साडेचार लाखांहून अधिकांनी घेतले दर्शन; ओघ वाढण्याची शक्यता
29-Jul-2024
Total Views |
नवी दिल्ली : यंदाच्या अमरनाथ यात्रेला दि. 29 जून रोजीपासून सुरुवात झाली आहे. या यात्रेला जाणार्या यात्रेकरूंच्या संख्येने गेल्यावर्षीचा विक्रम मोडला आहे. ‘श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड’च्या अधिकार्यांनी सांगितले की, दि. 29 जून रोजीपासून यात्रा सुरू झाल्यापासून गेल्या 29 दिवसांत 4.51 लाखांहून अधिक भाविकांनी पवित्र गुहेला भेट दिली असून गेल्या वर्षीच्या यात्रेचा विक्रम मोडला आहे. मागील वर्षी संपूर्ण यात्रा कालावधीत 4.45 लाख भाविकांनी गुहामंदिराला भेट दिली होती.
सुमारे आठ हजार यात्रेकरूंनी शनिवार, दि. 27 जुलै रोजी पवित्र गुहेला भेट दिली, तर रविवार, दि. 28 जुलै रोजी 1 हजार, 677 यात्रेकरूंचा आणखी एक जथ्था जम्मूच्या भगवती नगर यात्रीनिवास येथून घाटीसाठी रवाना झाला. दि. 29 जून रोजीपासून यात्रा सुरू झाल्यापासून घाटीला भेट देणार्या यात्रेकरूंची ही सर्वात कमी संख्या आहे. यंदाच्या यात्रेची सांगता 52 दिवसांनंतर दि. 19 ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमा आणि रक्षाबंधन सणाने होणार आहे.