आनंदाच्या गोष्टीतही विरोधकांचे राजकारण! दरेकरांनी सुनावले खडेबोल

    05-Jul-2024
Total Views |
 
Pravin Darekar
 
मुंबई : आनंदाच्या गोष्टीतही विरोधकांचे राजकारण सुरु आहे, असे म्हणत भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने चांगली खेळी करत तब्बल १३ वर्षांनी आयसीसी विश्वचषक स्पर्धा जिंकली. या पार्श्वभूमीवर आज मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार करण्यात येणार आहे. पण या सत्काराचे निमंत्रण नसल्याचे सांगत भाई जगताप आणि अनिल परब यांनी सभागृहात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावर प्रविण दरेकर यांनी विरोधक आनंदाच्या गोष्टीतही राजकारण करत असून खोटे बोल पण रेटून बोल अशी त्यांची भुमिका आहे, अशी टीका केली.
 
हे वाचलंत का? -  मिरवणूकीच्या बसवर टीका करणारे रोहित शर्माच्या मागे फोटोसाठी पळत होते!
 
प्रविण दरेकर म्हणाले की, "भाई जगताप आणि अनिल परब यांचा मुद्दा रास्त आहे. त्याच्याशी आम्हीही सहमत आहोत. अधिकृत निमंत्रण सभापती किंवा विधिमंडळ म्हणून दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना देणे अपेक्षित आहे यात दुमत असायचे कारण नाही. आपला देश जगज्जेता झाला. लाखोंचा जनसागर उसळला होता. परंतू, तुम्हाला ती गुजरातची बसच दिसली, एवढ्या कोत्या मनोवृतीचे आहात हे बरोबर नाही. निमंत्रणावर मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांचा फोटो लावणार नाही, तर मग काय शंभर फोटो लावायचे का? असा सवाल करत विरोधक अशा वेळेला पण आनंद साजरा न करता राजकारण करतात. खोटे बोल पण रेटून बोल असे धोरण विरोधकांचे आहे," असे म्हणत त्यांनी सभागृहात विरोधकांना खडेबोल सुनावले.