नुकतीच गुरुपौर्णिमा सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने गुरू-शिष्यांचे नाते जपणारा पवित्र वैदिक संदेश देणारा हा लेख...
कुविन् मा गोपां करसे जनस्य,
कुविद् राजानं मघवन् ऋजीषिन्।
कुविन् म ऋषिं पपि-वांसं सुतस्य
कुविन् मे वस्वो
अन्वयार्थ
अर्थात, (कुवित्) ज्ञानवंत गुरो! (मा जनस्य गोपां करसे) मला जनतेचा रक्षणकर्ता बनवा! (कुवित्) हे परमगुरो! (मघवन्) हे पूजनीय ज्ञानधना! (ऋजीषिन्) ऋजुतेनेव - सरळतेने धर्ममार्गावर चालविणार्या गुरूदेवा! (मा राजानं करसे) मला राजा बनवा. (कुवित्) हे आचार्य! (मा ऋषिं करसे) मला ऋषी बनवा (कुवित्) हे परमगुरो! (मा) मला (सुतस्य पपि-वांसं करसे) चांगल्या प्रकारे उत्पन्न झालेल्या सोमतत्वाचे रसपान करणारा बनवा. (कुवित्) हे गुरूदेवा! (मे) मला (वस्वः) दैवी संपदा व (अमृतस्य शिक्षाः) मोक्षाच्या विद्या शिक्षा, प्रदान करा!!
विवेचन
या मंत्रात गुरू-शिष्य परंपरेचे आदर्श स्वरूप रेखाटले आहे. यावरून असे लक्षात येते की, गुरू-शिष्याचे नाते हे आजकालचे नसून फार प्राचीन म्हणजेच वेदकाळापासूनचे आहे. शिष्य आपल्या गुरूंकडे प्रार्थना करताना, त्याने गुरूंसाठी जी संबोधने वापरली आहेत, त्यांतून गुरूंची दिव्यता, महत्ता व ज्ञानवैभवाची अपूर्वता दिसून येते, तर शिष्याच्या याचनेतून उच्चकोटीची उदार भावना दिसून येते.
या मंत्रात गुरूकरिता चारवेळा ‘कुवित्’ शब्द वापरला आहे. ‘कुविद्’ म्हणजेच कोविद! व्याकरणात कु + विच् - तं वेत्ति! म्हणजेच सर्व काही जाणणारा, प्रखर ज्ञानी, विद्वान, कुशल, बुद्धिमान, पवित्र असे अर्थ होतात. शिष्यात दडलेल्या विविध गुणदोषांना जाणून त्यास योग्य मार्गदर्शन करणारा तो कोविद! त्यासोबतच गुरूकरिता मघवन् व ऋजीषिन् हीदेखील संबोधने आलेली आहेत. मघ म्हणजे पूजनीय व पवित्र असे धन! इतर भौतिक धन पूज्य मानले जात नाही. कारण, ते कोणत्याही मार्गाने मिळविलेले असते. पण, मघ म्हणजे शाश्वत असे सद्गुणांचे धन. हे मात्र खरेच विशुद्ध धन होय. मनाची शांतता, चित्ताची एकाग्रता, सद्बुद्धी (सुमती), प्रज्ञान, सदाचार (सच्चारित्र्य), परोपकार, दया, दान, संयम इत्यादी मानवी संपदेने नटलेले धन म्हणजेच मघ! अशा या धनाने परिपूर्ण असलेले ते मघवंत गुरू होय.
दुसरे एक संबोधन आले आहे - ऋजीषित्! याचा अर्थ ऋजुता किंवा सरलता असा होतो. जे साधुवृत्तीचे व उत्तम, गुण, कर्म स्वभावाचे धनी आहेत, असे गुरूजनच ऋजीषित्! ते कधीही कुटिल स्वभावाचे नसतात. त्यांच्यात तर सौम्यता, सरळता व स्नेहशीलता दडलेली असते. प्रेमळ वृत्तीच्या या गुरूजींचा सर्वांशी सौजन्यपूर्ण व्यवहार असतो. अशा गुरूंकडे आल्यावर शिष्य त्यांच्याकरिता वरील संबोधने वापरतो. याद्वारे एकप्रकारे तो आपली नम्रता अभिव्यक्त करतो. गुरूंजवळ येताना विनयशीलता हवी. समित्पाणिः श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम्! ब्रह्मनिष्ठ अशा शास्त्रवेत्ता गुरूंजवळ येताना शिष्याने आपल्या हाती समिधा आणाव्या, असे उपनिषदात विधान आहे. समिधा म्हणजे प्रज्वलित होण्यायोग्य लाकडे! जी यज्ञात आहुती देण्यासाठी वापरतात. ती अधिक ओली किंवा अधिक वाळलेली नसावी. सहजपणे प्रज्वलित होण्याचे सामर्थ्य समिधांमध्ये असावे. शिष्यदेखील त्या समिधांप्रमाणे ज्ञानरूप अग्नीने आत्म्याला प्रदीप्त केलेला असावा.
