अंबादास दानवेंच्या निलंबन कालावधीत कपात!

    04-Jul-2024
Total Views |
 
Ambadas Danve
 
मुंबई : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबन कालावधीत कपात करण्यात आली आहे. विधानपरिषद सभागृहात भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ करणाऱ्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पाच दिवसांकरिता निलंबन करण्याचा निर्णय दि. २ जुलै रोजी घेण्यात आला होता. मात्र, त्यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आता या कालावधीत कपात करत तो तीन दिवसांचा करण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवार, दि. ४ जुलैपासून ते विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी होऊ शकतील.
 
राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याचे पडसाद सोमवारी विधानपरिषदेत उमटले. त्यांच्यावर सुमोटो दाखल करून लोकसभेत पाठवावा, अशी मागणी आमदार प्रसाद लाड यांच्यासह भाजप आमदारांनी लावून धरली. त्याचा राग आलेल्या अंबादास दानवे यांनी भर सभागृहात प्रसाद लाड यांना शिविगाळ केली. त्याचे तीव्र पडसाद उमटले. आमदार लाड यांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. तसेच भाजपसह महायुतीच्या आमदारांनी तीव्र निदर्शने केली. सभागृहातही दानवेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्यात आल्याने तीनवेळा तहकूब करण्यात आले. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासंदर्भात सभागृहात प्रस्ताव मांडला. त्यावर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन केले.
 
हे वाचलंत का? -  अखेर ठरलं! 'या' दिवशी वसंत मोरे उबाठा गटात दाखल होणार
 
अंबादास दानवे यांनी दि. ३ जुलै रोजी घडल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करणारे पत्र उपसभापती गोऱ्हे यांना पाठवले. त्यानंतर याविषयावर गटनेत्यांची बैठक पार पडली. त्यात निलंबनाचा कालावधी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, निलंबनाचा कालावधी ५ दिवसांवरून ३ दिवस करण्यात यावा, असा ठराव संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात मांडला. हा ठराव सभागृहाने मान्य केला असून, हा ठराव संमत केल्याची घोषणा यावेळी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात केली.