‘दानवें’ची विकृतता!

    03-Jul-2024
Total Views |
legislative council lop ambadas danve


आई-बहिणीवरून घाणेरड्या शिव्या देणे, हे रस्त्यावरच्या टपोरी, गटारछाप, नशेडी, असंस्कृत व्यक्तीलाच शोभते. पण, हेच काम अंबादास दानवे या राज्याच्या विधान परिषदेतील ठाकरे गटाच्या विरोधी पक्षनेत्याने केले. शिस्तभंगाची कारवाई झाल्यावर ते म्हणाले, “निलंबन करून माझा आवाज दाबणे म्हणजे जनतेचा आवाज दाबणे.” अरे देवा, अंबादास यांना ते म्हणजे जनता वाटतात की काय? अन् महाराष्ट्राची जनता काय ऊठसूट आई-बहिणीवरून घाणेरड्या शिव्या देते का? व्यक्ती शिव्या देऊन त्यांच्यातल्या विकृतीला वाट मोकळी करून देतात, असे काही मानसशास्त्रज्ञ सांगतात. या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांच्या मनात कोणती विकृती दडली असेल की ती अशी विधान परिषदेमध्ये शिव्यांच्या रूपातून बाहेर आली? त्यांनी शिवीगाळ केली, त्यावेळी सभापतीपदावर एक महिलाच होती? सभागृहात इतर महिला नेत्याही होत्याच. त्यांचाही हा अपमानच! बरं, अशी शिवीगाळ का केली, तर राहुल गांधी यांनी हिंदू हिंसक आहेत, असे विधान केले. देशातील बहुसंख्य समाजाचा अपमान केला म्हणत प्रवीण दरेकर यांनी निषेध केला आणि प्रसाद लाड यांनी त्या ठरावाला समर्थन केले. त्या समर्थनार्थ ते अंबादास दानवेंना राहुल गांधींच्या विधानाबाबत प्रश्न विचारत होते. याचा राग अंबादास यांना आला. अर्थात, त्यानंतर पुढे अंबादास म्हणाले की, हिंदुत्ववादी म्हणून माझ्यावर ७०-८० गुन्हे दाखल झाले. पण, त्यांचे हे उत्तर म्हणजे भूतकाळ आहे. राहुल गांधी यांनी खुलेआम देशातल्या करोडो हिंदूंचा लोकसभेत अपमान केला. तेव्हा, अंबादास यांच्यातले हिंदुत्व कुठे गेले होते? अर्थात, तेच काय त्यांचे मालक उद्धव आणि पवारही राहुल यांच्या हिंदूविरोधी विधानावर काही बोलणार नाहीत. कारण, ‘व्होट जिहाद’चे महत्त्व त्यांना कळले आहे. हिंदूंची बाजू घेऊन उद्धव किंवा पवार त्यांच्या त्या खास मतदारांना नाराज करणारच नाहीत. या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे राहुल गांधींबद्दल काय बोलणार? हिंदूंचे समर्थन करावे तर आश्रयदाते नाराज आणि राहुल गांधींचे समर्थन करावे, तर महाराष्ट्राची जनता नाराज होणार, या द्विधावस्थेत अंबादास सापडले असावेत. मात्र, अंबादास आणि त्यांच्यासारख्या लोकांना एकच विनंती, तुमच्या घाणेरड्या भांडणात कुणाच्याही घरातल्या आयाबहिणींमध्ये आणू नका. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. जेथे शत्रूच्या स्त्रीलाही मातेसमान मानले जाते.

बालबुद्धी नाही...

काँग्रेसने या देशावर ७० वर्षे राज्य का केले? याचे उत्तर राहुल गांधी यांच्याकडे पाहून मिळते. राहुल गांधी यांना खोटे बोलण्यावरून अनेकदा न्यायालयीन चौकशीला सामोरे जावे लागते. ते न्यायालयात त्याबद्दल गुपचूप माफी मागून परत येतात. आल्यानंतर काही वेळ अंदाज घेऊन पुन्हा खोटे बोलतात. त्यांना ‘बालबुद्धी’ म्हणून गणले जाते. पण, ते अजिबात ‘बालबुद्धी’ नाहीत. बालक दुष्ट नसते. जातीय विषमता वाढवण्यासाठी बालक उत्सुक नसते. सत्तेसाठी अराजकता माजवणे हे ध्येय तर बालकाचे अजिबात नसते. बालक निर्व्याज असते. त्याच्यावर प्रेम करणार्‍याचा त्याला लळा लागतो. घरात खायचे, लाड करून घ्यायचे आणि बाहेरगावी जाऊन घरातल्यांचीच खोटीखोटी निंदा करायची. बाहेरच्यांना घरातल्यांविरोधात उकसवायचे, हे असले धंदे बालकांना कुणी तरी करताना पाहिले आहे का? छे जगभरात कोणतेही बालक असे नसते. त्यामुळे राहुल गांधी यांना ‘बालबुद्धी’ म्हणणे, हे चूक आहे. तसेच लोकसभेच्या सत्रात राहुल गांधी यांनी ‘अग्निवीर’ योजनेबाबत म्हटले की, अग्निवीरांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून काहीच सहकार्य मिळत नाही. ‘अग्निवीर’ ही देशाच्या बाह्य आणि अंतर्गत सुरक्षिततेसाठीची उत्तम योजना आहे, हे कुणीही सांगेल. मात्र, राहुल गांधी या योजनेच्या विरोधात आहेत. त्याचाच परिपाक म्हणून राहुल यांनी ‘अग्निवीर’ योजनेसंदर्भात लोकसभेत मुद्दा उपस्थित केला. पण, त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा खरा आहे का? तर बुलडाण्याचे अक्षय गवाटे हे ‘अग्निवीर’ योजनेतून देशाची सेवा करताना हुतात्मा झाले. त्यांच्या पित्याने स्पष्ट केले की, त्यांच्या मुलाच्या शूर मृत्यूनंतर त्यांना सरकारकडून तत्काळ आर्थिक सहकार्य मिळाले. मुलाच्या वीरतेचा योग्य तो सन्मानही करण्यात आला. राहुल गांधी मतांसाठी ८५०० रुपयांचे खटाखट खोटे बोलतात, ते कदाचित माफ होईल. पण, देशाच्या सुरक्षिततेच्या संदर्भातही ते खोटे बोलतात? ‘अग्निवीर’ योजनेमुळे देशामध्ये शूरसैनिकी युवकयुवती निर्माण होतील. त्यामुळे भविष्यात देशाच्या बाह्य आणि अंतर्गत शत्रूला चांगलीच जरब बसेल. या योजनेला राहुल गांधींचा विरोध का? देशाच्या सुरक्षिततेला विरोध करणारी बालबुद्धी नसते, तर देशविरोधी बुध्दी आहे.

९५९४९६९६३८