अवजड ट्रकने अडवली घोडबंदरची वाट

    06-Jul-2024
Total Views |

Ghodbandar
ठाणे : ‘मेट्रो’चे काम, त्यातच भरपावसाळ्यात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती कामांसाठी वाहतूक बदल होत असताना शुक्रवार, दि. 5 जुलै रोजी सकाळी घोडबंदर रोडवर बंद पडलेल्या ‘मल्टी एक्सल’ अवजड ट्रकमुळे ठाण्याची कोंडी झाली. सकाळी ऐन वर्दळीच्या वेळी झालेल्या वाहतूककोंडीमुळे प्रवाशांना इच्छित स्थळ गाठताना मोठी कसरत करावी लागली. रस्त्यांवर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्याने चाकरमानी खोळंबले. घोडबंदर, शीळफाटा, मुंबई-नाशिक महामार्ग, मुंब्रा बायपास, ठाणे-बेलापूर, मुंबई-आग्रा रोड, पूर्व-द्रुतगती महामार्गावर कोंडीचा परिणाम पाहायला मिळाला. अखेर, तीन तासांनी वाहतूक पोलिसांनी ‘क्रेन’च्या मदतीने हा ‘मल्टी एक्सल’ ट्रक हलवल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.
 
ठाण्याकडून घोडबंदरच्या दिशेने जाणार्‍या मार्गावर आनंदनगर सिग्नल येथे शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास एक ‘मल्टी एक्सल’ ट्रक बंद पडला. यामुळे ठाण्यात दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. जवळपास 10 कि.मी.पर्यंत वाहनाच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. कोंडी सोडविण्यासाठी ठाणे वाहतूक विभागाचे शर्तीचे प्रयत्न सुरु होते. मात्र, आनंदनगर येथे रस्ता अरुंद असल्याने वाहतूककोंडीत भर पडली.
 
कोंडीत अडकलेल्या काही वाहनचालकांनी उलट्या दिशेने आपली वाहने वळवल्याने काही क्षणातच रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. घटनेची माहिती मिळताच ठाणे पोलीस वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी ‘क्रेन’च्या साहाय्याने ट्रकला तब्बल साडेतीन तासांनी म्हणजेच साडेदहा वाजता बाहेर काढण्यात यश मिळवले. या कालावधीत वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गही वाहनांना उपलब्ध करून दिले होते.
 
रस्ता अरुंद असल्याने अडचण
घोडबंदर रोडवर आनंदनगर येथे शुक्रवारी सकाळी बंद पडलेल्या मल्टी एक्सेल ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात अवजड सामान होते. त्यातच तेथील रस्ता अरुंद असल्याने हा अवजड ट्रक तेथून हलविण्यात अडचण निर्माण झाली होती. पण वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने हा ट्रक हलवला. त्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली.
- डॉ. विनयकुमार राठोड, वाहतूक उपायुक्त