सार्थक व्हावे या जन्माचे!

    03-Jul-2024
Total Views |
human life sadhana


जन्मास आलेल्या प्रत्येक मानवाने वरील तीन उद्दिष्टे आपल्यात आहेत काय? याचा विचार करावा. त्यांच्या प्राप्तीसाठी अहर्निश प्रयत्न करावेत. जीवनाची ही सर्वात मोठी साधना आहे. ज्याप्रमाणे धन, मान, प्रतिष्ठा इत्यादी मिळविण्याकरिता प्रत्येक माणूस धडपड करतो, त्याचप्रमाणे या तीन तत्त्वांना प्राप्त करण्याकरिता प्रयत्न करावयास हवा. त्याबरोबरच संततीला जन्मास घालू इच्छिणार्‍या दाम्पत्यानेदेखील वरील तीन उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवूनच गर्भाधान संस्कार करावा आणि जन्म दिल्यानंतरदेखील आपल्या मुलांबाळामध्ये वरील वेदोक्त उद्दिष्टांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करावा.

जनिष्वा देववीतये सर्वताता स्वस्तये।
आ देवान् वक्ष्य् अमृताँ ऋता वृधो यज्ञं देवेषु पिस्पृश:॥
(ऋग्वेद-6/15/18)
अन्वयार्थ
हे मानवा! तू (देव-वीतये) दिव्यत्वाच्या प्रकाशनासाठी (सर्व ताता= सर्व+तातये) सर्वांच्या विस्तार व विकासाकरिता (स्वस्तये) समग्र विश्वाच्या कल्याणाकरिता (जनिश्व) जन्म घे! सुसंततीला जन्माला घाल! याच त्रिविध उद्देशाकरिता (ऋता वृध:) सत्यवर्धनशील, सदाचारी अशा (अमृतान्) निर्दोष व अमृतमयी देवी-देवतांना, सत्पुरुषांना (आ+वक्षि) शिरोधार्ह मानून धारण कर, वहन कर! (यज्ञं) स्वतःच्या जीवनरुपी यज्ञाला, पवित्र कर्मांना (देवेषु) दिव्य तत्त्वांसोबत, देवतांशी, महापुरुषांशी (पिस्पृश:) स्पर्श कर, संयुक्त कर!

 विवेचन

या भूतलावर जन्म-मृत्यूचे चक्र निरंतर सुरू आहे. अनेक जण जन्माला येतात आणि आपली जीवनयात्रा संपवून निघून जातात. पण, जन्म तर त्यांचाच सार्थक मानला जातो, ज्यांनी की आपल्या जीवनात काहीतरी श्रेष्ठ कर्मे केली आहेत. म्हणूनच तर संतांनी म्हटले आहे- मरावे परी कीर्ती रुपी जगी उराव!
याच अनुषंगाने विविध सुभाषितकारांचे विचारदेखील तितकेच मोलाचे ठरतात. भर्तृहरी म्हणतो-

परिवर्तिनि संसारे मृत: को वा न जायते।
स जातो येन जातेन याति वंश: समुन्नतिम्॥
हाच धागा पकडून या मंत्रात जन्मस्थितीच्या सार्थकतेचा विचार प्रतिपादित केला आहे. बाळाला जन्माला घालणार्‍या आई-वडिलांनी विचार करून प्रजोत्पादन करावे किंवा जन्माला आलेल्यांनीदेखील आपल्या जीवनाचा उद्देश लक्षात घेऊन जगण्याचा प्रयत्न करावा! उगीच कसेबसे जगण्याची निरर्थक उठाठेव करू नये.

वरील मंत्र गृहस्थाश्रमींसाठी अतिशय उद्बोधक असा आहे. विवाह संस्कारप्रसंगी वर-वधू सप्तपदी चालतात. त्यावेळी ‘प्रजाभ्य: पंचपदी’ असे उच्चारत उचलल्या जाणार्‍या पाचव्या पावलांचा उद्देशच उत्तम संतती जन्माला घालण्यास्तव आहे.

