विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबन कालावधीत कपात

आजपासून कामकाजात सहभागी होऊ शकणार

    05-Jul-2024
Total Views |

ambadas danwe
 
मुंबई : विधान परिषद सभागृहात भाजप आ. प्रसाद लाड यांना शिवीगाळ करणार्‍या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पाच दिवसांकरिता निलंबन करण्याचा निर्णय दि. 2 जुलै रोजी घेण्यात आला होता. मात्र, त्यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केल्यानंतर या कालावधीत कपात करीत तो तीन दिवसांचा करण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवार, दि. 4 जुलै रोजीपासून ते विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी होऊ शकतील.
 
राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याचे पडसाद सोमवार, दि. 1 जुलै रोजी विधान परिषदेत उमटले. “त्यांच्यावर सुमोटो दाखल करून लोकसभेत पाठवावा,” अशी मागणी आ. प्रसाद लाड यांच्यासह भाजप आमदारांनी लावून धरली. त्याचा राग आलेल्या अंबादास दानवे यांनी भरसभागृहात प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. त्याचे तीव्र पडसाद उमटले. आ. लाड यांनी सभागृहाच्या पायर्‍यांवर बसून आंदोलन केले. तसेच, भाजपसह महायुतीच्या आमदारांनी तीव्र निदर्शने केली.
 
सभागृहातही दानवेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्यात आल्याने सभागृह तीनवेळा तहकूब करण्यात आले. त्यानंतर संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासंदर्भात सभागृहात प्रस्ताव मांडला. त्यावर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन केले. अंबादास दानवे यांनी दि. 3 जुलै रोजी घडलेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करणारे पत्र उपसभापती गोर्‍हे यांना पाठवले.
 
त्यानंतर या विषयावर गटनेत्यांची बैठक पार पडली. त्यात निलंबनाचा कालावधी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, “निलंबनाचा कालावधी पाच दिवसांवरून तीन दिवस करण्यात यावा,” असा ठराव संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सभागृहात मांडला. हा ठराव सभागृहाने मान्य केला असून, हा ठराव संमत केल्याची घोषणा यावेळी उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी सभागृहात केली.