प. बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली आहे. तसेच तेथे अराजक आहे. लोकसभा निवडणुकीवेळी हिंसाचार झाला नाही, याचा अर्थ तेथे गैरप्रकार घडला नाही, असा नाही. तृणमूलने बळजबरीने निवडणुका जिंकल्या, असे काँग्रेसी नेत्यानेच जाहीरपणे सांगितल्याने त्याची पदावरून थेट उचलबांगडी करण्यात आली. भाजप आजवर हेच सांगत आला आहे.
प. बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेलीच आहे. निवडणुकीनंतरचा हिंसाचारही बंगालला नवीन नाही. प्रत्येक वेळी निवडणूक झाली की प. बंगाल पेटतो, हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. काँग्रेसचे प. बंगालचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी एकच चूक केली. त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर थेट आरोप केले. इतकेच नव्हे, तर निवडणूक असो वा नसो, बंगालमध्ये अराजकाला तोंड द्यावे लागते, असा गंभीर आरोप केला. महापालिका निवडणुकीत आम्हाला मतदानाची संधीच मिळाली नाही. बळजबरीने तृणमूलने निवडणुका जिंकल्या, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. लोकसभेत काही ठिकाणी मतदान शांततेत पार पडले असले, तरी सर्वत्र तसे शांततेत मतदान झाले, असे आपण म्हणू शकत नाही. विरोधकांना मारहाण करून किंवा बळजबरीने तृणमूल स्वतःच्या पक्षात प्रवेश देते. विरोधात जाणार्याला सरळसरळ संपवले जाते. नवी दिल्लीत संत म्हणून वावरणार्या ममता यांचा पक्ष बंगालमध्ये प्रत्यक्षात सैतान आहे, असे अधीर रंजन यांनी म्हटलेले काँग्रेसलाही रुचले नाही.
ममता यांच्याविरोधात पत्करलेले वैर अधीर रंजन यांना भलतेच महाग पडले. काँग्रेसने कोणतीही पूर्वकल्पना न देता, त्यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवले. खेदाची बाब म्हणजे, अधीर रंजन यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली बोलावलेल्या बैठकीतच त्यांचा उल्लेख ‘माजी अध्यक्ष’ असा केला, तेव्हा त्यांना पक्षाच्या नेतृत्वाने घेतलेला निर्णय समजला. अधीर रंजन यांनी अत्यंत स्वाभाविकपणे काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर सडकून टीका केली आहे. खर्गे आल्यापासून काँग्रेसची देशभरातील इतर सर्व गोठवली गेली आहेत, अशी कडवट प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. बंगालमध्ये काँग्रेसची धुरा कोण सांभाळणार, हे अद्यापही स्पष्ट झाले नसले, तरी ममता यांच्या मर्जीतील नेताच, तेथे प्रदेशाध्यक्ष होईल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. केवळ ममता यांना केलेला विरोध अधीर रंजन यांची उचलबांगडी करणारा ठरला, हे मात्र कोणीही नाकारू शकणार नाही.
त्यांचे पद का गेले, याबाबत आता अनेक शक्यता मांडल्या जात आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी ममतांनी काँग्रेससाठी जागा सोडण्यास नकार दिला होता. प्रत्यक्षात विरोधकांची ‘इंडी’ आघाडी भाजपला रोखण्यासाठी एक झालेली होती. मात्र, ममता यांना राज्यात काँग्रेस नको होती. अधीर रंजन यांनीच ममता यांच्यासोबत जुळवून घेण्यास नकार दिल्याने, जागावाटप फिसकटले, अशी माहिती मिळत आहे. ममता यांनी ‘इंडी’ आघाडीत सहभागी व्हायचे की नाही, यावर जी कडवट प्रतिक्रिया व्यक्त केली होती, त्यावर व्यक्त होणे अधीर रंजन यांना भलतेच महागात पडले. खुद्द खर्गे त्यावेळी भडकले होते, असे म्हणतात. ममता यांना विरोध करणार्या अधीर रंजन यांनाच पक्ष सोडावा लागेल, असे संकेत मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिले होते. लोकसभेच्या निवडणुकीत प. बंगालमध्ये काँग्रेसचा अपेक्षेप्रमाणेच दारुण पराभव झाला आणि तेथे काँग्रेसला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. आता अवमानास्पद परिस्थिती पदावरून हकालपट्टी झाल्यामुळे अधीर रंजन यांचा जळफळाट झाला असून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलविरोधातच काम करणार असल्याचे ते म्हणतात. काँग्रेसने बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढवावी, असा आग्रह धरणारा नेताच तेथून पक्षातून बाहेर काढला गेला, ही आश्चर्याची बाब आहे.
