शहीद अग्निवीरांविषयी खोटे दावे करणाऱ्या राहुल गांधींवर कारवाई होणार? भाजपनं दिली अध्यक्षांना नोटीस

    04-Jul-2024
Total Views |
 rahulgandhi
 
नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणातील चुकीच्या आणि खोट्या माहितीवर कारवाई करण्यासाठी सत्ताधारी भाजपने लोकसभा अध्यक्षांना नोटीस पाठवली आहे. राहुल गांधींविरोधात पाठवण्यात आलेल्या नोटिशीची माहिती देताना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, "सभागृहाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणारा कोणताही सदस्य सहजासहजी सुटणार नाही."
 
राहुल गांधींच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी भाजपच्या नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातील खासदार आणि माजी परराष्ट्र मंभी सुषमा स्वराज यांच्या कन्या बान्सुरी स्वराज यांनी केली आहे. त्यांनी लोकसभा अध्यक्षांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर राहुल गांधींच्या भाषणातील काही चुकीच्या गोष्टींबद्दल त्यांच्या नोटीसची दखल घेण्याची विनंती केली होती.
 
रिजिजू पुढे म्हणाले की, "लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथ्य आणि आकडेवारीसह अनेक गोष्टींवर खोटे बोलत असताना सभापतींना नोटीस देण्यात आली आणि आम्ही सभापतींना योग्य कारवाई करण्याची विनंती केली आहे. आम्ही कारवाईची वाट पाहत आहोत." पुढे बोलताना ते म्हणाले की, "सर्वांना समान नियम लागू होतात कारण सभागृहातील कोणताही सदस्य सभापतींपेक्षा वरचा नाही."
 
रिजिजू पुढे म्हणाले की, "कोणीही सुटण्याची आशा करू शकत नाही. एखाद्याला विशेष अधिकार मिळू शकत नाहीत कारण तो विशेषाधिकारप्राप्त कुटुंबातून आला आहे.” संसदीय कामकाज मंत्री म्हणाले, "जर कोणाला सभागृहात आपल्या पदाचा गैरवापर करून सभागृहाची दिशाभूल करायची असेल, तर तो सहजासहजी सुटू शकणार नाही. नियमानुसार त्या सदस्यावर कारवाई होईल."