सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे मार्गाला गती

सोलापुरात भूसंपादनासाठी २४६ कोटी रुपयांचे वाटप पूर्ण

    03-Jul-2024
Total Views |

solapur dharashiv


सोलापूर, दि.३ :
गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असलेला सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे मार्ग आता वेगाने पुढे जाताना दिसतो आहे. या बहुचर्चित रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील धाराशिव ते तुळजापूर या मार्गासाठी मध्य रेल्वेने नुकतीच निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. या रेल्वे मार्गासाठीची भू संपादन प्रक्रिया देखील सुरु झालेली आहे. रेल्वेसाठी सोलापूरमध्ये लागणाऱ्या १८७ हेक्टर पैकी जवळपास ११७ हेक्टर जमीनीचे भू संपादन अंतिम टप्यात आले आहे. आता पर्यंत शेतकऱ्यांना ६२१ कोटी पैकी २४६ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. तर ५२.४० हेक्टर जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. तर उर्वरित जमीनही येत्या काही दिवसात ताब्यात घेण्यात येणार आहे.
सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या एकूण ८४ .४४ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. त्यात धाराशिव जिल्ह्यातील कामाचे दोन स्वतंत्र टप्पे केले आहेत. या रेल्वेमार्गावर एकूण ११० पूल आणि तीन मोठे उड्डाणपूल असणार आहेत. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ३२ गावांतील एक हजार ३७५ एकर जमीन त्यासाठी भूसंपादीत करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. धाराशिव तालुक्यातील नऊ आणि तुळजापूर तालुक्यातील १५ गावांमधील ४९४.२६ हेक्टर जमिनीचे भूसंपादन सध्या अंतिम टप्प्यात आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील जवळपास दहा गावातून हा मार्ग जातो. यासाठी शासनाकडून शेतऱ्यांच्या १८७ हेक्टर जमीनीचे भू संपादन करण्यात येणार आहे.
त्यासाठी जवळपास ६२१ कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. आता पर्यंत त्यापैकी २४६ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. तर आणि १३६ हेक्टर पोटी ३८१ कोटी रुपयांचे वाटप बाकी असून येत्या चार महिन्यात भू संपादनाची प्रक्रिया पूर्ण होईल असा विश्वास भू संपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे यांनी व्यक्त केला आहे.त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी ही तातडीने प्रस्ताव दाखल करावेत असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.


उर्वरित गावांत गाव निहाय शिबीराचे आयोजन

उत्तर सेालापूर तालुक्यातील शहर उत्तर, कसबे सोलापूर, देगांव, बाणेगाव, होनसळ, सेवालालनगर, मार्डी, खेड, भोगांव, बाळे, मुरारजीपेठ या भागातील भू संपादन करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी तसेच भू संपादनाच्या प्रक्रियेबाबत विश्वासहर्ता निर्माण व्हावी यासाठी येत्या १० जुलै पासून गाव निहाय्य शिबीराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती भू संपादन अधिकारी सुमित शिंदे यांनी दिली आहे.
पारदर्शकता, शेतकऱ्यांमधून समाधान

रेल्वे भू संपादन प्रक्रिया पारदर्शक पार पाडली जात आहे. या ठिकाणी दलाल आणि इतरांना अजितबात संधी देण्यात आलेली नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे भू संपादन होणार आहे. त्यांच्याशी चर्चा करुन थेट मोबदला वाटप केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.