ठाणे : खाजगी रुग्णालयात छोटी शस्त्रक्रिया करायची झाली तरी, हजारो रुपये मोजावे लागतात. एका तरुणाला खाजगी रुग्णालयात हाताच्या अंगठ्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. मात्र सिव्हील रुग्णालयाने कमाल केली आहे. रुग्णालयातील भौतिकोपचार व व्यवसायोपचार विभागात केलेल्या सकारात्मक उपचारांनी तरुणाची शस्त्रक्रिया तर दूर पण अंगठ्याच्या हालचाली पूर्ववत झाल्या आहेत.
ठाण्यात रहाणारे प्रमोद शर्मा यांचा हाताचा अंगठा गेल्या अनेक दिवसांपासून दुखत होता. सकाळी उठल्यावर अंगठा दुमडला की पुन्हा सरळ करताना भरपूर त्रास व्हायचा. त्यामुळे याचा परिणाम नोकरी व्यवसायावर झाला होता. अंगठ्यावर इलाज करण्यासाठी एका खाजगी रुग्णालयात प्रमोद गेले. या ठिकाणी सर्व तपासण्या केल्या मात्र कोणतेही निदान झाले नाही. शेवटी अखेरचा उपाय म्हणून या खाजगी रुग्णालयात अंगठ्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला.
मात्र यासाठी ४० ते ५० हजार रुपये खर्च सांगण्यात आला. प्रमोद यांची परिस्थितीत बेताचीच असल्यामुळे हा खर्च परवडणारा नव्हता. अंगठ्याच्या त्रासाने त्रस्त झालेल्या प्रमोद यांनी ठाणे सिव्हील रुग्णालयात धाव घेतली. यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे, अस्थीतज्ज्ञ डॉ. विलास साळवे यांच्या मार्गदर्शनात रुग्णालयात उपचार घेतले.
सिव्हील रुग्णालयात सुरुवातीला मलम, औषध - गोळ्यांनी अंगठ्यावर काय फरक पडतो ते तपासण्यात आले. त्यानंतर अगठ्याला प्लास्टर लावण्याचा विचार करण्यात आला. पुढे भौतिकोपचार व व्यवसायोपचार विभागात उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला. यावेळी विभागात अंगठा तपासून, योग्य तो उपचार सुरू केला. नियमित अंगठ्याचा व्यायाम आणि भौतिकोपचार करण्यात आले. एका महिन्यातच प्रमोद यांचा अंगठा बरा झाला.
यासाठी भौतिकोपचार व व्यवसायोपचार तज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर सलगर, डॉ. नम्रता पाटणे, डॉ. सुप्रिया कांबळे यांनी परिश्रम घेतले.
सिव्हील रुग्णालयातील भौतिकोपचार व व्यवसायोपचार विभागात चांगल्या पद्धतीच्या सोयीसुविधा आहेत. त्यामुळे पाय, गुडघे मानदुखीने त्रस्त झालेले रुग्ण या ठिकाणी उपचार घेतात. प्रमोद शर्मा यांच्या हाताच्या अंगठ्याची शस्त्रक्रिया करायला सांगितली. मात्र भौतिकोपचार व व्यवसायोपचार विभागात त्यांच्यावर चांगले उपचार झाले.