विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात

दोन अर्ज बाद; मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात चुरस

    05-Jul-2024
Total Views |

vidhan parishd
मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी जाहीर झालेली निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. अर्ज दाखल केलेल्या मुख्य उमेदवारांपैकी एकानेही माघार न घेतल्यामुळे शुक्रवार, दि. १२ जुलै रोजी ११ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. एकूण १२ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
या निवडणुकीसाठी एकूण १४ अर्ज दाखल झाले होते. पैकी अरुण जगताप आणि अजय सिंह सेंगर या अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद झाले. शुक्रवार, दि. ५ जुलै रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. या मुदतीत उर्वरित १२ पैकी एकाही उमेदवाराने माघार घेतली नाही. त्यामुळे मतदान घ्यावे लागणार आहे. दि. १२ जुलै रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत विधान भवन, मुंबई येथे मतदान प्रक्रिया पार पडेल.
दरम्यान, विधानपरिषदेत जाणारे सर्व ११ सदस्य हे विधानसभेच्या आमदारांद्वारे निवडले जाणार आहेत. सद्यस्थितीत भाजपाचे विधानसभेतील संख्याबळ १०३, शिवसेना ३७, राष्ट्रवादीचे ३९, इतर छोटे पक्ष ९ आणि अपक्ष १३ असे मिळून २०१ आमदारांचे बळ महायुतीकडे आहे. महाविकास आघाडीचा विचार करता काँग्रेस ३७, उबाठा १५, शरद पवार गट १३, शेकाप आणि अपक्ष मिळून ६७ आमदार त्यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे या संख्याबळानुसार, महायुतीचे ९ तर महाविकास आघाडीचे २ आमदार सहज निवडून येऊ शकतात. अशावेळी मविआने अतिरिक्त उमेदवार मैदानात उतरवल्याने घोडेबाजार अटळ असल्याचे मानले जात आहे.
 
हे उमेदवार रिंगणात :
भाजप - पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत
शिवसेना - भावना गवळी आणि कृपाल तुमाने
राष्ट्रवादी - राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे
काँग्रेस - प्रज्ञा सातव
उबाठा गट - मिलिंद नार्वेकर
शेकाप - जयंत पाटील (शरद पवार गटाचे समर्थन)