डोंबिवली : लाडकी बहिण, आयुषमान कार्ड सर्वच योजनांचा लाभ मिळणार एका छताखाली
31-Jul-2024
Total Views |
कल्याण : भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र पवार फाऊंडेशनच्या वतीने कल्याण मध्ये दोन दिवसीय शासकीय योजनांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, मतदार नोंदणी अभियान, आयुष्यमान भारत कार्ड या योजनांचा कल्याणकर नागरिकांना लाभ घेता येणार आहे. गुरुवारी १ ऑगस्ट व शुक्रवारी २ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० ते रात्री ८ वाजेपर्यंत कल्याण पश्चिमेतील भोईरवाडी येथील श्री सिद्धीविनायक हॉल याठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दर महा १५०० रुपये मिळणार आहेत. या योजनेच्या लाभासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र रहिवासी, विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे, बँक खाते किंवा पोस्ट खाते आवश्यक आहे. या आधारकार्ड, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र नसेल.
तर १५ वर्षा पूर्वीचे रेशनकार्ड- मतदार ओळख पत्र- जन्म प्रमाणपत्र, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड किंवा रु. २.५० लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले पांढरे रेशनकार्ड किंवा उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जदारांचे हमीपत्र, बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो, महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे अधिवास प्रमाण पत्र, १५ वर्षा पूर्वीचे रेशनकार्ड मतदार ओळख पत्र जन्म प्रमाणपत्र, ज्या महिलेचे नाव रेशनकार्डवर नसल्यास पतीचा किंवा वडिलांचा उत्पन्नाचा दाखला हि कागदपत्रे आवश्यक आहेत.
तर मतदार नोंदणी अभियानासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, लाईटबिल नसेल तर गॅस बुक किंवा बँक पासबुक आणि सफेद बॅकग्राऊंड असलेला १ फोटो. हि कागदपत्रे आवश्यक आहेत. दोन दिवसीय शिबिरातुन उपस्थित महिलांचे ऑफलाईन अर्ज भरून हे अर्ज त्याच ठिकाणी ऑनलाईन अपलोड केले जातील. महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतः चा मोबाईल व सत्यप्रत (ओरिजनल) कागदपत्रे बरोबर घेऊन येणे अनिवार्य आहे. तरी कल्याण मधील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले आहे.