एमएसएमईचा भांडवली बाजारात प्रवेश; संरक्षण मंत्रालय-एनएसई यांच्यात महत्त्वपूर्ण करार

    29-Jul-2024
Total Views |
msme capital market defence ministry
 

नवी दिल्ली :       सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग(एमएसएमई)चा भांडवली बाजारात प्रवेश सुलभ करण्यासाठी संरक्षण मंत्रालय आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई ) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारावर संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांच्या उपस्थितीत उत्पादन विभागाचे अतिरिक्त सचिव आणि एनएसई चे व्यवस्थापकीय संचालकांनी स्वाक्षरी केली. संरक्षण क्षेत्रातील एमएसएमईंना एनएसई प्लॅटफॉर्म ‘एनएसई इमर्ज’च्या माध्यमातून कार्यक्षम आणि पारदर्शक पद्धतीने त्यांच्या विकास योजनेसाठी भांडवल उभारण्यासाठी सुविधा पुरवणे हा या सामंजस्य कराराचा हेतू आहे.

दरम्यान, एनएसई प्लॅटफॉर्म विविध गुंतवणूकदारांकडून इक्विटी भांडवल उभारण्यासाठी नवीन आणि व्यवहार्य पर्याय उपलब्ध करून देत आहे. संरक्षण मंत्रालयासोबत काम करणाऱ्या उद्योगांना मार्गदर्शन करण्यासाठी संरक्षण उत्पादन विभाग आणि एनएसई चर्चासत्रे, एमएसएमई शिबिरे, ज्ञान सत्रे, रोड शो आणि कार्यशाळांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येईल. एमएसएमईंना मर्चंट बँकर्स, रजिस्ट्रार, ट्रान्सफर एजंट, डिपॉझिटरीज सारख्या मध्यस्थांशी जोडण्यात एनएसई मदत करेल आणि त्यांना भांडवली बाजार, भांडवल उभारणारी यंत्रणा, नियामक अनुपालन आणि आवश्यकता याविषयी मार्गदर्शन करून संशोधन आणि विकास उपक्रमांना निधी पुरवण्यासाठी मदत होणार आहे.