मरीन ड्राईव्ह परिसरात महापालिकेची रात्रभर स्वच्छता मोहिम!

दोन डंपर, पाच जीप भरून कचरा संकलन

    05-Jul-2024
Total Views |
Marine Drive news bmc

मुंबई : टी २० क्रिकेट विश्वचषक- २०२४ विजेत्या भारतीय संघाच्या स्वागतासाठी मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात दि. ४ जुलै २०२४ रोजी रात्री उशिरापर्यंत लाखोंच्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. स्वागत सोहळा आटोपून ही गर्दी ओसरल्यानंतर महानगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण मरीन ड्राईव्ह परिसरात रात्रभर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या भागात सकाळी चालण्यासाठी नित्यनेमाने येणाऱ्या मुंबईकरांसाठी हा सर्व परिसर स्वच्छ करून उपल्बध करून देण्यात आला.

महापालिकेच्या ए विभागाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सुमारे १०० कामगारांनी, स्वयंसेवी संस्थांच्या कामगारांच्या मदतीने केलेल्या या कार्यवाहीतून एक कॉम्पॅक्टर आणि एक डंपर कचरा संकलित झाला. त्यासोबतच छोट्या पाच जीप भरून कचरा संकलन करण्यात आले. रात्री ११.३० वाजता सुरु झालेली कार्यवाही सकाळी ८ वाजेपर्यंत निरंतर सुरु होती. दरम्यान ए विभागाचे सहायक आयुक्त जयदीप मोरे यांच्या देखरेखीखाली या संपूर्ण परिसरात स्वच्छता करण्यात आली.

मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होवू नये, यासाठी मरीन ड्राइव्ह परिसरात ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले होते. या स्वच्छता मोहिमेतून खाद्यपदार्थांचे वेष्टन (रॅपर्स), पाण्याच्या बाटल्या, पिशव्या, यासह बूट, चप्पल आणि इतर वस्तू देखील मोठ्या प्रमाणात संकलित करण्यात आल्या. या संकलित कचऱयापैकी सुमारे ५ जीप भरुन संकलित बूट, चप्पल व इतर पुनर्प्रक्रिया योग्य वस्तू इत्यादी क्षेपणभूमीवर न पाठवता त्या पुनर्प्रक्रियेसाठी देण्यात येणार आहेत.