हा शिष्य गुरूंकडे नम्रपणे सकल प्राणीमात्रांच्या व विशेष करून मानव समाजाच्या कल्याणासाठी याचना करतो. जसे गुरू, तसा शिष्यदेखील हृदयाने उदार आहे. त्याची पहिली याचना आहे -
मा जनस्य गोपां करसे!
गुरूंकडून घेतलेले ज्ञान, विद्या किंवा शिक्षण हे केवळ स्वतःच्याच भल्यासाठी नव्हे, तर सबंध जगाच्या रक्षणासाठी असावे. सभोवतालची जनता ही अज्ञान, अभाव, अन्याय व नाना प्रकारच्या दुर्गुणांनी वेढलेली आहे. त्रिविध दुःखांनी संतप्त झालेली ही दुनिया योग्यतम ज्ञानाच्या अभावी पशुवत जीवन जगते. त्यांना अज्ञानातून बाहेर काढणे, अभावग्रस्तांकरिता धनाची व्यवस्था करणे, अन्याय पीडितांवरील अन्याय दूर करणे व त्यांच्या अंतःकरणात रूजलेली दुर्गुण-तिमिरांची किल्मिषे नाहीशी करणे, याच पवित्र उद्देशापोटी शिष्य गुरूंकडे मागणे मागतो. त्यांच्या रक्षणासाठी शक्ती व बळाची कामना करतो. ही एकप्रकारे सर्वात मोठी जनसेवा आहे. केवळ स्वतःच्या स्वार्थाकरिता जगणार्यांची संख्या भरमसाठ झाली आहे. मग दीन-दुःखी रंजल्या-गांजल्यांची सेवा करणारे समाजसेवक नकोत का? अज्ञानाचे काळोख निवारण्यासाठी वेदांचे उपदेशक, प्रचारक, पंडित हवेतच. अंधश्रद्धा व अनिष्ट रुढी-परंपरा नाहीशा करणारे समाजसुधारक हवेत. आध्यात्मिक व धार्मिक उपदेश करण्यासाठी संतजन हवेत. जनता जनार्दनाचे रक्षण करण्यासाठी शिष्याची गुरूंकडे झालेली ही आर्त विनवणी खर्या अर्थाने वैदिक शिक्षा व्यवस्थेचा आदर्श आहे.
शिष्याची दुसरी कामना आहे -मा राजानं करसे!
प्रजेला सुखी ठेवण्यासाठी समर्थ राजा हवा. क्षत्रिय वृत्ती बाळगणारा शिष्य हाच आदर्श राजा बनू शकतो. उत्तम राजा हा आपल्या प्रशासन व्यवस्थेद्वारे विविध योजना राबवत जनतेला सुखी करू शकतो. रयतेच्या अनेक प्रकारच्या दुःखांना नाहीसे करीत त्यांना सर्व सुखांनी न्हाऊ घालणारा राजा म्हणजे त्या राष्ट्राचे खरे भूषण होय. ‘राजा प्रकृतिरञ्जनात्!’ म्हणजेच समस्त प्रजेला नेहमी सुखी व आनंदी ठेवण्यात ज्याचा प्रत्येक क्षण व्यतीत होतो, तोच खरा राजा होय. आपल्या गुरूंकडे अभिव्यक्त होणारी शिष्याची ही राष्ट्रकल्याणाची आकांक्षा देशाच्या सर्वंकष हितासाठी मोलाची ठरते. आदर्श राजे प्रजेकरिता पित्यासमान असतात. म्हणूनच उत्तम राजा होण्याची वैदिक प्रार्थना ही सार्थकच म्हणावी.
शिष्य आपल्या गुरूंकडे तिसरी याचना करतो, ते ऋषी बनण्याची!
मे ऋषिं करसे!