मंत्रातील पहिले चरण हेच स्पष्ट करते की, आम्ही संतती का म्हणून जन्माला घालावी? किंवा ज्यांचा जन्म झाला आहे, त्यांनी हे लक्षात ठेवावे की आपण का जन्माला आलो आहोत? या मंत्रांशात जन्माची तीन उद्दिष्टे सांगितले आहेत. जन्म का व कशासाठी? तर त्याची उत्तरे आहेत- देववीतये, सर्वताता-ये, आणि स्वस्तये! या तिन्ही शब्दात चतुर्थी एकवचन आहे. याचा अर्थसाठी किंवा करिता असा होतो!

पहिले उद्दिष्ट आहे देव-वीतय! जे दिव्यत्वाने व ज्ञानप्रकाशाने परिपूर्ण असतात, ते देव असतात. ज्यांच्यात दातृत्व असते, त्यांनाही ‘देव’ म्हणतात. ‘वी’ धातूपासून ‘वीति’ शब्द तयार होतो. त्याचे गती, प्राप्ती, प्रजनन, कांती, प्रकाश असे अनेक अर्थ होतात. ‘देववीती’ म्हणजे दिव्यत्वाने गतिमान होणे, दिव्य गुणांना प्राप्त करणे, दिव्यता निर्माण करणे, दिव्यगुणाची कांती-तेज वाढविणे व त्याचे प्रकाशन करणे! जन्मास येणारी संतती ही दिव्यतत्त्वांना प्रकाशित करणारी असावी. ज्याने जन्म घेऊन सत्यज्ञानाची साधना केली व त्याचा सर्वत्र प्रकाश करण्याचा प्रयत्न केला, तो ‘देववीती’ होय. त्याबरोबरच जीवनभर जो दिव्य गुणांनी परिपूर्ण होऊन गतिमान राहिला आहे. तसेच ज्याने आपल्या परिसरालादेखील दिव्यगुणांचा प्रकाश प्रदान केला आहे. तसेच समाजातील अन्याय, अभाव व अज्ञान नाहीसे करण्यासाठी जो सतत प्रकाशमान व गतिमान राहिला आहे, तो ‘देववीती’ आहे. ज्याप्रमाणे सूर्य संपूर्ण ब्रह्मांडाला आपल्या तेजाने प्रकाशित करतो, तद्वतच जन्माला येणार्‍या मानवाने सूर्य बनून स्वप्रकाशित व्हावे आणि जिथे जिथे अज्ञानाचे तिमिर दाटले आहे, त्यांना आपल्या ज्ञानप्रकाशाने नाहीसे करावे. ज्याचे चालणे, बोलणे व वागणे हे नेहमीच दिव्यत्वाने परिपूर्ण असते, तोच खरा ‘देववीती’ होय.

मानवी जन्माचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, सर्वतातये! ‘सर्व + ताति’ शब्दाचे चतुर्थी वचन म्हणजे तातये! या शब्दाचा अर्थ विस्तार किंवा विकास होय. आपल्यामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी असतील, त्या ओळखाव्यात व त्यांचा विस्तार करावा. जेव्हा परमेश्वराने आम्हाला या भूतलावर मानव देह देऊन पाठविले आहे, तेव्हा निश्चितच आपल्यात काही ना काही सत्य, पवित्र व उत्कृष्ट गोष्टी विद्यमान आहेतच. त्यांचा शोध घेऊन ते विकसित करणे आवश्यक ठरते. यासाठी प्रयत्न व पुरुषार्थ करावयास हवा. स्वतः विकसित झाल्यानंतर त्या त्या उत्तम तत्त्वांचा इतरांनाही लाभ करून द्यावा. म्हणजेच आपणांकडे जे काही उत्तमोत्तम आहे, त्यांचा विस्तार करावा. ते समाजाला वितरित करावे. संकुचित भावनेने आपण ते स्वतःकडेच ठेवता कामा नये. जे काही आपणाकडे उत्तम, उदात्त आणि पवित्र असेल, ते इतरांना देण्याचा प्रयत्न करावा.

