश मिळवून संपत्ती निर्माण करत असतील, तर त्यांना थांबवणे हे चुकीचे आहे. कारण, यामुळे यशस्वी नागरिकांना वाटते की, आम्ही आमच्याच देशात सुरक्षित नाही आणि ते देशाबाहेर जाण्याचा देशाबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करतात. बाहेर पळून जाणार्‍या नागरिकांची संख्या चीनमध्ये वेगाने वाढत आहे.


चीन, नागरी स्वातंत्र्याबाबत भित्रा आणि कमजोर

आर्थिक, संरक्षण क्षेत्रात अधिकाधिक शक्तिमान होत असलेला चीन, नागरी स्वातंत्र्याबाबत भित्रा आणि कमजोर आहे. चीनमध्ये केवळ उद्योगपतीच नाही, कलाकार, खेळाडू आणि कार्यकर्तेही अशाच प्रकारे गायब झाले आहेत किंवा देशाबाहेर पळून गेले आहेत.

चीन सरकारचे धोरण हे उद्योजक, व्यावसायिकांच्या अचानक गायब होण्याचे, देशाबाहेर पळून जाण्याचे मोठे कारण आहे. खासगी उद्योगांकडे किंवा उद्योजकांच्या हाती अधिक मालमत्ता असू नये, अशी चीन सरकारची भूमिका आहे. शी जिनपिंग याला मोठा धोका समजतात. यामुळे गेल्या काही वर्षांपासून चीनमधील उद्योजकांची मालमत्ता जप्त करणं आणि त्यांच्या अटकेची प्रकरणं वाढली आहेत.

चिनी हुकूमशहा राष्ट्रपती शी जिनपिंग यांना अर्थशास्त्राविषयी फारशी माहिती नाही आणि त्यांनी चिनी अर्थव्यवस्थेला जो धक्का दिला आहे, यामुळे चिनी अर्थव्यवस्था मंदीकडे वाटचाल करत आहे.

चिनी श्रीमंतांचा कल कोणत्या देशांकडे?

चिनी श्रीमंत अशा देशात जात आहेत, जिथे लढाया होत नाहीत किंवा दहशतवाद नाही. उदाहरणार्थ, अतिशय दूर असलेले देश न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलिया. काही देशांत गोल्डन व्हिसा नावाची पद्धत आहे, जिथे श्रीमंत नागरिकांना लगेच नागरिकत्व दिले जाते. उदाहरणार्थ, युएई, पोर्तुगाल, जिथे चिनी नागरिक जात आहेत. अमेरिका आणि कॅनडामध्ये चांगल्या शाळा आहेत, शिक्षणाची आणि राहायची व्यवस्था चांगली आहे. याशिवाय, या देशांत अगोदरपासूनच राहणार्‍या चिनी नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. जपानमध्ये जाण्याचा फायदा आहे की, जपानची राहण्याची पद्धती ही पुष्कळशी चीनसारखीच आहे. या सगळ्या देशांत चिनी पळून जात आहेत. मात्र, सर्वात मोठे आव्हान आहे की, आपल्याबरोबर आपली संपत्ती घेऊन नव्या देशांमध्ये कसे जायचे?

चिनी कायदा दरवर्षी फक्त ५० हजार डॉलर्स एवढी संपत्ती देशाबाहेर बरोबर घेऊन जायला एका नागरिकाला परवानगी देतो. ही रक्कम अतिशय कमी आहे, कारण नव्या देशांमध्ये नवीन आयुष्य सुरू करण्याकरिता, याहून पुष्कळ जास्त पैसे खर्च करावे लागतात.

म्हणून, जास्त पैसे घेऊन जाण्याकरिता चिनी नागरिकांना गैरकानुनी पद्धती वापराव्या लागतात आणि यामध्ये हवाला पैसे घेऊन जाणारे किंवा अंडरग्राउंड बँकर्स आहे.

चिनी अंडरग्राऊंड बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करावे लागतात आणि तेवढेच पैसे नवीन देशांमध्ये त्यांच्या अंडरग्राउंड बँकेमध्ये मिळू शकतात. याचा सरकारला पत्ता लागत नाही.

श्रीमंत म्हणून चिनी तुरुंगात राहण्याऐवजी...

अमेरिकी गुप्तहेर संस्थांचे म्हणणे आहे की, चिनी हवाला पद्धतीने पैसे घेऊन जायची पद्धत ही अफू, गांजा, चरसचा व्यापार करणारे किंवा गुन्हेगार जगत, मोठ्या प्रमाणात वापरतात. हीच पद्धत चिनी श्रीमंतसुद्धा आपले पैसे परदेशात घेऊन जाण्याकरिता वापरतात.

बाहेरच्या देशात जाऊन स्थायिक झालेल्या चिनी नागरिकांना नवीन राहण्याची पद्धत नवीन राजकीय पद्धती, नवीन वातावरण, हवामान या अनेक नवीन आव्हांनाचा सामना करावा लागतो.

जर तुम्हाला सामाजिक जीवन आणि ‘सोशल अ‍ॅॅक्टिव्हिटी’ची सवय असेल तर ते काही ठिकाणीच होऊ शकते. बहुतेक देशांमध्ये ‘सोशल अ‍ॅक्टिव्हिटीज’ या त्या जातीजमाती किंवा एकाच धर्माच्या लोकांमध्ये होत असतात. पैसे असूनसुद्धा आपल्याला त्यांच्या ‘सोशल अ‍ॅक्टिव्हिटी’मध्ये भाग घेता येत नाही.

पण, असे असूनसुद्धा मोठ्या संख्येने चिनी नागरिक देशाच्या बाहेर पळून जात आहेत. कारण, त्यांना वाटते की, चीनपेक्षा अनेक लोकशाही पद्धती असलेले देश म्हणजे युरोप किंवा अमेरिकेमध्ये जीवन आणि राहणीमान हे चीनपेक्षा कितीतरी पटीने जास्त चांगले आहे. चीनने व्यक्ती व विचार-स्वातंत्र्याला नेहमीच कमी लेखले आहे. एक श्रीमंत म्हणून चिनी तुरुंगात राहायच्याऐवजी आपण एक मध्यमवर्गीय म्हणून युरोप किंवा अमेरिकेमध्ये जाऊन राहून आपले आयुष्य जास्त सुखाने जगू शकतो, व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित ठेवू शकतो.

भारतातसुद्धा काही राजकीय पक्षांना श्रीमंतांच्या संपत्तीचे वाटप करायचे होते. उच्च उत्पन्न असलेल्या श्रीमंतांनी आपली संपत्ती शेअर करावी, असे त्यांचे मत होते. तसे झाल्यास उद्योगपती आणि इतर, मेहनत करून संपत्ती निर्माण करणे थांबवतील, ज्यामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग कमी होईल आणि नुकसान हे देशाचे आणि सामान्य जनतेचे होईल.

(नि.) ब्रि. हेमंत महाजन