धारावीकरांना लवकरच बघायला मिळणार सॅम्पल फ्लॅट

धारावीचा मास्टर प्लॅन अंतिम टप्प्यात

    03-Jul-2024
Total Views |

dharavi


मुंबई, दि.३ :
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा पुनर्विकास करण्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड स्थापन करण्यात आली आहे. धारावीचा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी कंपनीने शहर नियोजन आणि पायाभूत अभियांत्रिकीसाठी विख्यात असलेल्या विदेशी कंपन्यांची मदत घेतली आहे. हा प्लॅन अंतिम टप्प्यात असून, तो पूर्ण होताच धारावीत एक सॅम्पल फ्लॅट उभारण्यात येणार असल्याची माहिती डीआरपीने दिली आहे.
राज्य सरकारच्या अटीनुसार, कंपनीची स्थापना झाल्यावर पुढील १५० दिवसांत प्रकल्प आराखडा राज्य सरकारला मंजुरीसाठी पाठवणे बंधनकारक आहे. त्यानुसार प्रकल्प आराखड्याचे काम सुरू आहे. या पुनर्विकास क्षेत्रात रिहॅब इमारती, शाळा, उद्याने, रुग्णालये उभारण्यात येतील. यासोबतच धारावीत सद्यस्थितीत असलेल्या उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी एक बिझनेस सेंटर उभारण्यात येईल, असे सर्व या आराखड्यात समाविष्ट असेल.
धारावीच्या पुनर्विकासासाठी अदाणी प्रॉपर्टीजच्या नियुक्तीला महाराष्ट्र सरकारने अंतिम मंजुरी दिली आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये, महाराष्ट्र सरकारने प्रकल्पासाठी निविदा सुरू केल्या होत्या. तेव्हा अदाणी समूहाने ५,०६९ कोटींची बोली लावत हा प्रकल्प मिळवला होता. मात्र प्रकल्प आराखड्याबाबत स्पष्टता नसल्याचा आक्षेप धारावीकरांचा आहे. धारावीचा पुनर्विकास प्रकल्प होत असताना त्याचा सुरुवातीला विकास आराखडा जाहीर करण्यात यावा, अशी धारावीकरांची मागणी आहे.