जोतिबा देवस्थानासाठी प्राधिकरणाची स्थापना

    06-Jul-2024
Total Views |

Jotiba
मुंबई : श्री जोतिबा मंदिर परिसर व त्याच्या आजूबाजूच्या डोंगराच्या परिसरातील गावांचा विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय शुक्रवार, दि. 5 जुलै रोजी महायुती सरकारने घेतला. अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यासंदर्भात माहिती दिली. अजित पवार म्हणाले की, “श्री ज्योतिबा मंदिर परिसर आणि त्याच्या आजूबाजूच्या डोंगराच्या परिसरातील गावांचा विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजित प्राधिकरणाची आवश्यकता आहे.
 
यासंदर्भात शासन स्तरावर कार्यवाही सुरू असून श्री जोतिबा मंदिर व परिसर विकास उत्कर्ष प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज हे वारकरी संप्रदायातील संतांचे मोठे गुरूबंधू मानले जातात. त्यांचे समाधीस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे विकास आराखडा तयार करून त्याला आवश्यक निधी देण्यात येणार आहे.
 
‘पिंक ई-रिक्षा योजने’चा विस्तार
अंतरिम अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वयंरोजगारनिर्मिती तसेच सुरक्षित प्रवासासाठी ’पिंक ई-रिक्षा’ योजनेची घोषणा करण्यात आली. या माध्यमातून 17 शहरांत प्रत्येकी दहा रिक्षा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार या योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय शुक्रवार, दि. 5 जुलै रोजी घेण्यात आला. “जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महिला व बालकल्याणासाठी राखीव तीन टक्के निधीतून जिल्हा व तालुका स्तरापर्यंत ही योजना पोहोचवली जाईल. यामधून प्रत्येक जिल्ह्यात 500 पिंक ई-रिक्षा उपलब्ध करून देण्यात येतील,” असे अजित पवारांनी स्पष्ट केले.