'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'त अडथळा आणल्यास कठोर कारवाई होणार!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश

    03-Jul-2024
Total Views |
 
Shinde
 
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अडथळा आणल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत. या योजनेसंदर्भात मंगळवारी मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही जिव्हाळ्याने सुरु केली आहे. महिलांना आर्थिक साहाय्य मिळायला हवे आणि त्यांना तीन सिलेंडर मोफत मिळावे यासाठी आम्ही जिव्हाळ्यापोटी या योजना केल्या आहेत. त्यामुळे शासनाने सुरु केलेल्या या योजनांचा लाभ प्रत्यक्ष माता बहिणींना मिळायला हवा, त्यांची गैरसोय होऊ नये, त्यांची कुचंबना होऊ नये आणि त्यांच्याकडून पैशाची मागणी होऊ नये, असे आदेश आम्ही सर्व प्रशासनाला दिले आहेत. यात कुणीही लापरवाई केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल."
 
हे वाचलंत का? -  चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी राज्य सरकार प्रयत्न करणार का?
  
 
मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्सनास आल्यास अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे, जलदगतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, या योजनेचे संनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
 
या योजनेसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करुन देणे किंवा अर्ज भरुन देण्याचे निमित्त करुन निर्माण होणारे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. एखाद्या कार्यालयात असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित कार्यालयप्रमुख तसेच दलालांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
 
अपमान करणाऱ्यांना हिंदु सडेतोड उत्तर देणार!
 
राहुल गांधींनी हिंदुंविषयी केलेल्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, "हिंदु हिंसक आहे असं म्हणून राहुल गांधींनी तमाम हिंदुंचा अपमान केला आहे. खरंतर हिंदु हा सहिष्णू आणि संयमी आहे. कुठल्याही पक्षाचा हिंदू राहुल गांधींना कधीही माफ करणार नाही. तो संयमी आणि सहिष्णू असला तरी कुणी त्याचा अपमान केल्यास त्या अपमानाला सडेतोर उत्तर देणार," असेही शिंदे म्हणाले.