ब्रिटनमध्ये मतदानास सुरूवात; ऋषी सुनक यांची खुर्ची जाण्याची शक्यता?

    04-Jul-2024
Total Views |
 Britain Election
 
लंडन : ब्रिटनमध्ये दि. ४ जुलै २०२४ सकाळपासून सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदानास सुरूवात झाली आहे. निवडणुकीत लाखो लोक मतदान करणार आहेत, या निवडणुकीत ब्रिटनमध्ये सत्तापरिवर्तन होऊ शकतो, असा अंदाज सर्व्हेक्षण संस्था वर्तवत आहेत. ब्रिटनमध्ये गेल्या १४ वर्षांपासून कंझर्व्हेटिव्ह पक्षाची सत्ता आहे. आता १४ वर्षांनंतर मजूर पक्ष सत्तेत येण्याची शक्यता आहे.
 
मतदान सर्वेक्षणानुसार, मजूर पक्षाला ४०० पेक्षा जास्त जागा मिळण्याची अपेक्षा आहे. ब्रिटनमध्ये भारताप्रमाणेच फर्स्ट-पास्ट-द-पोस्ट निवडणूक प्रणालीनुसार उमेदवाराच्या विजयाची घोषणा करण्यात येते. ब्रिटनची संसदेत ६५० सदस्य आहेत. ब्रिटनमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला किमान ३२६ जागा जिंकाव्या लागतील. जर एखाद्या पक्षाला बहुमत मिळाले नाही तर विद्यमान पंतप्रधानांना आघाडी सरकार स्थापन करण्याची पहिली संधी मिळते.
  
ब्रिटनच्या निवडणुकीत लेबर पार्टी, कंझर्व्हेटिव्ह पार्टी, लिबरल डेमोक्रॅट्स, रिफॉर्म यूके, स्कॉटिश नॅशनल पार्टी (एसएनपी), आणि ग्रीन पार्टी हे प्रमुख राजकीय पक्ष आहेत. ब्रिटनमध्ये सध्या भारतवंशीय पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखालील कंझर्व्हेटिव्ह पक्ष सत्तेत आहे. पण यावेळी त्यांचा पराभव होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ब्रिटनमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या मजूर पक्ष कीर स्टारर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे. त्यांच्या विजयाची शक्यता वर्तवली जात आहे.
  
निकाल जाहीर झाल्यानंतर, सर्वाधिक मते मिळविणाऱ्या पक्षाच्या नेत्याची पंतप्रधानपदी नियुक्ती केली जाईल. मतांची मोजणी झाल्यानंतर, ब्रिटनचा राजा (सध्याचा राजा चार्ल्स तिसरा) बहुमत असलेल्या पक्षाच्या नेत्याला नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करेल. निवडणूक तारखांच्या घोषणेनंतर सध्याची संसद ३० मे रोजी विसर्जित करण्यात आली होती.