"निंदा किंवा वंदा..."; दानवेंच्या शेरोशायरीला दरेकरांचे कवितेतून चोख प्रत्युत्तर

    05-Jul-2024
Total Views |

Darekar & Danve
 
मुंबई : सभागृहात अर्थसंकल्पावर भाषण केल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेरोशायरीत सरकारवर टीका केली. दरम्यान, त्यांच्या या शेरोशायरीला भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी कवितेच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले. तीन दिवसांच्या निलंबनानंतर अंबादास दानवे यांनी आज सभागृहात उपस्थिती लावली होती.
 
प्रविण दरेकर म्हणाले की, "अंबादास दानवेंच्या म्हणण्यानुसार अर्थसंकल्प म्हणजे मुर्खपणाचे लक्षण आहे. पण त्यांचं काय म्हणणं होतं ते चार-पाच दिवसांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यांनी आता भाषण करताना म्हटले की, खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा. अंबादास दानवे असे वक्तव्य करत असताना मी कविता केली आहे," असे म्हणत त्यांनी आपली कविता वाचून दाखवली. 
 
"विचारी तूच तुझ्या मना,
महाराष्ट्रात विकासाच्या दिसतात की नाही पाऊलखुणा.
तुम्ही काहीही म्हणा, निंदा किंवा वंदा
महाराष्ट्राचा विकास करत आहेत शिंदे, फडणवीस आणि अजितदादा.
त्यामुळे सर्वसामान्य माणूस युतीच्या मागे उभा आहे खंदा.
पुन्हा चालू राहील महायुतीचा शिव्या देण्याचा आपला नियमित धंदा,"
 
अशी कविता म्हणत प्रविण दरेकरांनी अंबादास दानवेंना चोख प्रत्युत्तर दिले.