केवळ पुस्तकी नव्हे तर निसर्गाचं ज्ञानही अवगत करावं : पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे

SNDT महिला विद्यापीठाचा १०९ वा वर्धापन दिन थाटात संपन्न!

    05-Jul-2024
Total Views |
 
SNDT
 
मुंबई : विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकातीलच नव्हे तर निसर्गाचं ज्ञानही अवगत करायला हवे, असे प्रतिपादन 'बीजमाता' पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी केले. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी SNDT महिला विद्यापीठाचा १०९ वा स्थापना दिन राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, ५ जुलै २०२४ रोजी उत्साहात पार पडला.
 
याप्रसंगी पद्मश्री राहीबई सोमा पोपेरे यांनी उपस्थितांन मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, "मी कधीही शाळेची पायरी चढली नाही, पण निसर्गाची शाळा मात्र शिकली आहे. आज अनेक पुरस्कारांनी माझं घर भरलं असून हे सगळे पुरस्कार माझ्या मातीचे आणि माझ्या शेतकरी बांधवांचे आहेत. आपली काळी आई कशी वाचवता येईल यासाठी मी काम केलं. मी माझी सगळी शेती गावठी बियाणे आणि विषमुक्त पद्धतीने करते. आपण आपलं बी बियाणं जपून ठेवलं तरच ते आपल्या पुढच्या पिढीला मिळेल. प्रत्येक गावात देशी बियाण्याची बँक, प्रत्येकाच्या दारात पसरबाग, किचन गार्डन आणि प्रत्येकाच्या ताटात विषमुक्त अन्न हवं, हीच माझी ईच्छा आहे. ज्या दिवशी प्रत्येकाचं ताट विषमुक्त होईल त्या दिवशी माझ्या कामाचं सार्थक होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकातीलच नव्हे तर निसर्गाचं ज्ञानही घ्यायला हवं," असे प्रतिपादन त्यांनी केले.
 
राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी बोलताना महिलांमधील साक्षरतेच्या वाढत्या दराबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच महर्षी धोंडो केशव कर्वे आणि इतर महापुरुषांच्या महिलांच्या शिक्षणातील योगदानावर भाष्य केले. राष्ट्रीय विकासात महिलांच्या भूमिकेचे आणि उच्च पदांवरील महिलांच्या वाढत्या संख्येचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच त्यांनी विद्यापीठाला एनईपी २०२० अंतर्गत समन्वित शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे अधिक चांगले शिक्षक घडविण्याचे सूचित केले. प्रा. उज्वला चक्रदेव यांच्या सक्षम नेतृत्वाखाली विद्यापीठाने प्रगती करून टॉप १०० विद्यापीठांच्या यादीत येण्याची इच्छा व्यक्त केली.
 
एनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. उज्वला चक्रदेव यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणात बी व्यवस्थापनाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात विद्यापीठाने केलेल्या गुंतवणुकीची तुलना केली. विद्यापीठाच्या प्रगतीची आणि विकासाची माहिती देत त्यांनी विद्यापीठाला पीएम-उषा अनुदान बहाल केल्याबद्दल सरकारचे आभार मानले. सदर कार्यक्रमात विविध पुरस्कारदेखील वितरित करण्यात आले. विद्यापीठाचे प्र. कुलगुरु प्रा. रूबी ओझा यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभारप्रदर्शन केले.