'लाईफलाईन' मध्ये माधव अभ्यंकर दिसणार किरवंताच्या भूमिकेत

    05-Jul-2024
Total Views |

madhav  
 
 
मुंबई : आधुनिक विज्ञान आणि परंपरा यांच्यातील संघर्षावर भाष्य करणारा 'लाईफलाईन' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तत्पूर्वी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या महाराष्ट्राचे लाडके ‘अण्णा’ माधव अभ्यंकर यांची व्यक्तिरेखा समोर आली आहे. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात देवाब्राह्मणांच्याआशीर्वादाने चित्रपटातील माधव अभ्यंकर यांच्या व्यक्तिरेखेच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. आपल्या विचारांवर, मतांवर ठाम असणाऱ्या एका खंबीर किरवंताची ते या चित्रपटात भूमिका साकारत आहेत.
 
आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी आणि भारदस्त व्यक्तिमत्वाने माधव अभ्यंकर यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमच स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता 'लाईफलाईन'मधून एका वेगळ्याच भूमिकेतून ते चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत.
आपल्या भूमिकेबद्दल माधव अभ्यंकर म्हणतात, '' देव आयुष्य देतो, तर किरवंत मोक्ष देतो, अशा धार्मिक विचारसरणीची ही व्यक्तिरेखा असून त्याचा भक्ती, श्रद्धा यांवर जास्त विश्वास आहे. प्रत्येक धार्मिक क्रियेमागे काही कारण असते, हे पटवून देणारी ही व्यक्तिरेखा आहे. यापूर्वी मी अनेक भूमिका साकारल्या परंतु अशा प्रकारची भूमिका मी प्रथमच साकारत आहे. त्यातही अशोक सराफ यांसारखे मातब्बर कलाकार माझ्यासोबत आहेत. त्यामुळे ही माझ्यासाठी सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. तरुण दिग्दर्शकासोबत काम करण्याचा अनुभवही कमाल होता. हल्लीच्या तरुणाईचा दृष्टिकोन, त्यांची कामाची पद्धत हेसुद्धा शिकण्यासारखे आहे.'' ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी ठरलेला हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.