ऋग्वेदात म्हटले आहे - ‘ऋषिः स, यो मनुर्हितः!’ जो मानवमात्राचे हित साधतो. आपल्या ज्ञान-विज्ञानाच्या बळावर तत्वचिंतन करीत व साधनामय जीवन जगत जगाला नवदृष्टी देतो, तसेच आध्यात्मिक व भौतिक क्षेत्रात नवनवीन संशोधने करून देशवासीयांना शाश्वत सुखाचा मार्ग दाखवतो, तो ऋषी किंवा ती ऋषिका असते. वेद, उपनिषद, दर्शन इत्यादी वैदिक साहित्य आणि लौकिक संस्कृत साहित्य यांच्यातील रहस्योद्घाटने करीत त्यांची अगदी सोप्या पद्धतीने सूत्ररूपाने मांडणी करण्याचे कार्य ऋषी-ऋषिका करतात. आज केवळ भौतिक पदार्थ विद्येत व तंत्रज्ञानात संशोधने होत आहेत. पण, वैदिक आध्यात्मिक क्षेत्राशी निगडित चिंतन व संशोधन कमी पडत आहे. आजच्या युगात शिष्याची ही उपरोक्त मागणी अतिशय प्रासंगिक ठरणारी आहे.
शिष्याची यानंतरची प्रार्थना आहे -
मा सुतस्य पपि-वांसं करसे!
काही शिष्य मोहमायांनी भरलेल्या या जगात राहू इच्छित नाहीत. तीव्र वैराग्य वृत्तीमुळे त्यांना सांसारिक विषय हे विषाप्रमाणे भासतात. ईश्वरीय ब्रह्मानंदाचा आस्वाद घेण्याकरिता ते आसुसलेले असतात. वैदिक शास्त्रात ‘सोम’ शब्दाचा एक अर्थ ‘आध्यात्मिक सुख’ हा आहे. या मंत्रात आलेल्या ‘पपिवांस’ शब्दाचा अर्थ ‘सोमरसाचे पान’ करणारे असा होतो. भौतिक भोगवस्तूंच्या जंजाळात न गुरफटता नेहमी ईश्वरभक्ती, उपासना व योगसाधनेत जीवन व्यतीत करीत ब्रह्मानंदाचा आनंद घेणे, म्हणजेच सोमपान करणे होय.
शिष्याचे यापुढचे मागणे वस्वः(वसवः) म्हणजेच वसुंचे आहे. वसु शब्दाचा अर्थ प्राण, धन आणि दैवी संपदा असा होतो. माणूस जगतो तो प्राणांच्या बळावर! जर आपले प्राण बलवान असतील, तर दीर्घायुष्य लाभते. प्राणायामाने मनावर संयम बाळगता येतो. शारीरिक व मानसिक विकार नाहीसे होतात. निरोगी शरीर हे सर्व प्रकारच्या धनांचा उपभोग घेण्यास समर्थ ठरते. त्याबरोबरच, त्यांना सर्व प्रकारच्या संपत्तीचा लाभही होतो. म्हणूनच सर्वांचा आधार प्राण आहेत. प्राण कमजोर असतील, तर ना ना प्रकारचे विकार उत्पन्न होऊन शरीर बलहीन बनते. त्यामुळे मिळवलेले विद्याधन, ऐश्वर्य हे सगळे नष्ट होऊ लागते. यासाठीच शिष्याची गुरूंकडे प्राणविद्येची मागणी!
शेवटी हा शिष्य ‘मे अमृतस्य शिक्षा करसे!’ अशी याचना करतो. अमृतविद्या म्हणजेच मोक्षविद्या! संपूर्ण जग हे विघातक अशा अपप्रवृत्तींनी भरलेले आहे. अशा जगात नानाविध दुरितांनी व दोषांनी ग्रासलेले लोक दिशाहीन झाल्याने त्यांना शाश्वत सुखाचा मार्गच सापडत नाही. जन्मोजन्मीच्या पापवासनेमुळे व षड्रिपूंच्या कुचक्रात अडकल्याने त्यांचे जीवन क्लेशदायी बनले आहे. हे पाहून सुयोग्य शिष्यास फार वेदना होत आहेत. म्हणूनच त्रिविध दुःखांतून मुक्त होऊन परब्रह्माच्या सान्निध्यात जाण्याची म्हणजेच अध्यात्मिक मार्ग अंगीकारण्याची त्याची तीव्र इच्छा म्हणजे मोक्षेच्छु बनण्याचा मौलिक उपाय आहे.
प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
9420330178