तिसरे वैशिष्टय म्हणजे स्वस्तये! स्वस्ति म्हणजेच कल्याण, उत्तम अस्तित्व आणि मांगल्यता! आपला जन्म हा वाईटासाठी किंवा पापकर्मासाठी असता कामा नये. तो तर नेहमीच स्वतःच्या व इतरांच्या कल्याणासाठी असला पाहिजे. आपल्या प्रत्येक कृतीतून समग्र विश्वाकरिता भद्रता व सत्कर्मशीलता दृष्टीस पडावयास हवी. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतची संपूर्ण दिनचर्या ही स्वस्तिमय असावी. शरीराच्या प्रत्येक अंग-प्रत्यंगातून स्वस्तिभावना उदयास यावी. मनसा-वाचा- कर्मणा आपण सदैव ‘सु +’ अस्तित्वात राहिले पाहिजे. असे जगणे असावे की ज्यातून इतरांनाही नेहमीच स्वस्तिमार्ग मिळावा.

जन्मास आलेल्या प्रत्येक मानवाने वरील तीन उद्दिष्टे आपल्यात आहेत काय? याचा विचार करावा. त्यांच्या प्राप्तीसाठी अहर्निश प्रयत्न करावेत. जीवनाची ही सर्वात मोठी साधना आहे. ज्याप्रमाणे धन, मान, प्रतिष्ठा इत्यादी मिळविण्याकरिता प्रत्येक माणूस धडपड करतो, त्याचप्रमाणे या तीन तत्त्वांना प्राप्त करण्याकरिता प्रयत्न करावयास हवा. त्याबरोबरच संततीला जन्मास घालू इच्छिणार्‍या दाम्पत्यानेदेखील वरील तीन उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवूनच गर्भाधान संस्कार करावा आणि जन्म दिल्यानंतरदेखील आपल्या मुलांबाळामध्ये वरील वेदोक्त उद्दिष्टांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करावा.

वरील तीन गोष्टी प्राप्त करण्याकरिता महापुरुषांच्या सत्संगाची व त्यांच्या उपदेशाची गरज असते. म्हणूनच दुसर्‍या चरणात म्हटले आहे - जे ‘ऋतावृध:’ म्हणजेच सदाचारी व सत्याचारी महात्मे आहेत किंवा जे ज्ञानामृताने परिपूर्ण असलेले, सत्य मार्गाने चालणारे देवपुरुष आहेत, त्यांच्या सान्निध्यात राहावे. ते दिव्यजन जे काही मार्गदर्शन करतात, त्यांना शिरोधार्ह मानून त्यांवर आचरण करण्याचा प्रयत्न करावा. अशा सत्याचरणी व ज्ञानमार्गी लोकांचे उपदेश व वचन हे जीवनाला नवी दिशा देणारे ठरतात. अशा संत-माहात्म्यांच्या सत्संगाने आपल्या जीवनातून दुर्गुण आणि दोषांचे निर्मूलन होऊन जीवन विशुद्ध बनते. नानाविध वाईट सवयी नाहीशा होतात. ते महापुरुष जो काही उपदेश करतात, त्यांना दुर्लक्षित करून चालणार नाही. अगदी श्रद्धेने त्यांच्या विचारांना जीवनात अंगीकारणाचा प्रयत्न करावा.

शेवटी मंत्रात म्हटले आहे - ‘यज्ञं देवेषु पिस्पृश !. यज्ञ म्हणजे श्रेष्ठ कार्य!’ पण, इथे जीवनरुप यज्ञ असा अर्थ अभिप्रेत आहे. आपले जीवन हे अमूल्य आहे. ते व्यर्थच अनिष्ट कार्यात व्यतीत होता कामा नये. या जीवनाने दिव्य तत्त्वांना स्पर्श करावा. जीवनाचा प्रत्येक क्षण हा नेहमीच श्रेष्ठतम कार्याशी म्हणजेच यज्ञाशी जोडला जावा. अनिष्ट कार्यांत वेळ वाया घालवणे म्हणजे आयुष्य व्यर्थ बरबाद करणे होय. यासाठी जीवनाचा प्रत्येक क्षण हा अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, सदाचार, पावित्र्य, दया, करुणा, परोपकार, मानवता, राष्ट्रप्रेम, समाजसेवा इत्यादी दिव्यतम गोष्टींकरिता सत्कारणी लावणे होय.

मंत्रातील पवित्र आशय सर्वांच्या अंतरंगी रुजो व जन्म सार्थक ठरो, हीच मंगल कामना!प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
9420330178