मरीन ड्राईव्ह-वानखेडेवर लोटला क्रिकेट फॅन्सचा अलोट सागर!

मुंबई लोकल, रस्त्यांवर चाहत्यांची झुंबड! वरुणराजाही स्वागताला

    04-Jul-2024
Total Views |
 
Team India
 
मुंबई : वर्ल्ड कप (T-20 World Cup) जिंकल्यानंतर आज टीम इंडिया भारतात दाखल झाली असून अख्खी मुंबई त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. मुंबईमध्ये टीम इंडियाची नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत अतिशय भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आहे.
 
टीम इंडियाच्या स्वागतासाठी लाखो क्रिकेट चाहते नरिमन पॉईंट परिसर, मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे स्टेडियमवर दाखल झाले आहेत. आपल्या आवडत्या खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी चाहते उतावीळ झाले आहेत. संपूर्ण वानखेडे स्टेडियम 'मुंबईचा राजा रोहित शर्मा' अशा घोषणांनी दुमदुमलं आहे.
 
टीम इंडिया मुंबईत दाखल होण्याच्या कितीतरी वेळेआधीच सर्व चाहत्यांनी गर्दी केली. एवढंच नाही तर मध्येच पाऊस पडायला सुरुवात झाल्यानंतरही हे चाहते आपल्या जागेवरून हलले नाहीत. नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत डबल डेकर ओपन बसमधून टीम इंडियाची विजयी परेड काढण्यात येणार आहे. त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. विमानतळापासून तर मरीन ड्राईव्ह रस्त्यापर्यंत सर्व परिसर क्रिकेट प्रेमींनी गजबजलेला आहे. याशिवाय रेल्वे स्थानकांवरदेखील मुंबईकरांनी गर्दी केली आहे.
 
टी-२० विश्वचषक २०२४ जिंकल्यानंतर वादळात अडकलेला भारतीय क्रिकेट संघ अखेर चार दिवसांनंतर बार्बाडोस या कॅरेबियन बेटावरून मायदेशी परतला आहे. आज सकाळी टीम इंडिया भारतात दाखल झाल्यानंतर संपूर्ण टीमने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियासोबत विजयोत्सव साजरा केला. त्यानंतर आता मुंबईतही टीम इंडियाचं भव्य स्वागत करण्यात येत आहे.