2026 साली तेथे विधानसभा निवडणुका होणार असून काँग्रेसने त्यादृष्टीने आतापासून मोर्चेबांधणी आखण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी तृणमूलबरोबर पुन्हा एकदा हातमिळवणी करण्याचा विचार काँग्रेस करत आहे. विरोधाभास म्हणजे, ज्या तृणमूलने काँग्रेससाठी जागा सोडण्यास नकार दिला, त्याच पक्षावर टीका केली म्हणून अधीर रंजनसारख्या नेत्याची हकालपट्टी काँग्रेसने केली आहे. सत्तेसाठी हा पक्ष किती लाचार, अगतिक झाला आहे, हेच या निर्णयातून अधोरेखित झाले आहे. स्वबळावर काँग्रेस आज देशातील एकाही राज्यात निवडणूक लढवू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. कर्नाटकात ती मुस्लीम मतांचे धृवीकरण झाल्यामुळे सत्तेवर आली असली, तरी कर्नाटकी काँग्रेस सरकारच्या मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप आहेत. तसेच कर्नाटकी तिजोरी पूर्णपणे रिकामी तर झाली आहेच, त्याशिवाय राज्याच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढला आहे. तेथील रेवडीवाटप काँग्रेस सरकारला भलतेच महागात पडले आहे. हे केवळ एक प्रातिनिधिक उदाहरण झाले. देशभरात काँग्रेसी कार्यकाळात असेच प्रकार घडत होते आणि विकासाची कोणतीही ठोस कामे राबवली जात नव्हती.
प. बंगालमधील हिंसाचारावर भाजपने सातत्याने आवाज उठवला आहे. ममता यांच्या कार्यकाळात अल्पसंख्याकांचे जे लांगूलचालन होते, ते वेळोवेळी दाखवून दिले आहे. संदेशखली येथील महिलांच्या शोषणातील मुख्य आरोपी शाहजहान शेख याला ममता बॅनर्जी यांनी कशा पद्धतीने पाठीशी घातले, हेही देशाने पाहिले. बंगालमध्ये निवडणूक हिंसाचाराची दीर्घ परंपरा आहे. 1980 तसेच 1990च्या दशकात जेव्हा बंगालच्या राजकीय पटलावर डावे आणि काँग्रेस यांच्यात लढा होता, त्यावेळी या दोघांच्यात हिंसाचार होताना दिसून आला. जेव्हा जेव्हा सत्ताधारी पक्षाला विरोधकांकडून कडवे आव्हान मिळाले, तेव्हा तेव्हा निवडणुकांमध्ये बंगाल पेटलेला दिसून आला आहे. डावे सत्तेत असताना, काँग्रेसला संघर्ष करावा लागला. त्यानंतर आता तृणमूल काँग्रेस तीच परंपरा कायम ठेवताना दिसून येते आहे. भाजपचा बंगालच्या राजकीय क्षितिजावर झालेला उदय ममता यांच्या तृणमूल काँग्रेससमोर कडवे आव्हान उभे करणारा ठरल्याने ममता यांची तृणमूल काँग्रेस रक्तरंजित निवडणुका घडवून आणत आहे. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका हे बंगालमध्ये मृगजळ आहे, हेच वास्तव आहे. अधीर रंजन यांनी बंगालमधील हिंसाचार आणि अराजकावर जाहीरपणे भाष्य केले आणि भाजपच्या आरोपाची पुष्टी केली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायलाच हवे.