मुंबई : प्रभू रामचंद्र आणि मुघल राजा अकबर यांची तुलना करण्याचा अगोचरपणा दिल्लीतील स्पर्धापरीक्षा प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षिका शुभ्रा रंजन यांनी केला आहे. समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये शुभ्रा रंजन “प्रभू रामचंद्र प्रशासकीयदृष्ट्या अकबरापेक्षा कमजोर होते,” असे विद्यार्थ्यांना शिकवताना दिसतात.
शुभ्रा रंजन यांनी ‘आयएएस’ या स्पर्धापरीक्षेसंबंधी शिकवणी संस्थेत ‘राज्यशास्त्र’ विषय शिकवताना, ‘तात्विक राजेशाही’ या मुद्द्यावरून प्रभू रामचंद्र आणि अकबराची अशी अतार्किक तुलना केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. त्यामुळे अखेर शुभ्रा रंजन यांनी पत्रकाद्वारे माफी मागितली आहे. शुभ्रा रंजन यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये “प्रभू रामचंद्र यांना त्यांच्या राज्यात कायदा करण्याचे सर्वाधिकार नव्हते, रीती-परंपरा यांचे प्रभू रामचंद्रांवर बंधन होते,” असाही दावा केला आहे.
तसेच, “याउलट हे सर्वाधिकार अकबराला होते,” असे रंजन विद्यार्थ्यांना सांगताना दिसतात. अकबराविषयी बोलताना त्याच्या ‘दिन-ए-इलाही’चादेखील उल्लेख करत “असे परंपरेच्या बाहेर जाऊन काहीही करणे प्रभू रामचंद्र यांना शक्य नव्हते,” असे अकलेचे तारेदेखील रंजन यांनी तोडले आहेत. त्याचे कारण देताना, शुभ्रा रंजन यांनी “अकबर हा राजेशाही ठरवणारा होता, तर प्रभू रामचंद्र हे राजेशाही अमलात आणणारे होते,” असे म्हटले आहे. तसेच, या तर्काच्या आधारे, पाश्चात्त्य राजेशाही आणि भारतीय राजेशाहीचीही तुलनाही रंजन यांनी केली आहे.
प्रभू रामचंद्रांचा अपमान करण्याचा हेतू नाही!
“सध्या समाज माध्यमांवर फिरत असलेला व्हिडिओ हा शिकवणीवर्गात झालेल्या विस्तृत चर्चेचा एक लहान भाग आहे. यामध्ये तौलानिक अभ्यासाचा हा प्रयत्न केला होता. प्रभू श्रीरामचंद्र यांचा उपमर्द करण्याचा हेतू शुभ्रा रंजन यांचा नव्हता. प्रभू श्रीरामचंद्र यांनी दाखवलेल्या मार्गावर आम्ही कार्यरत असून, आमची त्यांच्या चरणी अढळ श्रद्धा आहे. तथापि, या आमच्या कृतीमुळे कोणाच्याही भावना दुखावल्या असल्यास आम्ही दिलगिरी व्यक्त करतो,” असे शुभ्रा रंजन यांनी सांगितले.
शुभ्रा रंजन यांच्या व्हिडिओतील अन्य ठळक दावे
भारतातील राजे हे क्षत्रिय होते, तर धर्म सांगण्याचा अधिकार हा केवळ ब्राह्मणांचा होता. राजा धर्म सांगणारा नव्हता, तो केवळ धर्माला आधार देणारा होता. त्यामुळे भारतातील राजे हे ब्राह्मणांच्या अधिपत्याखाली होते. भारतातील राजा हा नैतिकतेची व्याख्या करणारा नव्हे, तर नैतिकतेचा केवळ पालनकर्ता. ‘कायदेनिर्मिती करणारा राजा’ ही पाश्चिमात्त्य राजेशाहीतील परंपरा. ब्रिटनमध्ये राजाच्या हाती संपूर्ण शक्ती एकवटलेली होती, तो धर्माच्या अधिपत्याखाली नव्हता. अकबर हा शिक्षित नव्हता, पण साक्षर होता. असा हा अकबर तत्वज्ञानी राजाचे एक आदर्श उदाहरण.
समाजातील समस्यांचा अभ्यास करून घेणे आवश्यक
कायदेनिर्मिती करण्याचे अधिकार भारतीय राजांना नव्हतेच, असे कधीही इतिहासात झालेले नाही. बर्याच ठिकाणी निश्चितच राजसत्तेने कायदेनिर्मिती भारतात केलेली आहे. ब्रिटनमधले राजे पोपच्या नियंत्रणाखाली नव्हते, कारण ते प्रोटेस्टंट पथांचे अनुयायी होते. मात्र, सल्लागार मंडळाचे वर्चस्व अनेकवेळा पाश्चात्य देशांच्या राजेशाहीमध्येही दिसले आहे आणि त्यात काहीही चूक नाही. मुळातच देशासमोरील प्रश्न सोडवणारी पिढी निर्माण करण्यासाठी सध्याच्या समाजातील समस्यांचा अभ्यास विद्यार्थ्यांकडून करून घेणे आवश्यक आहे.
- महेश कुलकर्णी, संचालक, सावरकर आयएएस स्टडी सर्कल, मुंबई